आरशासमोर नेता जेव्हा उभा राहिला !
स्वतःचेच रूप पाहून तोच घाबरला ॥१॥
अक्राळ विक्राळ प्रतिबिंब दिसले !
पापाचे काळे डाग त्यात बसले ॥२॥
हॉस्पिटल खाल्ले, स्मशान खाल्ले !
रस्त्याचे पैसे, एअरपोर्टही गिळले ॥३॥
धरणाच्या पाण्यात घोटाळा केला !
फसव्या योजनेने गरीबाला लुटला ॥४॥
शिष्यवृत्ती खाल्ली, गाडीत कमिशन !
प्रत्येक फाईलमध्ये फक्त भ्रष्टाचाराचं मिशन ॥५॥
पैशाने बंगला बांधला मोठा !
आतून पोकळ पापाचा गोटा ॥६॥
घरात आजार आला, वेळ आली!
त्याच खड्ड्यात गाडी अडकली ॥७॥
त्याच हॉस्पिटलात फाईल अडली !
पैशाविना केस तिथेच सडली ॥८॥
पैसा असून औषध मिळेना हाती !
ज्या व्यवस्थेला लुटले तिथेच बसली माती ॥९॥
तेव्हा डोळे उघडले, मन हादरले !
आरशातील सत्य त्याला बोलले ॥१०॥
“प्रामाणिकपणाचा आहेका तुझ्यात अंश !
कर्माने तुझ्याच बुडायचा तुझा वंश !” ॥११॥
हात जोडून नेता शपथ घेतो !
आजपासून भ्रष्टाचार मी सोडून देतो ॥१२॥
हार घालून वंदन केले आरशाला !
असे अनेक आरसे हवेत भारत वर्षाला ॥१३॥

— रचना : गजाभाऊ लोखंडे. सानपाडा, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
