Friday, January 3, 2025
Homeयशकथाअमेरिकेतील नवदुर्गा : ७

अमेरिकेतील नवदुर्गा : ७

“यशस्विनी गोरे लिमये”

महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडताहेत, मराठी मागे पडते आहे म्हणून ओरड चालली आहे आणि अमेरिकेत मी पहाते आहे की, अनेक जण मराठी शाळा काढून मुलांना आपले संस्कार देण्याचा मनापासून प्रयत्न करताहेत. त्यातलीच एक सियाटलची यशस्विनी गोरे लिमये होय.

यशस्विनी अनेक उपक्रम राबवते. त्यातल्या एका उपक्रमाला जाण्याचा योग आला. काय होता कार्यक्रम माहीत आहे ? रात्री ८ वाजता, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी २५/३० जणं जमून अथर्वशिर्षचे २१ वेळा पारायण करत होते. हा दुसराच कार्यक्रम होता. आणि कुठे होता ? एका चर्चच्या शाळेत !
हे किती वेगळे आहे ना ?

यशस्विनीने २०२० च्या मे महिन्यात सवंगडी नावाची एक नॅान प्रॅफिट संस्था सुरू केली आहे. त्यातर्फे हा कार्यक्रम होता. सवंगडी म्हणजे सोबती, मित्र. मुलांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत, त्यांचे कलागुण विकसित व्हावेत यासाठी विविध कल्पक, कार्यक्रम यशस्विनी आयोजित करत असते. उदा.पाढे पाठ करण्याची स्पर्धा, मोठ्यांचे समूहगान,आई आणि मुलांनी एकत्र चित्रकला शिबिरात शिवाजी महाराजांचे चित्र चितारणे, दिवाळीचे महत्व सांगणे, एकत्र सण साजरे करणे ! इथल्या सर्वात मोठ्या Meydenbauer सभागृहात, एका कार्यक्रमाच्या वेळी तिने शिवाजी महाराजांवर भव्य ३ तासाचे, २ अंकी नाटक सादर केले होते, ज्याचे लेखन, दिग्दर्शन तिचेच होते. त्यात अभिनव पोवाडे होते, तेही यशस्विनीनेच लिहीले होते. ६० मुलांचा त्यात सहभाग होता. ३८ मोठ्या माणसांनी त्यासाठी मदत केली होती. तिने लेखन मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत केले होते, म्हणजे अमराठी माणसांना ही शिवाजी कळेल.

अमेरिकेत अंतरे खूप असतात. पण पालकही धडपड करून असे कार्यक्रम आवर्जून पहातात, मुलांना ने आण करतांना त्यांनाही सामावून घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन कार्यक्रमाची आखणी करण्याची यशस्विनीची पध्दत खरच वाखाणण्यासारखी आहे.

यशस्विनीने आता “मित्रक्लब” नावाची सांस्कृतिक शाळा सुरू केली आहे. तिने एक जागा भाड्यानी घेतली आहे. तिथेच संकष्टीचा कार्यक्रम झाला. पारायणानंतर काही मुलांचे, मोठ्यांचे, गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. प्रसाद आणि नंतरचे जेवण ह्यासाठी पालकांनी घरून एकेक पदार्थ करून आणले होते. आपापल्यातले प्रेमसंबंध वाढण्यासाठी, कुटूंबानी एकत्र येऊन, चांगल्या गोष्टीत वेळ घालवण्यासाठी, हे ही आवश्यक असते. अनेक जण खाली बसून हातात प्लेट घेऊन, नविन ओळखी करून घेत, मराठीत गप्पा मारतांना पाहिल्यावर, हे अमेरिकेत होत आहे ह्यावर विश्वास ठेवणे काहींना कठिण वाटेल. मुंबईतही हे द्रृष्य हल्ली पहायला मिळत नाही. आता तिथे संगीताचे कार्यक्रम व अनेक कार्यक्रम करण्याचा यशस्विनीचा विचार आहे.

मागच्या वर्षी यशस्विनीची मैत्रिण पिनाकिनी देवचक्के हिने डेनवर, कॅालोरडो इथे सवंगडीची शाखा सुरू केली आहे. यशस्विनी तिच्या नावाप्रमाणे यशस्वी झाल्याचे हे उदाहरण आहे.

यशस्विनी मुळची पुण्याची, कोथरूडची आणि ज्ञानप्रबोधिनीतली ! आजी आजोबा स्वातंत्र्य सैनिक, वडिल एस्.पी. कॅालेजात प्राध्यापक आणि आई समुपदेशक ! त्यामुळे झालेले संस्कार उत्तम ! यशस्विनी आर्किटेक्ट झाली. पुणे, मुंबई, बंगलोर, हैद्राबाद इथे तिने आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर म्हणून काम केले. हैद्राबादला असतांना मुलगा झाल्यावर तिने काम सोडले. तीन वर्षे मुलाच्या संगोपनासाठी वेळ दिला. त्यानंतर स्वतः चा व्यवसाय सुरू केला. पण अमेरिकेत यायची संधी मिळाली. तिचे मिस्टर संदीप लिमये माक्रोसॅाफ्ट मध्ये जॅाब करतात. त्यांचा व घरच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी अनेक उपक्रम करू शकते, असे यशस्विनी आवर्जून सांगते.

अमेरिकेत आल्यावर तिने आधी मुलगा लहान होता म्हणून गोडार्ड (डे केअर) मध्ये सहशिक्षिका म्हणून काम केले. नंतर एका कंपनीत इंटिरियर डिझायनर म्हणून काम केले.
२०२० मार्च मध्ये तिने स्वतः ची डिझाईन कंपनी सुरू केली व नुकतीच Yash Remodeling and Interior Design LLC ही कंपनी काढली आहे, त्यात आख्या घराचं किंवा त्यातल्या काही भागाचं remodeling अँड inetiors ती करते.

यशस्विनीने या नवरात्रीला सियाटलमधले पहिले पॅाडकास्ट चॅनेल, “मनातल्या गोष्टी” YouTube वर चालू केले आहे. त्यात अनेक क्षेत्रातल्या ९ यशस्वी महिलांच्या मुलाखती, ९ दिवस तिने घेतल्या आहेत.

यशस्विनी इतकी व्यस्त असतांना पालकांच्या, मैत्रिणींच्या, घरच्यांच्या सहकार्यांने तिने सवंगडीची एक वेगळी वाट सुरू केली आहे. तिच्या या सर्व उपक्रमांना खूप शुभेच्छा !
क्रमशः

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments