Wednesday, June 18, 2025
Homeबातम्याबेंगळूरू : असे रंगले बहुभाषिक कवी संमेलन

बेंगळूरू : असे रंगले बहुभाषिक कवी संमेलन

ज्येष्ठ मराठी-हिंदी साहित्यिक तथा करामसाप सदस्या लीना पेंढारकर यांचे वडील श्री. चिंतामणि पराडकर यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्ताने रविवारी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगळूरू विभाग आयोजित बहुभाषिक कवी संमेलन बेंगळूरूच्या हेब्बाल परीसरात अतिशय उत्साहाने पार पडले.

श्री. चिंतामणि भास्कर पराडकर यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात बडोदे, गुजरात येथून श्री. सुरेश सहस्रभोजनी व सौ. सुषमा सहस्त्रभोजनी उपस्थित होते. दोघे ज्येष्ठ दंपती WHO मान्यताप्राप्त स्वामी हरदास यांचे सिद्ध सायन्स, वडगाव शेरी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत २५ वर्षे रुग्णांना सकारात्मक उर्जा देऊन त्यांच्या आरोग्यासाठी समाधानकारक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या अथांग कार्याबद्दल परिषदेकडून सत्कार करण्यात आला. तसेच बेळगाव येथील ज्येष्ठ कन्नड, मराठी साहित्यिक डॉ. प्रेमा मेणशी यांचाही गौरव करण्यात आला.

श्रीमती लीना पेंढारकर व कुटुंबीयांनी सभागृहाची सुंदर सजावट केली होती.त्यांनी उपस्थितांचे भावपूर्ण स्वागत केले. या बहुभाषिक कवी संमेलनात मराठी बरोबर कन्नड, हिंदी व गुजराती साहित्यिकांनी स्वरचित कविता सादर करून व त्याला मराठीत अनुवाद करून गुढार्थ समजावला. त्यामुळे त्या रसिकांच्या मनात रुजल्या. या प्रसंगी उपस्थित गायक मंडळींनी आपल्या गाण्यांनी कार्यक्रमास रंगत आणली.

बेंगळूरूला सर्वत्र इंग्रजी संस्कृती असूनही मराठी बांधवांनी आपला सुट्टीचा दिवस बेंगळूरूच्या बदलत्या हवामानात कधी उन तर कधी प्रचंड वारा आणि पाऊस अशा अडचणींना मात देत वेळेत पोहोचून आपली सामाजिक बांधिलकी जपली, कार्यक्रमास भेट दिली, हे खरंच खूप विशेष आहे.

करामसाप बेंगळूरू हे मराठी भाषिकांशी, साहित्यिकांशी जोडलेले एक कुटुंब असून अन्य भाषिकांना सामावून घेणारे संस्कृतीचे द्योतक आहे. या बहुभाषिक संमेलनाद्वारे परप्रांतीय भाषिकांचे विचार व साहित्याचे आदानप्रदान होते. नवीन भाषा शिकण्यास प्रोत्साहन मिळते. आजच्या काळात अनुवादीत साहित्य वेगाने वाढत आहे तेव्हा त्या भाषेबरोबर त्या प्रांतातील परंपरा, संस्कृतीचीही ओळख जगाभरात होते. विश्वऐक्यकुटुंबकमची भावना साकारली जाते. जितके गौरव आपल्याला आपल्या भाषेचे असते तितकाच गौरव व आदर प्रत्येकाला आपापल्या भाषेचा व्हावा या हेतूने बहुभाषिक संमेलन आयोजन करण्यात आले होते. आमचे आजचे प्रयत्न उद्याचे भविष्य ठरेल! असे करामसाप, बेंगळूरू विभाग अध्यक्षा सौ. दिपाली वझे म्हणाल्या.

कार्यक्रमात सौ. दिपाली वझे यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर कार्यक्रमाचे निवेदन करामसाप बेंगळूरू विभाग सदस्य श्री. राकेश शेटे यांनी केले व त्यांचे स्वलिखित बाबांवरील पुस्तक उपस्थित मान्यवरांना भेट स्वरूप दिले.

या संमेलनात सत्कारमूर्तीं बरोबर, बेंगळूरू विभाग कार्यकारिणी, मा. लीना पेंढारकर यांचे कुटुंबीय व अन्य मान्यवरांपैकी सौ. रेवती कुलकर्णी, श्री. रविन्द्र कुलकर्णी, मा. परवीन कौसर, श्री. संजय शिंदे, श्री. सचिन्द्र शेवडे, सौ. श्रेयांशी शेवडे, सौ. प्रतिक्षा वालगांवकर, श्री. सारंग वालगांवकर, सौ. वृषाली शेटे उपस्थित होते. करामसाप बेंगळूरू विभाग कार्यवाह सौ. प्रतिभा टेकाडे यांनी बाबांवरची भावपूर्ण कविता व मनोगताने कार्यक्रमाची सांगता केली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments