प्रतिक्षा जॉइनिंगची
जहाज जॉईन करायची मुकुंदांची आणि माझी प्रतीक्षा सुरू झाली. मर्चंट नेव्हीच्या या नोकरीत तुम्हाला ज्या शिपवर पाठवलं जातं तिथे तुमच्या rank चा अधिकारी काम करत असतो.
जहाजावर काम करण्याचे त्याचे ठरलेले महिने पूर्ण व्हावे लागतात. तसेच जहाज जगाच्या कुठल्या भागात आहे, ते कोणत्या देशात कोणत्या बंदराला, कधी येईल, या सर्वाचा विचार होतो.
कोणत्या ऑफिसर्सची रजा संपत आली आहे, ते पाहून त्या ऑफिसर्सना जॉईन करण्यासाठी बोलावलं जातं.
जहाज बंदरात यायला काही वेळा ठरलेल्या तारखे पेक्षा उशीर होतो. त्यामुळे अमुक एका तारखेला तुम्हाला नक्की जॉईन होता येईल असं प्रत्येक वेळेला सांगता येत नाही. कधी कधी दोन-तीन आठवडे किंवा एखादा महिना सुद्धा जास्त लागू शकतो.
ही जहाज येण्याची अनुकूलता बघूनच तुम्हाला तिथे पाठविले जाते. त्यामुळे *अचानक जॉईन व्हायला लागणं* हा मर्चंट नेव्हीच्या जीवनाचा अविभाज्य भागच असतो.
तुम्ही जाऊन तिथल्या ऑफिसरकडून त्या कामाचा charge घ्यायचा. तेव्हाच तो relieve होतो. तुम्ही Sign on होता. मग तो ऑफिसर sign off करून रजेवर जातो.
reliever आल्याशिवाय त्या ऑफिसरची जहाजावरून सुटका होऊ शकत नाही.
काही वेळेला जहाजावर अचानक गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. म्हणजे एखाद्या ऑफिसरची अगर क्रू मेंबरची तब्येत फारच बिघडली किंवा कोणाला काही accident झाला असला, अगर त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा इतर काही बिकट, गंभीर कौटुंबिक समस्या उभी राहिली तर त्याला ताबडतोब relieve करावे लागते.
अशा निकडीच्या परिस्थितीत काही वेळेला नुकत्याच रजेवर गेलेल्या ऑफिसरला सुद्धा रजा सोडून तिकडे जॉईन व्हावे लागते.
जहाजावरचे ऑफिसर, क्रू मेंबर यांचा sailing time संपला की ते आपल्या रिलिव्हरच्या वाटेकडे अक्षरशः डोळे लावून बसलेले असतात.
खरंतर जहाजावर जॉईन झाल्याच्या दिवशीच आपण रजेवर परत कधी जाणार याची मोजदाद प्रत्येक ऑफिसर आणि क्रू मेंबर करत असतो. जहाजावरचा त्यांचा काउंटडाऊन सुरू होतो. “अभी तो खाली नऊ महिना जहाज पे निकालने का, फिर वापस घर जाऊंगा !”
हेच प्रत्येक जण म्हणत असतो.
क्रू मेंबर त्यांच्या भाषेत “इधर कॅलेंडर काटनेकू आया” असं म्हणतात.
काही जण तर आल्या दिवसापासून दररोज संपलेल्या तारखेवर कॅलेंडरवर खरोखरच फुली मारतात.
घरापासून बायको, मुलं, आई-वडील, परिवार यांच्यापासून असं हजारो किलोमीटर दूर, जहाजात, भोवती सतत समुद्र, कधीतरीच थोड्या काळासाठी किनाऱ्यावर जायला मिळणं या परिस्थितीत कित्येक महिने काढणं ही गोष्ट अजिबात सोपी नसते.
अहो, जमिनीवर जगणारी माणसं आपण ! जमिनीपासून तुटून महिनोन्महिने असं एकटं समुद्रावर राहायचं हे किती अवघड आहे याची किनाऱ्यावर राहणाऱ्यांना कधीच कल्पना करता येणार नाही.
पण आता आम्हाला मात्र प्रतीक्षा होती ती कंपनी का बुलावा आने की आणि तो बुलावा शेवटी एकदाचा आला.
मुकुंदांचं posting लोकपालक नावाच्या जहाजावर होणार आहे असं ऑफिसने मुकुंदना सांगितलं.
ही शिप ऑस्ट्रेलियाहून भारताकडे यायला निघाली होती. ती विशाखापट्टणला पोहोचायला काही अवधी होता. त्यामुळे आम्ही निवांत होतो.
दर दोन-तीन दिवसांनी जहाज केव्हा येणार आहे, आम्हाला कधी निघावे लागेल या साठी मुकुंद कंपनीला फोन करायचे. आमच्याकडे घरात फोन नव्हताच. त्यावेळेला मोबाईल वगैरे स्वप्नातही नव्हते. दुपारी जेवण झालं की बाहेर दुकानात जाऊन फोन करून यायचे. येताना मस्तपैकी पान खाऊन यायचे. आम्हा सर्वांसाठी पण घेऊन यायचे. या रोजच्या फोनची मला खूप गंमत वाटत होती.
मला लहानपणीचं एक गाणं आठवलं, ते मी सहजंच मुकुंदना सांगितलं…..
चांदोमामा चांदोमामा
टोपी दे, टोपी दे |
आज नाही बाळा
उद्या ये, उद्या ये ||
फोन करून मुकुंद आले की हसत एकच वाक्य म्हणायचे “आज नाही बाळा उद्या ये.” एकदा मला म्हणाले, “आपला नवरा रोज कंपनीत फोन करून आलो असं सांगतोय तर खरं ! पण याला खरंच नोकरी-बिकरी आहे का नाही, अशी भीती तुला बहुतेक वाटत असणार.”
शेवटी एकदा “लोकपालक ही शिप विशाखापट्टणम् या पोर्टला येते आहे. तिथे तुम्ही जॉईन करा,” असं ऑफिसने सांगितलं.
आता तयारी करायची होती प्रत्यक्ष जहाजावर जाण्याची !
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Farch sundar. Merchant nevy che veglech vishwa dolya samor ubhe rahate. Uttar likhan shaili
हे merchant navyche विश्व veglech आहे. त्यामुळे त्यातले अनुभव देखिल विलक्षण!
तू ते फार परिणामकारक पद्धतीने mandates.
त्यामुळे वाचकाची उत्कंठा वाढते.
खूप सारा उत्साह, थोडी अनभिज्ञता,थोडी धाकधूक, स्वप्नपूर्तीचा आनंद, काहीतरी वेगळं करण्याची जिद्द, आत्मविश्वास, तुम्हा दोघांच्या अशा सगळ्या भावना या लेखात जाणवल्या!👌👌
मर्चंट नेव्हीच्या कुटुंबाचे हे आगळेवेगळे विश्व आता उलगडत आहे.लवकर पुढचा भाग पोस्ट कर.
तुमच्या यजमानांचं स्वप्न त्यांनी मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी घेऊन पूर्ण केला परंतु त्यानंतरचे कष्ट किती असतात हे तुम्हाला नंतरच कळलं असेल. सामान्य लोकांना मात्र मर्चंट नेव्ही आणि बक्कळ पैसा एवढेच दिसतं परंतु त्यामागचे कष्ट कुटुंबालाच कळतात. वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते याची काहीही कल्पना नसते.*अनिश्चितता कायमच पाचवीला पुजलेली असते*: या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यातून मार्गक्रमण करणे आणि सुख शोधणे ही खरोखरी तारेवरची कसरत दोघांसाठीच असते त्यातून तुम्ही तावूनसुलाखून बाहेर पडलात हे खरोखरच कौतुकास्पआहे..
छान …..प्रत्येक भागागणिक उत्सुकता वाढते आहे
लेखन खूप आवडलं,मस्तच जमलाआहेलेख
खूप छान डिटेल्स. शिपवर आता मोबाईल असतात, त्यामुळे रेंज असेल तेव्हा मेसेज करता येतो. पूर्वी ते शक्य नव्हतं.