“दिसते मजला सुखचित्र नवे”
चंदा आणि बाबी दोघी बहिणी. बाह्य रूपाचा विचार केला तर बहिणी अजिबात वाटत नसत. चंदा पुलंच्या यमीपेक्षा सहापट गोरी. बाबी जन्मल्यावर काळी निळी पडली होती. ऑक्सीजन वगैरे बाह्य उपचार देऊन ती वाचली. रंग सावळा त्यामुळे झाला, असं आत्याकडून तिनं ऐकलं होतं. असेलही तसं… खरं, खोटं देव जाणे !
पण हे खरं की बाबीचा रंग सतेज नव्हता. सावळा रंग देखील आकर्षक दिसतो की.
“दोघी बहिणी इतक्या कशा बाई वेगळ्या ?“ असे कुणी उद्गार काढले की, वडील म्हणायचे,
”चंदा आईसारखी, बाबी माझ्यासारखी.“
आई म्हणायची, ”रंगाचे काय घेऊन बसलात ! वाचली माझी पोर. इथे धड हॉस्पिटल नाही, जिवानिशी माझं बाळ वाचलं ती देवाची कृपा.“
खरोखर तीस वर्षांपूर्वी चंदा आणि बाबी रहात त्या गावी काहीही सुविधा नव्हत्या. आईवडिलांनी कधी भेदभाव केला नाही. अशक्त बाबीची जपणूक जास्त करत. बाकी दोघींचे सारखे लाड. सारखेच वळण लावणे.
आपल्याकडे रुपावरून, मापावरून हिणवण्याची पद्धत आहे. रिकामटेकडे लोक करणार तरी काय म्हणा. लोकांचं मत मनाला लावून घेण्याची सरसकट सवय आहे. ती तर घातकच आहे.
चंदा आणि बाबी लहान असताना आजूबाजूचे लोक आरसा दाखवायला तयार असत. कधी एकाच रंगाचे फ्रॉक घातले दोघींनी तर, ”एक पौर्णिमा दुसरी अमावस्या.” असे म्हणत.
दोघींमध्ये तीन वर्षांचा फरक होता, कधी चंदाला आखूड झालेला ड्रेस बाबीने घातला की, “चंदाला किती शोभून दिसायचा हा ड्रेस !“
मला ह्या लोकांचे नवल वाटत आले आहे. काही लोक दाखवतात खरे, आम्ही सुसंस्कृत झालो आहोत. पण मग खुबीने हळूच असे म्हणतील, “जरा वेगळी वाटते ना दुसरी बहीण !”
चंदा कधी ह्या तुलनेने हुरळून गेली नाही. उलट ती खूप जपायची,धाकट्या बहिणीला. बाबी विचारायची,
“मी का नाही ताई, तुझ्यासारखी ?”
“तुला रांगोळी किती छान येते काढता, बाबी ? मला येते का ? आपण एकसारखे असू तर लोक आपल्याला कसे ओळखतील ? ”
मोठं होत गेल्यावर विशेषतः कॉलेजमध्ये गेल्यावर बाबीला आपल्या रंगारुपामुळे न्यूनगंड वाटायला लागला. चंदाचं लग्न झाल्यावर तो वाढायला लागला. कॉलेजमध्ये असल्यापासूनच एक मुलगा चंदाच्या मागे होता, तो सेटल झाल्यावर त्याने तिचा रीतसर हात मागितला.
न्यूनगंड असण्याचा परिणाम म्हणून शिक्षणात देखील बाबीला बिचारीला फारशी चमक दाखवता आली नाही. बाबांनी ओळखीच्यात तिला नोकरीला चिकटवले.
नोकरी लागल्यावर बाबी थोडी नेटकी राहण्याचा प्रयत्न करू लागली. चंदाने तिला सोन्याच्या कोंदणातले मोत्याचे स्टड्स घेऊन दिले होते. ते घालू लागली. कधी तरी साडी किंवा सिल्कचा ड्रेस घालू लागली.
एक दिवस तिनं सांगितलं, “ एक मुलगा माझ्या प्रेमात आहे. आमच्या ऑफिसमध्येच आहे.आपल्या जातीतला नाही. बैठ्या चाळीत राहतो.“ आईबाबा गांगरून गेले.
चंदा भेटायला आली. “एकदा त्याला बोलाव बाबी. सगळेच भेटू. बोलू.“
बाबांना म्हणाली,
”प्रेम आहे ना, करतील अॅडजस्ट. त्याच्या परिस्थितीचं टेन्शन घेऊ नका. आपण मदत करू.“
आज भेटू, उद्या भेटू असे करताना अचानक त्याला अॅडमिट केल्याचं समजलं. टायफॉईड झाला होता.
एकाएकी तो गेलाच मुळी. बाबीची आई तर खूप निराश झाली. ह्या मुलीला प्रेम मिळालं होतं ते असं हिसकावलं गेलं.
बाबी पुन्हा गबाळी राहू लागली. चंदाने आता अधून मधून माहेरी फेरी घालायचे ठरवले.
बाबीला सोबत घेऊन शॉपिंग करायचे ,कधी सिनेमाला जायचे असे चालू केले. पुन्हा बाबीने कात टाकली. फॅशनेबल राहू लागली. नविन पर्स, ड्रेस असे दिसू लागले. रोज लिपस्टिक – ती पण अती गडद शेडची लावू लागली.
चंदाने केलेले शॉपिंग हे नव्हते. खोदून खोदून विचारल्यावर एका क्लायंटशी जमलंय, असं तिने चंदाजवळ कबूल केलं. ख्रिश्चन असल्याने घरी सांगायची भीती वाटते म्हणाली. ख्रिश्चन म्हटल्यावर घरात वातावरण तंगच झाले. आधीच हिच्यात गंड ! इतक्या परक्या समाजात हिची डाळ कशी शिजेल ? आपल्याला संवाद कसा साधता येईल ? आईचे तर बीपी वाढले. चंदाने मात्र धीर धरला. शिपवर असतो. तो आला की चंदाने बोलणी करायची असे ठरले. ताई म्हणून चंदा कायम तिच्याशी पाठीशी होती.
महिन्याभरात शिपवर अपघात झाल्याचे समजले त्यात त्याने प्राण गमावले. अशी बातमी आली. म्हणजे हेही प्रपोजल फिस्कटले तर ! बाबा तर हैराण झाले. हिच्या नशिबात लग्न लिहिले नाही की काय ? ज्योतिषी, काही अनवधानाने राहिलेले कर्मकांड असेल काय ह्याच्या चौकशीला बाबा लागले.
चंदा बाबीच्या ऑफिसमध्ये गेली. तिच्या कलीगना भेटली. तिचा होणारा नवरा शिपवर अपघातात गेल्याचे ठाऊक होते, पण असा क्लायंट आहे असे कोणाच्या गावीच नव्हते. अलीकडच्या चार सहा महिन्यात कोणी कलीग टायफॉईडने गेलेला नव्हता. एव्हढेच नाही तर, एकही एम्प्लॉई बैठ्या चाळीत मुळी रहात नाही. चंदाला ह्या गोष्टीचा अंदाज आला होताच. म्हणूनच ती ऑफिसमध्ये आली होती.
बैठ्या चाळीतला मुलगा, शिपवरचा मुलगा ही दोन्ही पात्रं, नंतर त्यांच्या दुर्घटना बाबीच्या कल्पनेतले होते सारे !
आपलं सत्य उघडकीला आल्यावर, चंदाच्या गळ्यात पडून ती रडली. मुळात न्यूनगंड. सतत रुजलेली ताईशी तुलना, ताईचे असे फुलत गेलेले प्रेम नंतर लग्न ! मला हे मिळणार नसेल तर , कल्पनेत तरी मिळूदे असे वाटले तिला. लग्नाच्या बाजारात रंग रूप नसेल तर काहीच किंमत नाही ह्या भीतीने ग्रासली होती ती. त्यामुळे स्वतःला आभासी दुनियेत गुंतवत गेली. नवी नवी सुखचित्रे रंगवत होती ती. भेटीचे क़िस्से बहिणीला, मैत्रिणींना सांगून त्यात ती रममाण होऊन जीवनाचा आनंद घेत होती.
चंदाने हे सगळे समजुतीने , जिव्हाळ्याने समजून घेतले. काऊंन्सिलिंगसाठी तिला नेले. बाबीला योग्य जोडीदार मिळेपर्यंत काऊंन्सिलिंग चालू ठेवले, प्रत्येक वेळी चंदाने सोबत केली.
चंदासारखी कर्तव्यतत्पर ताई होती म्हणून ती मोठ्या संकटातून वाचली नाहीतर ह्या आभासी पात्रांना अंतच नव्हता. आभासी सुखचित्रातून सर्वांनी तिला बाहेर काढले. पुढे तिचा संसार झाला. सगळं सुरळीत झालं. मला खरं तर बाबीबद्दल लिहायचे आहे, पण हा रंग चंदाच्या समंजसपणामुळे उठावदार झाला आहे.
कुटुंबात सहसा भावंडांची तुलना केली जाते. त्यातही दोन बहिणी किंवा दोन भाऊ ह्यांच्यात जास्त सोपी जाते करायला. जर असा ठळक फरक असेल, तर गंड किंवा विकृती निर्माण होऊ शकते.
अशा वेळी पालकांनी विशेष मेहनत घेऊन अपत्यांना वाढवले पाहिजे. निकोप वाढ हा आयुष्याचा पाया असतो.
न्यूनगंड आरसे घेऊन उभे असणाऱ्या आजूबाजूच्या मंडळींमुळे फोफावतो. रंग रूप हातात नसतं, हातात असतो स्वभाव ! आपण दुसऱ्याला आरसा दाखवताना, दुखवत तर नाही ना ह्याची काळजी घ्यायला हवी, नाही का ?
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
