Homeलेखजुनी वस्त्रे… नाते आठवणींचे

जुनी वस्त्रे… नाते आठवणींचे

भाड्यानी आम्ही रहात असलो तरी हा छान बंगला होता. दिवाणखान्याला छान बाल्कनी होती. तिथून आकाशाचा तुकडा मोठा छान दिसायचा.इथे रात्री खूर्ची टाकून निवांत बसायची माझी जूनी संवय मी रोज पार पाडत असे.खाली बागेत छान फूले ऊमलत सुगंध पसरलेला असे. चंद्राची कोर क्षितिजावर येऊन स्थिरावत असे. काळे पण रूपेरी किनारीचे हे नभांगण चमचमत्या तारकांनी भरलेलं असायच. नक्षत्रांच्या दिव्यात ही तारकादले सुंदर खेळ मांडत. मी ते निरखत पहात माझी तंद्रीच लागे. देहभान विसरत मी दुसरंच आठवत बसे.तो काळारंग व ती रपेरी भरजरी किनार, मधोमध असंख्य चांदण्या.
मला आठवे आईची काळीभोर लाल जरीकाठाची चंद्रकळा.नेसुन झाल्यावर आई ती पलंगावर पसरुन ठेवी. मग सुंदर घडी घालून पेटीत जाई. असं चांदण्यांनी भरलेलं काळे नभांगण बघताना मला ती आईची पलंंगावर पंख्यावर हलत असणारी लांब पसरलेली चंद्रकळा आठवते. ही खरी का ती खरी असा भ्रम होतो.बाबा परगावी गेले तेव्हा आजीने त्यांना आईसाठी ही चंद्रकळा मुद्दामच आणायला सांगुन बाबांनी ती मोठ्या हौसेने आणली होती.

लालसर नक्षीदार भरजरी काठापदराची अशी काळ्या रंगात अंगभर शुभ्र चांदण्या असलेली ती चंद्रकळा म्हणजे श्रीमंती हौसच होती.पुढे संक्रांतीला सैलसर अंबाडा, मोठं लाल गोल कूंकू, भरगच्च मोगरीचा गजरा, नथ अंगावर ठेवणीतले अलंकार, आणि ही पायघोळ नेसलेली न ऊ वार नेसलेली चंद्रकळा . चेहेरा आनंदाने फुललेला. ते आईचे रुप डोळ्यांसमोरुन हलत नाही. देखणी व खानदानी तेजस्वी होती. अंगभर आईची ती आठवण, ती चंद्रकळा, ती खानदानी नजाकत, शहारा फुलवत गेली. मी आणि वहिनी पण खुप वेळा नेसलो पण आईचा खानदानी रूबाब आमच्यात दिसलाच नाही.आता ती चंद्रकळा प्लॅस्टीकच्या पिशवीत दोघींचीही आठवण, आजीचा जिव्हळ्याचा आग्रह व बाबांची हौस आणि आईचे जिवापाड ती जपणे व अभिमान आजही ती पेटीबंद असली तरी जसाच्या तसा नजरेपुढून हलत नाही.मी माहेरी गेल्यावर दादा पेटी ऊघडतो मी व तो त्या पिशवीतल्या चंद्रकळेवर हात फिरवत आईचा मायेचा स्पर्श शोधत रहातो आणि तो मिळाल्याचा आनंद पण मिळतो. तिथे आई एकदा परत भेटते.

मोठेपणी लग्नानंतर वरातीवेळी आजेसासुबाईंनी मोठ्या हौसैने व मायेने भरजरी जांभळा शेला अंगावर पाठीकडुन नीट घातला.मला तो जड वाटला. आजही त्या व त्यांचे बोलणे आठवते. “जड होतोय न?अगं आपल्या कूळाची पिढीजात श्रीमंती, खानदानी प्रतिष्ठा, जपण्याची जबाबदारी आहे तो शेला. जड होणारच. “मोठ्या मायेनी आणि विश्वासाने पाठीवर टाकली आहे. नंतर तो शेला लग्न कार्यात असं पांघरायला, मुंजीत भिक्षावळीत आईच्या पाठीवर घातला गेला. एरवी सासूबाई पेटीत जपून ठेवत. पिढ्या न् पिढ्या चालत आला होता.
जायच्या आधी दोन आठवडे सहस्त्र चंद्र दर्शनाचा आम्ही मोठ्या हौसेने थाटात त्यांचा कार्यक्रम केला होता तेव्हा त्यांनी शेवटचा अंगावर घातलेला होता. खुपच महागडा, भरजरी, बुट्टेदार गुलबक्षी शालू न ऊवार होता. नविन सुन लग्नहोऊन आली कि सत्यनारायणाच्या पूजेला तो नेसुन बसायची पद्धत होती.शालू , लांब शेपटा , त्यावर लपेटून गजरा, नथ, दागिने घातल्यावर माझी मीच पुन्हा पुन्हा आरशात पहात होते. मग कोणीतरी पट्कन‌अंबाडा बांधला व कौतुकाने नव्या सुनेचे गुणगान केले.

असेच जरीचे सोवळे, ऊपरणे टोपी घालुन सासरे गणपती आल्यावर पूजेला बसत. खुप रूबाबदार दिसत. मधे अनेक वर्षांनी शेला, शालू व‌ सोवळे जूने झाले म्हणुन नीट बांधून‌पेटीत गेले. पण आठवणी कायम राहिल्या. पूर्वी कपडे कमीच असत पण ऐपतीप्रमाणे ते किंमती असत. घरातील स्त्रिया ते काळजीपूर्वक जपून वापरत. चंदेरी, बनारसी, खंबायती, धारवाडी अशा खरी जर असलेली वस्त्रे म्हणजे अंगाखांद्यावर श्रीमंतीच खेळत असे. मराठी चित्रपट आले आणि न ऊवारीची जागा पांचवारी गोल साडीने घेतली व त्याआधीच्या भरजरी वस्त्रांची नजाकत, खानदानी रूबाब संपलाच.
शेजारी लांबच्या आत्याबाई रहात. घरी सतत येत जात. मदत करत. सोवळे, वैराग्याचे जिवन जगत. जेवण होईपर्यंत सोवळे नेसून असत. रेशमी असे. त्याला धाबळी म्हणत. आता धाबळी कोणी वाफरत नाही. दिवसभर त्या “लाल अलवण”नेसत.
एकच रंग ना काही छापलेलं ना काही जरीचं.

नियतीने भाळी लिहिलेले दुर्दैव त्या अलवणीवर छापण्यापेक्षा एकरंगीच बरी. आज धाबळी व अलवण आठवल्यावर त्या आत्याबाईंचे दुर्दैवाचे सोहाळेच आठवतात. तरीही त्या किती मायेने सर्वांशी वागत. घरात बाळ झाल्यावर वयस्कर बायका बाळाला, झबली, टोपडी, दुपटी, पोटबांधणी, लाळेरं आणि जरीची कूंची शिवत. बाळ कुंचीत छान झोपे.
बाळ मोठे झाल्यावर लहान होणारी ही कूंची, झबली टोपडी इ. चे गाठोडे आत जात असे. कधीतरी ते बाहेर येई व आपल्या बाळाचे तान्हेपण पुन्हाएकदा अनुभवायला येई. त्या कपड्यांना बाळंतीणीच्या ऊद धूप शोपा यांच्या धुरीचा एक हवाहवासा गंध येई. मग आई त्या बाळाच्या आठवणीत बुडून जाई. पुन्हा एकदा मुल तान्हे होई.
मुंजीत मुलांना जरीची टोपी घालत. व वरती घेरा ठेवत. मुंजमुले खुप गोड दिसत. फोटो काढलेला असेच एखादा. ती जरीटोपी आठवून मजा येई. आत्या भावाला मुलगी झाल्यावर वर्षाची असताना धारवाडी खणाचे परकर मोठ्या हौसेने शिवे. मुली पैंजण घालून घरभर नाचत.

ते परकरपोलके, ते पैंजण सारे आठवून बालपण परत आल्यासारखे वाटे. घरातल्या बायका मात्र आता पोर मोठी होईल व‌ सासरी जाईल म्हणुन डोळे पुसत. लग्नात मुली पिवळे वधुवस्त्र व मुलगे सोवळे कोट टोपी ऊपरणे नेसुन ऊभे रहात. कोट टोपीतले ते वर बावळट दिसत व हंसायला येई. अशी अनेक प्रकारची जुन्या काळातली किंमती, टिकाऊ अशी सुंदर वस्त्र नावानिशी विस्मरणात गेलीत. त्यावेळच्या लोकांच्या जपून वापरणे, टिकवणे, परत पेटीत ठेवणे. हे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. भरजरी, घट्ट टिकाऊ रेशीम, पक्के रंग व काळजी घेणे यामुळे खुप टिकत. वापरणारा, आणणाऱ्याची आपुलकी माया त्यात भरलेली असे. अनेक प्रकारचे कार्यातील होमहवनाचे वास रंग गुरफटलेले असत. जीव गुंतलेला असे. काळजात ती वस्त्रे दडवून ठेवलेली असत. केव्हातरी तो कप्पा ऊघडत असे व धबाधबा आठवणी बाहेर पडत. डोळ्यासमोर चित्रपट चालू होई. हंसत कधी लाजत तर कधी रडत पण चित्रपट पाहिला जाई. ती वस्त्रे, त्या व्यक्ती, त्यांची माया, आपुलकी, काळजी पुन्हा मनाला भिडून जाई. स्पर्श तो गंध आपोआप अनुभवायला मिळे.आठवणीच त्या मायेच्या स्पर्शात ओलावलेल्या असत.

— लेखन : अनुराधा जोशी. अंधेरी, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments