Homeकलाबिनाका गीतमाला…

बिनाका गीतमाला…

आमच्या महाविद्यालयीन जीवनात सिनेमा हे प्रमुख करमणुकीचे साधन होते. याचबरोबर रेडिओवर विशेषतः दर बुधवारी रात्री ८ ते ९ दरम्यान प्रसारित होणारा बिनाका गीतमाला हा आमचा जीव की प्राण होता.आज बुधवारी मला अचानक बिनाकाची आठवण आली. आम्हा कोणाकडेही रेडिओ नसल्याने वसतीगृहाच्या रेडिओवर हा कार्यक्रम ऐकला जायचा.

रेडिओ सिलोन केंद्रावर बुधवारी रात्री ठीक आठ वाजता बिगूल वाजत लागणाऱ्या ट्यूनमुळे सारे रेडिओकडे कान लाऊन बसायचे. ‘भाई और बहनों, मैं हुं आपका दोस्त, अमीन सयानी और लेकर आया हुं आपका पसंदीदा प्रोग्राम बिनाका गीतमाला’ हे शब्द ऐकण्यासाठी साऱ्या रसिक श्रोत्यांचे कान टवकारलेले असत. बिनाका गीतमाला मध्ये आज पहिल्या क्रमांकावर कोणतं गाणं येणार यावर पैजा लावल्या जायच्या. प्रत्येकाच्या कानावर ‘पायदान’ हा परवलीचा शब्द जणू अधिराज्य गाजवायचा. प्रसारित होणारं गाणं आज कोणत्या क्रमांकावर आहे हे सांगण्यासाठी अमीन सयानी हा शब्द वापरत असत.

गाण्यांच्या लोकप्रियतेच्या उलट्या क्रमानं सोळा ते एक अशी गाणी ऐकवली जायची. जसजसा वरचा क्रमांक येईल, तसतसं सयानी त्यांच्या आवाजात आणखी ऊर्जा आणून घोषणा करत असत. कार्यक्रमाची ही कल्पक मांडणी अन् सयानी यांच्या मधाळ अन् खोल आवाजाने या कार्यक्रमाची लज्जत वाढली होती.गेल्या आठवड्याच्या तुलनेत वरच्या क्रमांकावर उडी घेतलेल्या गाण्यासाठी किंवा एक क्रमांकावर सादर होणाऱ्या गाण्यापूर्वी आवर्जून बिनाका ट्यूनचा बिगूल हमखास वाजवला जायचा.
कालांतराने बिनाका चे सिबाका गीतमाला असे नामकरण झाले.पण दूरदर्शन अन् मोबाईल युगात हा कार्यक्रम आता इतिहास जमा झाला असला तरी त्याची महती,गोडी अन् आठवणी अजूनही ताज्या आहेत.

संजय फडतरे

— लेखन : संजय फडतरे. पिंपळे गुरव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments