सियाटलच्या नृत्यांगना ललितागौरी मकरंद आगाशे ह्यांना या संमेलनामध्ये नृत्य सादर करायची खूप इच्छा होती. त्यामुळे त्यांनी या सादरीकरणासाठी काय विषय घ्यावा ह्याचा खूप विचार करून विषय निवडला “निसर्ग माऊली“. निसर्गाप्रमाणेच निसर्ग कवितेतही त्यांना विशेष रूची आहे. त्यामुळे त्यांनी त्या विषयावरच कार्यक्रम करायचे ठरविले आणि अभ्यास सुरू केला. त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी हा अभ्यास सुरू केल्यावर अनेक तज्ञांचे सल्ले घेऊन कार्यक्रमाच्या उत्तम सादरीकरणाचे सर्व श्रेय त्यांना दिले. निसर्गाच्या रंगांचा, अंगांचा विचार करून त्यांनी सर्व रचना निवडल्या.
इथे वाढणाऱ्या, रहाणाऱ्या वय वर्षे ८ ते ६८, अशा १४ जणींचा या कार्यक्रमात सहभाग होता. ह्या सर्वजणी त्यांच्याकडे नृत्य जरी शिकत होत्या, तरी काही जणींचा यातल्या मराठी ओव्या, गाणी, कविता ह्यांच्याशी कधी संबंध आला नव्हता. त्यांना अर्थ समजावून मग नृत्य शिकवणे हे ओघाने आलेच !
काय विषय होते या कार्यक्रमात ?
शिवशक्ती समावेशन ही संकल्पना प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराज लिखित ‘अमृतानुभव’ (अनुभवामृत) या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात आढळते. या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी शिव (परमेश्वर) आणि शक्ती (जगन्माता/प्रकृती) यांच्यातील अद्वैत आणि अभेद्य संबधांचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे.

धनश्री लेले आणि केशव परांजपे सर ह्यांच्या मार्गदर्शनामुळे रचनेचा साचा तयार करता आला. प्रसिध्द लेखिका विद्युलता अकलुजकर ह्यांनी ओव्यांचा अर्थ सांगणे, उच्चार तपासणे, कडवी निवडणे ह्यासाठी मदत केली. अनेक नामांकित गायकांनी संगीताची बाजू चोख सांभाळली.

कुसुमाग्रजांच्या कवितेवर सर्वांचेच प्रेम आहे. त्यावर भरतनाट्यम नृत्य ही कल्पनाच मी कधी केली नव्हती. पृथ्वीचे प्रेमगीत आणि आगगाडी आणि जमिन ह्या कवितेतील नाट्य नृत्याद्वारे अतिशय उत्तमरित्या ललीताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले. मागचा सेट, आगगाडीचा उद्दामपणा, जमिनीचा सोशिकपणा, तिचा राग अतिशय परिणामकारक दाखवला होता. तितकेच पृथ्वी आणि ग्रह ह्यांचा संवाद ही कल्पकतेने दाखवला होता.

शंकराचार्यांच्या गंगा स्तोत्रावरचा पारंपारिक नाच आणि “घन घन माला” वरचा मोराचा हर्ष आणि गोपींचा विरस पहातांना मजा आली. मृदंगम शिक्षक लक्ष्मण महादेवन् ह्यांना गंगास्तोत्रचे श्रेय द्यायला आणि गुरूजी पार्वतीकुमार ह्यांच्या शाबासकीमुळे आत्मविश्वास आला हे सांगायला ललिता विसरत नाही.

ज्यांच्यावरून सियाटल हे नाव पडले आहे, त्या “नेटिव्ह चीफ सियाटल” ह्यांचे गाजलेले अमर पत्र, सियाटलला होणाऱ्या कार्यक्रमात निवडणे या कल्पनेचे विशेष कौतुक केले पाहिजे. ह्या नृत्याच्या वेळी भूषण मेहेंदळेनी आवाज दिला होता. ह्या सर्व नव निर्मितीत लहान मुली पण काही सुचवून सहभागी होत होत्या. प्राजक्ता, सोनम, सहाना, अमृता ह्या नृत्यांगना, आपली नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, नाचाच्या तयारीसाठी वेळ काढत होत्या म्हणून त्यांचे विशेष कौतुक ! प्रत्येक नाचाच्या वेळी १४ जणींचे सारखे, पण वेगळे ड्रेस, मेघनानी मेहनतीने केलेल्या स्लाईड्स आणि अश्विनी देवधर ह्यांनी केलेले उत्तम निवेदन, उत्तम दिग्दर्शन आणि कलाकारांचे सुंदर सादरीकरण ह्यामुळे हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांना आनंद देऊन गेला ह्यात काही शंका नाही.
क्रमशः

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
