“किशोर कुमार”
आज 13 ऑक्टोबर 2026. बरोबर 39 वर्षांपूर्वी; 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोर कुमार यांचे निधन झाले. या निमित्ताने त्यांच्या सहवासातील सुरेल आठवणींना उजाळा..
किशोर कुमार यांना विनम्र अभिवादन.
–संपादक
माझे भाग्य थोर की किशोर कुमार हयात असताना अनेक वर्षे त्यांचा सहवास लाभला, त्यांच्या सोबत अनेक गाण्यामध्ये कोरस म्हणून गाण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत अनेक स्टेज शो मध्ये भाग घेण्याचे सौभाग्य मिळाले.
माझे आणि किशोरदा यांचे नाते खूपच घनिष्ठ होते. माझ्यावर ते मुलाप्रमाणे प्रेम करत. मी अनेक वेळा त्यांच्या घरी जात असे, त्यांचा काही निरोप असला तर सुपर स्टार राजेश खन्ना यांच्या घरी मी जात असे, किशोरदा मुळे मला त्यांच्या घरी थेट प्रवेश मिळत असे. त्यांच्या घरी मी गेल्यावर ते माझ्याशी गप्पा मारत असत.
मी एमएससी अँग्रीला असल्यामुळे मला किशोरदा; त्यांचे मूळ गाव असलेल्या मध्य प्रदेशातील खांडवा येथे घेऊन जाणार होते. तिथे त्यांना आंबे व द्राक्ष बाग उभी करायची होती, पण दुर्देवाने तो योग जुळून आला नाही.
एकदा आम्ही “मिस्टर इंडिया” या सिनेमाचे रेकॉर्डिंग करत होतो. ते झाल्यावर त्यांना घरी जायचे होते. त्यांनी गाडी आणली नव्हती. त्यात लक्ष्मीकांत यांचा ड्रायव्हर आला नव्हता. तेव्हा त्यांनी मला एक टॅक्सी आणण्यास सांगितले. मी टॅक्सी आणली तेव्हा त्यांनी मला टॅक्सीत बसण्यास सांगितले. त्या प्रवासात आमच्या खूप गप्पा झाल्या, तो टॅक्सी वाला नवीन होता म्हणून रस्ता चुकल्यामुळे आम्हाला घरी जाण्यास बराच वेळ लागला,त्या प्रवासात त्यांना मी मुलगा झाल्याचे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, नुसते सांगू नको मला मिठाई दे. एका मिठाईच्या दुकानासमोर थांबून मी त्यांना मिठाई दिली. तेव्हा ते म्हणाले एकदा मुंबईला येऊन मुलगा दाखव. परंतु तो योग आला नाही. त्यानंतर आमची बऱ्याच वेळा रेकॉर्डिंगला भेट होत असे. तेव्हा ते विचारत, तुझा मुलगा केव्हा दाखवतो ?
एकदा आमचे रेकॉर्डिंग झाल्यावर देशप्रेमी या सिनेमातील शूटिंग झालेली काही गाणी मोठ्या स्क्रीनवर दाखवित होते. ते पाहण्यासाठी हेमा मालिनी व अमिताभ बच्चन आले होते. तेव्हा किशोरदा लक्ष्मीकांत यांची खूपच फिरकी घेत होते, त्यात एक गाणे होते तीन दीन तांदना यात त्यांनी मेहमूद यांचा आवाज काढला होता,त्यात अमित जी ते डायलॉग मेहमूद स्टाईल ने म्हणत होते, आमची सर्वांची हसून हसून पुरती वाट लागली होती.

2 जानेवारी 1987 रोजी तेव्हाचे औरंगाबाद येथे आशा भोसले, किशोर कुमार, आर डी बर्मन यांचा गारखेडा येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिर उभारणीसाठी श्री वक्ते यांनी शो आयोजित करण्यात आला होता. या शो मध्ये एक जण कोणीतरी व्हिडीओ शूटिंग करत होता. ते पाहून नाराज होऊन किशोरदा स्टेज सोडून त्यांच्या गाडीत जाऊन बसले. या मुळे सर्व जण चिंतीत झाले. तेव्हा आशाताई माझ्याकडे येऊन म्हणाल्या, वाईकर किशोरदा तुमचे ऐकतात. त्यांना समजाऊन पुन्हा स्टेज वर घेऊन या. मी खूप घाबरलो होतो कारण किशोरदा यांचा राग पण फार वाईट होता. पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. पुन्हा आर डी बर्मन हे माझ्याकडे आले व त्यांना घेऊन ये असे सांगितले. मी खूप पेचात पडलो तेव्हा मला आशाताईनी मला धीर देऊन सांगितले, किशोरदा तुमच्यावर नाराज झाले तर मी तुमच्या सोबत आहे.
मी गजानन महाराज यांचे नाव घेऊन भीतभीत त्यांना चहा घेऊन गेलो. तेव्हा थंडी खूपच होती. त्यांना विचारून अजून एक कप चहा घेऊन गेलो. तेव्हा त्या गजानन महाराज यांच्या बद्दल थोडी माहिती दिली. ते दोन मिनिट शांत बसले ते पाहून त्या थंडीतही मला घाम फुटला. नंतर त्यांना माझे म्हणणे पटले व ते पुन्हा गाण्यास तयार झाले. तेव्हा त्यांनी त्यांच्या गाण्याचे पेपर माझ्याजवळ दिले. माझे नाव घेऊन ते पेपर मी त्यांना देत होतो.
हा शो झाल्यावर आशाताई व पंचमजी माझ्या जवळ आले व तुमच्यामुळेच किशोरदा पुन्हा गाण्यास तयार झाले, असे कौतुक त्यांनी केले. तेव्हा आम्ही रामा इंटरनॅशनल या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलो होतो. हा शो त्यांच्या जीवनातील शेवटचा ठरला. ज्या दिवशी त्यांचे निधन झाले त्या दिवशी मी गंगाखेड येथे होतो.ती बातमी कळताच लगेच मी मुंबईला गेलो.
तेव्हा त्यांच्या घरी मी एक दिवस होतो. त्यांना नंतर खांडवा येथे नेणार होते. पण तेव्हा त्यांचा मुलगा अमित कुमार अमेरिकेत होता. तो आल्यानंतरच पुढील रूपरेषा ठरवली जाणार होती. त्यांची त्यांच्या घरून आर के स्टुडिओ पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली .तेथे राज कपूर यांनी त्यांचे अंत्य दर्शन घेताना त्यांना खांदा देण्याचे भाग्य लाभले.
तश्या किशोरदा यांच्या अनेक आठवणी आहेत. अजूनही कोठून त्यांचा आवाज कानावर पडला की, आता किशोर दा आपल्याला कधीच भेटणार नाहीत या विचाराने मन उदास होते.
किशोर दा यांच्या चरणी लीन होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

— लेखन : सिनेगायक उदय वाईकर. परभणी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
