जपानी “हायकू” हा काव्यप्रकार मराठीत आणणार्या कवयित्री, संपादक शिरीष पै यांचा काल जन्मदिन साजरा झाला. या निमित्ताने त्यांच्या कवयित्री सुरेखा पाटील यांनी सांगितलेल्या काही आठवणी..
शिरीष पै यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
२/९/२०१७ दुपारी माझ्या बहिणीने शिरीष पै गेल्याची दुःखद बातमी दिली आणि काळजात लककन् झाले. मी त्या दिवशी गेले नाही कारण मला त्या तशाच राहल्या हव्या आहेत. १९९७ साली माझा छोटेखानी हॅलो हा संग्रह प्रकाशित झाला. नंतर एकदा एका कविसंमेलनात त्यांची ओझरती भेट झाली.


स्वर्गीय कवी प्रल्हाद चेंदवणकरांनी तो संग्रह देण्याचे सुचवले आणि मी तो दिला. काही दिवसांनी माझ्या घरी दूरध्वनीवरून संपर्क साधला, मी घरी नव्हते, माझ्या मुलीशी त्या बोलल्या, ती म्हणाली, “अग आई तुला आचार्य अत्रे यांच्या मुलीचा फोन आला होता, ती खूपच आनंदात होती त्यावेळी”. आजही मला तो प्रसंग आठवतो. त्यांनी मला भेटायला बोलावले होते. एक कवितांची डायरी सोबत घेऊन गेले होते. जास्त परिचय नव्हता, पण आवर्जून नंतर बोलावले. मी वेळ घेऊन गेले. मला वाटलं काही तरी मार्गदर्शन करतील, तर त्यांनी माझ्या नवीन संग्रहासाठी प्रस्तावना लिहून ठेवली होती. त्यांना म्हटलं, ‘नाही हो शिरीषताई, मुले आणि नोकरी, पुस्तक काढणं म्हणजे मुलाला जन्म देण्यासारखं, मला नाही जमणार.’ तेव्हा त्यांनी मला समजावलं, ‘हे बघ, कवितांचा बहर असा रोखायचा नसतो, कधीकधी बंजर काळ सुद्धा येतो, आपण कवी लेखक संसार करतो, नोकरीही करतो, एकाच वेळी दोन्ही पातळीवर जगत असतो. काचेच्या पलिकडे सर्वसामान्य माणसं पाहू शकतात, आपण त्या पलिकडे पहातो, लिहू शकतो, आता हे पुस्तक तू काढच’ — त्यांनी तर पाठच काढली.
ऋतुराज या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना, तर हे देखणे पुस्तक डिंपलचे अशोकजी मुळे यांनी प्रकाशित केले. महापौर बंगल्याच्या हिरवळीवर तत्कालीन महापौर श्री. हरेश्वर पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले. आम्ही त्यांना आणण्यासाठी गाडी पाठवायच्या अगोदर त्या पायीच कार्यक्रमाच्या स्थळी आल्या. स्व. कवी प्रल्हाद चेंदवणकर, केशव मेश्राम, तसेच चित्रकार अनिल दाभाडे, डॉ. विठ्ठल प्रभू, डॉ. शंकर मोडक, म.वृ.ले. संघाचे पदाधिकारी, पत्रकार राजे उपस्थित होते, तर आकाशवाणी केंद्राचे निवेदक दिनेश अडावदकर आणि निवेदिका प्रतिभा पाटील बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले. हे पाहून त्या निरागसपणे म्हणाल्या, “अग तुझ्यामुळे मला किती मोठी माणसे भेटली”. या साधेपणाचं कौतुक वाटत राहिलं.

ज्येष्ठ लेखक सुमेध रिसबूड यांच्याशी गप्पा मारताना गुंगून गेल्या. आचार्य अत्रे यांच्या वात्रटिकांनी भाषणाची सुरुवात, तर माझ्या चारोळ्यांनी समारोप केला. नंतर मला शिरीषताई म्हणाल्या की हा कार्यक्रम नसून कौटुंबिक संमेलन वाटले. कित्येकदा शिरीषताई स्वतः संपर्क साधून ताजे हायकू ऐकवत. मी काही लिहिले आहे की नाही याची चौकशी करीत. ‘कधी वेळ असेल तर येत जा’ असं सांगत. हिन्दी अनुवादित कविता घेऊन गेले होते; यापूर्वी माझ्या बहिणीकडून अनुवाद करून घेण्यासाठी त्या आग्रही होत्या.
जवळपास तासभर त्यांच्या सहवासात होते. एक मराठी आणि एक हिंदी अनुवाद याचे वाचन करीत होत्या आणि खुश होऊन या ‘तरंग’ समवृत्ताला पण शुभाशिर्वाद दिले. मी त्यांना भेटायला गेले तेव्हा फुले नेली होती. पुढच्या वेळी आवर्जून उल्लेख केला, “तू आणलेली फुले मला आवडली”. फुलांवर, निसर्गावर, माणसांवर, जगातील प्रत्येक कणाकणांवर त्यांचे प्रेम होते. पुस्तक देताना स्वाक्षरी करण्यासाठी माझ्याकडे पेन मागितले. त्यातील शाई पाहून चकित झाल्या. सोनेरी शाईचे पेन त्यांच्यासाठी नेले होते.
असंख्य आठवणी आहेत. पुन्हा पुन्हा ताज्या होणाऱ्या. त्यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमासाठी मला कुरीयरने निमंत्रण पाठवले. साडी भेट दिल्यावर त्या म्हणाल्या की, ती साडी मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटनाला नेसेन. किती साधेपणा !
अतिशय निगर्वी, संवेदनशील, प्रत्येकाला आपल्या वाटणाऱ्या, नवोदितांना कायम मार्गदर्शन करणाऱ्या मातृवत अशा शिरीषताई आपल्यात नाहीत, तरी त्यांच्या पुस्तकांतून भेटत रहातील. स्वतः उत्तुंग शिखरावर असूनही नम्रतेने वागणाऱ्या अशा व्यक्ती हजारो वर्षांत एकदाच जन्माला येतात. त्या पुन्हा होणे नाही. कालच्या त्यांच्या जयंतीवरून एक गोष्ट स्मरते आहे, मला जेव्हा कळले १५ नोव्हेंबर हा शिरीषताई यांचा वाढदिवस आहे, मी लगेचच म.टा. मध्ये संपर्क साधून ही बातमी दिली. मला तेथे नाव विचारले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी फोटो पाहून शिरीष ताईंनी माझे आभार मानले. मी त्यांना म्हटले, ‘अहो माझे कसले आभार?’
आपल्या आयुष्यात खूप व्यक्ती भेटतात, वाऱ्याची झुळूक यावी तशा येतात आणि जातात, पण शिरीषताई सारख्या मोठ्या मनाच्या व्यक्ती मनात कायमच रहातात. शिरीषताई पै, त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.
— लेखन : सुरेखा पाटील. मुंबई/ लंडन
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
