Homeसाहित्यदिवाळीच्या कविता

दिवाळीच्या कविता

आज पासून आपली दिवाळी सुरू झाली आहे. या निमित्ताने या काही  कविता. आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

1) दीपोत्सव मनातला

दारी आकाश कंदील
छान सजली रांगोळी
खास वेगळा फराळ
आली साजिरी दिवाळी

दारी पेटत्या पणत्या
झाली घरे सुशोभित
लख्ख सारे दूरवर
आनंदला आसमंत

सौख्यदाई सण  मोठा
घ्यावे  पुण्य पदरात
दान वंचितास द्यावे
भाव असावा मनात

बाळकडू संस्कारांचे
आहे संस्कृती थोरच
आचरुनी जीवनात
होऊ द्या परोपकार

काय मिळते भांडून
नको ती हाणामारी
आनंदाने जगू सर्व
आणू स्वर्ग पृथ्वीवरी

शुभ दिन ते पाहीन
धन्य होऊन जाईन
दीपोत्सव मनातला
साजरा मीही करीन

— रचना : डॉ.सौ.अनुपमा पाटील. ठाणे

2) वसु बारस

दीपावली स्वागतास
प्रथमच सण येतसे
आरंभ गे वसूबारस
गोमाता पूजन होतसे….

सोन पावलांनी येते
दिवाळी  घराघरात
सौख्य आनंद नांदते
जागती लहरी मनात…

वसुबारसदिन निमित्त
पूजा वासरू गाईंची
मोदभरे गे पणतीत
स्नेहवात तेवू तेजाची..

सजवून धेनू वासराला
शोभे झूल वशिंडावर
रंग  शिंगाना लावला
हातफिरे प्रेमे पाठीवर….

करुनी पूजन गोमातेचे
पकवान्न दावू तिजला
मातृत्व व वत्सलतेचे
आशिष लाभे घराला….

अज्ञान तम दूर सारुनी
ज्ञानतेज ते पसरवू या
दिवाळसण निमित्तानी
सण साजरा करू या….

— रचना : सौ.मीना घोडविंदे

3) दिवाळी

मंद तेवत्या पणत्यात
रंग भरलेल्या रांगोळ्यात
सजते दिवाळी —-
रेलचेल ड्रायफ्रुट मिठाईची
आतषबाजी  फटाक्याची
आसमंतात दिवाळी —

नव्या को-या कपड्यावर
भारी सेटचा भपकारा
सुगंधी दिवाळी—–
मेल बॉक्स भरला ईमेल ने

अबोल शुभेच्छांची दिवाळी
प्रेमाचा नसतो जिव्हाळा
आपुलकीचा नसतो उमाळा
देण्याघेण्याची फक्त दिवाळी

बंद घरात मन व्यवहारात
साजरी दिवाळी घराघरात
अश्याने खंतावते मन
बघा जरा मनातले बोलून

संवाद साधून उजळतील नाती
आठवांच्या चंद्रज्योतीतून
असेल हि प्रसन्न दिवाळी

दृढ करा अनुबंध
जपा आपले ऋणानुबंध
स्नेहमयी, चैतन्यमयी
होईल दिवाळी—-

— रचना : शुभदा डावरे चिंधडे. ठाणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण