Homeलेखविकास फक्त पैश्यानेच होत नाही - अण्णा हजारे

विकास फक्त पैश्यानेच होत नाही – अण्णा हजारे

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील पदविका अभ्यासक्रम चालवला जात असे. तिथे मी शिकवायला जात असे. बरोब्बर सात वर्षांपूर्वी मी आणि माझे मित्र तथा दुसरे पाहुणे व्याख्याते श्री राम खाकाळ यांनी पुढाकार घेऊन, सर्व विद्यार्थ्यांचा ग्रामीण विकास अभ्यास दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात आम्ही राळेगण सिद्धी ची पाहणी आणि त्या गावाचा कायापालट घडवुन आणणारे जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्याशी दीर्घ संवाद साधला होता. फेसबुक च्या सौजन्याने, त्या भेटीचा वृत्तांत पुढे देत आहे.
— संपादक

गावाचा विकास हा फक्त पैशानेच होत नाही तर त्यासाठीं सक्षम नेतृत्व तयार होणं गरजेचं आहे , असे प्रतिपादन जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी ते बोलत होते.

श्री हजारे पुढे म्हणाले, आपण आपल्या गावाचा विकास केला तर त्यातून आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास करू शकतो. पण सध्या अशा नेतृत्वाची कमतरता आहे. म्हणून गाव पातळीवर असे सक्षम नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे.

अण्णांनी पुढे सांगितले की, सक्षम नेतृत्व तयार व्हायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे, त्या म्हणजे शुद्ध आचार * शुद्ध विचार * निष्कलंक नेतृत्व असावं. असं जर झालं तर आपल्या देशात नक्कीच चांगल्या प्रकारचे नेतृत्व तयार होऊन देशातील ६ लाख ३८ हजार ३६५ गावांचा राळेगण सिद्धी सारखा विकास होईल.

महात्मा गांधीजींनी पाहिलेले ग्राम विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी खेड्याचा विकास झाला पाहिजे. गांधीजींनी दिलेला खेड्याकडे चला हा मंत्र अण्णांनी स्वतः लष्करी सेवेनंतर अवलंबला. त्यांच्या भेटी दरम्यान त्यांनी नेतृत्वाचे अजूनही काही पैलू सांगितले. सक्षम नेतृत्व तयार व्हायचे असेल तर त्याग करणे गरजेचे आहे. हा त्याग केल्याशिवाय नेतृत्व तयार होत नाही. तसेच अपमान पचविणे देखील गरजेचं आहे.

देशातील शेतकऱ्यांसाठी , कष्टकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी जर काही काम करायचं असेल तर अण्णांचे राळेगण सिद्धी हे गाव पाहणं गरजेचे आहे. अण्णांनी त्यांच्या पंचविसाव्या वर्षी महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून प्रेरणा घेतली आणि त्या प्रेरणेच्या आधारे गावाचा विकास कसा करतात याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले.

         प्रारंभी अण्णांनी  पाणलोट क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. पहिली दोन वर्षे त्यांना खूप   त्रास, अपमान सहन करावा लागला.  तरीही  त्यांनी अपमान सहन करत काम सुरू ठेवले. अण्णांच्या राळेगणसिद्धीत 40 ते 45 दारूभट्ट्या 1975 चालु होत्या. ह्या दारूभट्ट्या मधून लोक दारु पाडायचे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये दारू फुग्यांमध्ये वगैरे नेऊन विकून आपला उदरनिर्वाह करायचे. या गोष्टीला अण्णांनी स्‍वकर्तृत्‍वातून दूर केले. 

ज्याप्रकारे पहिले दोन वर्षे क्षेत्रांमध्ये काम केलं आणि या विभागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. शेतकऱ्यांमध्ये पाण्याचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. लोकांनी या गावांमध्ये त्यावेळी दारूच्या भट्ट्या बंद करून शेती करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांमध्ये हे एक दारूबंदी असलेले आदर्श गाव तयार झाले. दुसरा पैलू गावामध्ये आम्हाला मिळाला, या गावात कुठेही तंबाखू, सिग्रेट, सुपारी, दारू अशी कोणत्याही प्रकारची नशा करणारी दुकाने नाहीत. कोणीही व्यक्ती अशा प्रकारची नशा करत नाही आणि ही सर्व अण्णांच्या विचारांची करामत आहे. अण्णांचे हे विचार लोकांनी अंगीकारले आणि हा चमत्कार घडला.

     या गावात गेली ४० वर्ष निवडणूक झाली नाही. म्हणजेच  त्यांच्या नेतृत्वाला येथील लोकांनी स्वीकारले आणि या गावाचा विकास सुरू ठेवला आहे. या यावेळी अण्णांनी एक छान उदाहरण आम्हाला सांगितले. ते म्हणाले तुम्ही आज पूर्ण गाव पाहिला तिथे ज्वारी बाजरी यांची शेत्त पाहिली. त्या शेतांमध्ये ज्वारीला आलेली कणसे पाहिली असतील, आता हे *कणीस भरण्यासाठी एका दाण्याला स्वतःला जमिनीत गाडून  घ्यावे लागते*. स्वतःला एक दाणा पुरून घेतो तेव्हा एक कणीस निर्माण करू शकतो तसेच एका नेतृत्व जर त्याग केला तर त्याच्या सारखे अजून समाज उपयोगी कामे होऊ शकतात.

अंदाजे ३००० एकर जमीन, ४५० उंबरा आणि २८०० लोकसंख्या असलेल्या राळेगणसिद्धी गावातुन देशसेवेसाठी आतापर्यंत ३२५ हुन अधिक जवान लष्करात भरती झाले आहेत. समाजसेवेसाठी २१ डॉक्टर या गावाने दिलेत, तसेच ४५ शिक्षक, २ उप जिल्हाधिकारी, १ भारतीय महसूल सेवेत रुजू झाले आहेत.

      कुठल्याही प्रकारची परदेशी मदत किंवा बड्या व्यापाऱ्यांच्या देणगी न घेता ग्रामस्थांनी विकास केलेल्या या राळेगणसिध्दी गावाला आजपर्यंत देशविदेशातील १२ लाख लोकांनी भेट दिली आहे.

— लेखन : किशोर किसन हिंगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments