मधुभाई म्हणजे जेष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे आणि माझे नाते जरा वेगळेच आहे. नाही, म्हणजे तुमच्यासारखा मी त्यांचा चाहता आहेच पण त्यांचे आणि माझे नाते वेगळे आहे, ते अशा अर्थाने की, मी दूरदर्शन मध्ये असताना, माझी सहकारी असलेल्या सौ अनुजा देशपांडे (पूर्वाश्रमीची शैलजा कर्णिक) हिचे ते वडील तर दूरदर्शन मध्ये वृत्त निवेदन केलेले, मित्रवर्य श्री अजित देशपांडे यांचे ते सासरे आहेत. त्यामुळे दूरदर्शन मध्ये असताना, कधी कधी अनुजा कडून तिच्या बाबांबद्दल कळतनकळत ज्या काही गोष्टी मला कळत गेल्या, त्या मी मधुभाईंच्या लिहिलेल्या जीवन कथेत खुबीने वापरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ही जीवन कथा जशी आपल्या पोर्टल वर; www.newsstorytoday.com प्रसिद्ध झाली आहे, तशीच ती “माध्यमभूषण” या माझ्या पुस्तकात देखील समाविष्ट केली आहे.
मधुभाईंची सर्वच अर्थाने असलेली जेष्ठता विचारत घेऊन, “माध्यमभूषण” पुस्तकात ती प्रथम क्रमांकाने प्रसिद्ध केली आहे, हे सांगणे नलगे ! पुस्तक प्रकाशित झाल्यावर बहुतेक जणांना मी ते पोस्टाने पाठविले पण अपवाद होता तो, मधुभाईंचा . मला ते त्यांना पोस्टाने नाही तर समक्ष भेटून द्यायचे होते. त्याप्रमाणे त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांनी दिलेल्या वेळी मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या पाया पडून त्यांच्या हाती पुस्तक दिले.

नंतर बसुन ते पुस्तक चाळू लागले. दरम्यान आनंद ने आणलेला लाडू, चिवडा, चहा घेऊन मी भाईंचा निरोप घेतला.मनाप्रमाणे भाईंना भेटूनत्यांना मला पुस्तक देता आले, ते त्यांनी चाळले, एका वेगळ्या विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल कौतुक केले, हेच माझ्या दृष्टीने पुरेसे होते. पण “कहाणी मे ट्विस्ट आया, जब मुझे भाईंका खत मिला !” भाईंचे वय, तब्येत पाहून मला अजिबात अपेक्षा नव्हती की, ते पूर्ण पुस्तक वाचतील आणि नुसते वाचतीलच नव्हे तर स्वतःच्या हस्ताक्षरात कौतुकाची थाप असलेला छानसा अभिप्राय देतील याची कल्पना केलेली नव्हती. पण भाईंचे स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र मला मिळाले आणि ते पाहून, वाचून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. हे पत्र कुठे ठेऊ, असे मला झाले.

कहाणीत दुसरा ट्विस्ट आला, जेव्हा हे मौल्यवान पत्र ईकडे तिकडे जाऊ नये म्हणून मी अति व्यवस्थित ठेवले. पण गम्मत म्हणजे, ते कुठे ठेवले हेच मला आठवेना. गेले सहा महिने पत्र शोधून शोधून मी दमलो, पण काही केल्या ते सापडेना! शेवटी माझ्या करंटेपणाला दोष देत, पत्र शोधण्याचा नाद सोडून दिला. आणि अहो आश्चर्यम, काल बॅंकेत पासबुक घेऊन गेलो असता, ते पत्र पासबुक मध्ये सापडले! खात्यात पेन्शन जमा झाल्याचा जेव्हढा आनंद मला झाला नाही, त्या पेक्षा किती तरी पटीने मला आनंद झाला, तो ते पत्र मिळाल्याचा झाला. तर असो. हे पत्र आता परत कुठे हरवू नये म्हणून मी ते फ्रेम करून भिंतीवर लावणार आहे. हे पत्र पुढे देत आहे.

हे पत्र म्हणजे, भाईंची मला मिळालेली अमूल्य अशी थाप आहे आणि ती मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. अशाच तर गोष्टींनी आपण श्रीमंत, समृद्ध होतो, नाही का ?

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
