Monday, February 17, 2025
Homeपर्यटनअंदमान सफर अंतिम भाग

अंदमान सफर अंतिम भाग

‘अंदमान’ या बेटावर आम्ही एक छोटासा ग्रुप करून गेलो याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला कोणत्यातरी कंपनीच्या ट्रीपसोबत जायचे नव्हते. तिथे इतके वाजता या ठिकाणी जायचे आणि तितके वाजता तिथून निघायचे, हे आम्हाला पसंत नव्हते. एखादे ठिकाण आवडले तर मनसोक्त तिथे रमायचे. एखाद- दुसरे ठिकाण नाही आवडले तर तिथून ताबडतोब निघायचे आम्ही ठरवले होते.

या संपूर्ण सहलीमध्ये आम्ही आठ जण होतो. तरीही आम्ही आठ सीटर किंवा दहा सीटरची एकच गाडी न घेता मुद्दामहून चार सीटर च्या दोन गाड्या घेतल्या होत्या. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाला प्रवासादरम्यान खिडकीबाहेरचे जग पाहता यावे, याशिवाय गाडीत चढणे- उतरणे सोपे जावे.

वेगवेगळ्या वयोगटातील आम्ही सर्व असूनही आमच्यात वेगवेगळ्या विषयांवर उत्तम चर्चा झाल्या. अंदमानला साधारण चारच्या सुमारास सूर्यास्त होतो आणि पाचनंतर तर पूर्ण अंधार त्यामुळे संध्याकाळी एकत्र बसून आम्ही गप्पागोष्टींचे फड रंगवले. दूरदर्शन निर्माते राम खाकाळ, सुप्रसिद्ध संगीतकार, भजनगायक पंडित शंकरराव वैरागकर, सुप्रसिद्ध गायिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी गाण्याच्या मैफिलींनी वातावरण सूरमयी करून टाकले. मी काही कविता ऐकवल्या. आमची मैत्रीण चंद्रिका ठक्कर हिने तिने अनुभवलेल्या पूर्वीच्या सहलीच्या गमतीजमती सांगितल्या. ॲड स्नेहा ने तिच्या वकिलीच्या व्यवसायातील ताणेबाणे सांगून आम्हाला एका वेगळ्या क्षेत्राची माहिती दिली. बाकी बोलणारे खूप असतात परंतु शांतपणे ऐकून टाळ्या वाजवणारे रसिक कमीच असतात. त्या निव्वळ रसिक श्रोत्याच्या भूमिकेत आमच्या ट्रिपमधील सुज्ञान वैराळकरताई होत्या.

माजी दूरदर्शन निर्माते, निवृत माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी समुद्रकिनारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी जागवल्या. खरे तर ‘अंदमान सफर’ ही सहलच मुळी देवेंद्र भुजबळ यांनी करण्याचे योजले आणि आम्ही सर्वांनी जसे होईल तसे अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.

प्रत्येक माणसामध्ये खूप गुण सामावलेले असतात ते अशा काही दिवसाच्या ग्रुपच्या सहलीमुळे जाणवतात. हे संपूर्ण ट्रीपमध्ये आम्हाला नेमकं काय पाहायचे आहे, कोणते हॉटेल चांगले आहे वगैरे पर्यटनाचा पूर्ण तपशील खूप खोल अभ्यास करून चंद्रिका ठक्कर यांनी तयार केला.
ॲड स्नेहा ठक्कर हिने ट्रिपविषयी काय लिहून पाठवले ते पाहा –
“अंदमान बेटाचा दौरा साहस, विश्रांती आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. अंदमान बेटांवर पांढरी वाळू आणि स्फटिकासारखे स्वच्छ निळे पाणी असलेले प्राचीन किनारे आहेत. पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेल येथे मार्मिक ऐतिहासिक अनुभव मिळतो. हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची झलक देते. सेल्युलरमधील लेझर लाईट शो चुकवू नका. कैद्यांच्या वेदना आणि यातना स्पष्टपणे चित्रित करून कलाकाराने केलेले हे एक आश्चर्यकारक काम आहे. हे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. दाट जंगले आणि चिखलमय रस्त्यांमधून बाराटांगमधील चुनखडीच्या गुहा पाहणे ही एक साहसाची आणि आनंदाची गोष्ट होती.”

या ट्रीपवरून परतल्यावर मला व्हाट्सअप वर आलेले पंडित शंकरराव वैरागकर, जे त्यांच्या विजया प्रमाणे आमचेही अप्पा झाले, त्यांचे पत्र खूप आनंद आणि प्रोत्साहन देऊन गेले. अप्पानी लिहिले…
“मी शंकर वैरागकर. आम्ही अंदमान-निकोबारच्या ट्रीपमधे प्रतिभा व देवेंद्र जी यांच्यासोबत मी माझी पत्नी आणि मुलगी विजया गेलो होतो. माझ्या संपूर्ण आयुष्यात अशी सुंदर ट्रीप कधीच झाली नाही. राजेशाही ट्रीप म्हटले तरी चालेल. सर्व सोबती सतत हसत खेळत व कसल्याही प्रकारचा आळस नसलेली प्रतिभा… प्रतिभा ही मुळात बाई नाहीच. ते एक यंत्र आहे, आनंदी राहणारे व दुसऱ्यांना प्रोत्साहित करणारे यंत्र म्हटले तरी ते वावगे होणार नाही. सोबत चंद्रिका, स्नेहा, रामअण्णा ही मंडळी म्हणजे अतिशय हौशी व निसर्गाचा आनंद घेणारी व आम्हाला ही सांभाळून घेणारी मंडळी होती.
अंदमानच्या वातावरणात आम्ही स्वर्गीय आनंद घेतला. आठ दिवस आम्ही स्वर्ग म्हणजे काय, याची अनुभूती घेत होतो. तिथली कष्टाळू, शिस्तप्रिय व प्रामाणिक माणसे बघून मी आपल्या महाराष्ट्राशी त्यांची तुलना करून बघितली व खूप काही आपल्यात कमी आहे, असे जाणवले. असो… पण खूप सुंदर ट्रीप झाली. पुन्हा असा योग येईल की नाही सांगता येत नाही, कारण सोबतचे सर्व सोबती खूप एक जीवाचे व सांभाळून घेणारे होते म्हणून हा आनंद आम्हाला घेता आला. मी प्रतिभाताई, देवेंद्रजी व सर्वांनाच खूप खूप धन्यवाद देतो…!
— अप्पा.”

आत्तापर्यंत ‘न्यूज पोर्टल’वर अंदमान सहलीविषयीचे ही मिळून तेरा लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपण त्यातून अंदमानची पूर्ण माहिती घेऊ शकता. याशिवाय प्रत्येक लेखासोबत त्या संपूर्ण पर्यटन स्थळांची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ सुध्दा दिलेला आहे. त्यामुळे ही सर्व माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ याच्या साहाय्याने आपण आपली अंदमान ट्रीप छान आखू शकता किंवा आपण ट्रीपला जाऊन आला असाल तर तो आनंद आणखी एकदा आठवून द्विगुणित करू शकता !

या संपूर्ण सहलीची आठवण एकत्रितपणे पाहण्यासाठी मला जितके फोटो सापडले तितके मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा तऱ्हेने एक व्हिडिओ तयार केला आहे ज्याची लिंक मी खाली देत आहे. या संपूर्ण व्हिडिओला खरे महत्त्व प्राप्त झाले ते म्हणजे अत्यंत आर्त स्वरात विजयाने गायलेले गाणे- सागर किनारे दिल ये पुकारे…

आपण आयुष्यात एकदा तरी अंदमानच्या सागर किनाऱ्याला नक्की भेट द्या. कारण याच मातीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची पायधूळ आहे.
समाप्त.

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूपच छान वर्णन अंदमान सफर तिथे जाऊन काय पाहायचे हे सुद्धा या सर्व लेखांवरून समजते आणि जायची इच्छा तीव्रतेने होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments