दरवर्षी जगातील आनंदी देशांची क्रमवारी प्रसिद्ध होत असते. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट ती प्रसिद्ध करीत असते. २०२६ च्या यादीत पुन्हा फिनलंड ने पहिले स्थान पटकावले. युद्धकाळात देखील इस्रायल देश टॉप टेन मध्ये आहे हे पाहून आश्चर्य वाटले.
आपला देश या यादीत ११६ क्रमांकावर आहे. आणखीन एक आश्चर्य म्हणजे पाकिस्तान आपल्या पेक्षा वर आहे. पहिल्या दहात फिनलंड,आइसलँड, डेन्मार्क, कोस्टा रिका,स्वीडन नार्वे, नेदरलँड,इस्रायल, लक्जेनबर्ग, स्विझरलँड हे देश आहेत. इस्रायल देश युद्धाच्या वणव्यात होरपळतो आहे. हमास, इराण बरोबर त्यांचा भीषण संघर्ष सुरू आहे. तरीही या देशाने टॉप टेन आनंदी देशात आपले स्थान कायम राखले आहे.हे आश्चर्यच म्हटले पाहिजे.
सतत युद्धाच्या छायेत असलेला इस्रायल देश, दहशतवादी हल्ले होत असलेला देश आनंदी कसा राहू शकतो ? भारत इतका मागे का?तसे पाहिले तर आपली अर्थ व्यवस्था बळकट आहे. गेल्या काही दशकात आपण भरपूर तांत्रिक प्रगती केली आहे.सर्वच क्षेत्रात विकास, प्रगती झाल्याचे सांगितले जाते.तसे अहवाल प्रसिद्ध होतात.आपण विश्वगुरु वगैरे असल्याचे,त्या दिशेने प्रगत असल्याचे सांगितले जाते.मग या मानांकनात आपणआपल्या पेक्षा लहान असलेल्या इतर देशांच्या तुलनेत इतके मागे का ?
आपला पेपर आपणच तपासायचा नसतो.आपणच आपल्याला गुण देऊन प्राविण्य मिळवले तर त्याला काही अर्थ उरत नाही.मुळात आनंदी म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. पैसा असलेला प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही.बँकेत लाखो रुपये असताना देखील करोना काळात,मृत्यूच्या छायेत आपण दुःखाच्या छायेत होतो.हतबल झालो होतो.
आनंदाचे जागतिक परिमाण समजून घेतले पाहिजे. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट चे मानांकन बाह्य परिस्थिती, युद्धजन्य स्थिती यावर आधारित नसते.यात नागरिकांचं वैयक्तिक समाधान,सामाजिक आधार,सरकारवरचा विश्वास,नागरी व्यवस्थापन, आरोग्य,आर्थिक स्थैर्य, सामाजिक ऐक्य,प्रामाणिक प्रशासन,अशा प्यारामीटर वर अवलंबून असतो.उदाहरणार्थ इस्रायल हा देश,युद्ध , दहशतवाद, राजनितिक कोंडी अशा आव्हानांना तोंड देत असला,तरी तो समाज एकसंघ आहे.तिथली अर्थ व्यवस्था( तेल संपत्तीमुळे) मजबूत आहे.दर डोई उत्पन उच्च पातळीवर आहे.तिथली आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. या लहानशा देशाने विस्मयकारक तांत्रिक प्रगती केली आहे. आपल्या पेक्षाही कितीतरी पटीने जास्त.तिथले लोक संकट काळात एकजुटीने राहतात.एका भाषेत,एका सुरात बोलतात. एकमेकांना मदत करतात.देश कितीही संकटात असला तरी समाज,सरकार पाठीशी आहे. एक दुसऱ्या च्या मदतीला धाऊन जाणार हा विश्वास आहे जनतेत.ही एकजूट महत्वाची असते देशाच्या सांघिक शक्तीसाठी, आनंदाच्या परिमाणासाठी. प्रतिकूल परिस्थितीत देखील न डगमगता,एकमेकांना सावरून घेत,सरकारला सहकार्य करीत ते आपला मार्ग निवडतात. म्हणून आनंदी असतात. उलट संकटात त्यांची एकजूट वाढते. देश अधिक बलवान होतो.मानसिक दृष्ट्या समाज अधिक सक्षम होतो.
जे देश या स्पर्धेत मागे पडले तिथे आर्थिक प्रगती दिसत असली, तरी समाजात एकटेपणा दिसतो. नाती बळकट नसतात. नाते संबंधात ओलावा नसतो.सरकार अन् जनता वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत असतात.त्यांच्यात ट्युनिंग चा अभाव दिसतो. मुख्य म्हणजे कुणाचाच कुणावर विश्वास नसतो.
आपली शक्ती एकमेकांना नावे ठेवण्यात च खर्ची होते. आम्ही मोठे,आम्ही श्रेष्ठ, आमचेच खरे, जे काही केले ते आम्ही,तुम्ही काहीच केले नाही.. या अशा मग्रुरीत आपले सरकार, आपला समाज रममाण असतो.नाते संबंधाततला तणाव, सोशल मीडियाचा विकृत प्रभाव, प्रत्येक स्तरावरचा भ्रष्टाचार, समाजात एकमेकांना कमी लेखण्याची प्रवृत्ती, जाती धर्म भेदाने वाढलेली दरी..हे सगळे आपल्या सुखाच्या,आनंदाच्या आड येते.आपल्यात प्रचंड क्षमता,ऊर्जा,प्रतिभा असूनही आपण एकसंघ नसल्याने, आपले सामाजिक जीवन तुकड्या तुकड्यात विभागले गेल्याने देश म्हणून आपली एकत्रित शक्ती,ऊर्जा कमी पडते.आपल्या दुःखाला, असमाधानाला कारणीभूत ठरते.आपण दुसऱ्याचे ऐकून घेण्यापेक्षा, दुसऱ्यालाही मान देण्यापेक्षा आपली स्वतःचीच टिमकी वाजविण्यात धन्यता मानतो.सरकारचे तोंड एका दिशेला,जनता दुसऱ्या दिशेला असा प्रकार असला की विश्वासाला तडा बसतो.
किंबहुना आजकाल राजकारण इतके गढूळले आहे, खालच्या पातळीला गेले आहे की जनता देखील हतबल झाली आहे. सगळे काही वाईट चालले आहे, घोषणांचा बडेजाव, प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे, मूठभर वर्गाची, त्यातही सत्तेत गेलेल्यांची गगनाला भिडणारी उन्नती अन् सामान्य गरीब जनता मात्र जिथल्या तिथे..ही आपली वस्तुस्थिती!आपण आनंदी देशाच्या यादीत मागे आहोत याचे हे कारण आहे.
आपल्या कडे गेल्या काही वर्षात फक्त संख्या वाढ झाली. पण त्या प्रमाणात गुणवत्ता वाढली नाही.उलट इतर प्रगत देशांच्या तुलनेत ती घटली.शिक्षणाच्या क्षेत्रातले उदाहरण बोलके म्हणता येईल. आय आय टी, एन आय टी, मेडिकल कॉलेजेस, खाजगी सरकारी विद्यापीठे यांची संख्या कितीतरी पटीने वाढली. पण शिक्षणाचा दर्जा पूर्वीसारखा राहिला नाही हे कटुसत्य आहे. युरोपातील छोटे छोटे देश देखील तिथले शिक्षण, तिथले संशोधन, तिथले नोबेल विजेते….या सर्वच बाबतीत आपल्या कितीतरी पुढे आहेत. आपण आपल्या भूतकाळातील कामगिरीचा पोवाडा गाण्यातच धन्यता मानतो अजूनही. चीन, कोरिया, सिंगापूर, जपान, जर्मनी, नेदरलँड,अशा देशापेक्षा देखील संशोधनाच्या बाबतीत, तांत्रिक प्रगतीच्या बाबतीत, स्वावलंबनाच्या बाबतीत आपण मागे आहोत. हे वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या विविध मानांकनातून साधार सिद्ध होत असते. यातून आपण कधी शिकणार, आपले डोळे कधी उघडणार हा खरा प्रश्न आहे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
