१. पाणी
संथ पाणी, टाकता खडा ….
उमटती किती तरंग
परी नाही कळली खोली
नाही कळला मनाचा थांग ….
हळूच फुंकर मारता
हळूवार हलतो आंत आंत
पुन्हा होतसे शांत शांत
नितळता तुझ्या मनाची …..
झाडाचे पडते प्रतिबिंब
जणू दावितो स्वच्छ आरसा
टिपले बघ तुझीच छबी
न्याहाळ, कधी स्वतःचे बिंब ?
कधी हरवून जातोस स्वतः ला
दिसतोस किती सुंदर नितांत
नाही हाक मारिले बघ तुला
पाहण्यातच रमले निवांत …..
तासन् तास पहावे तुझ्याकडे
आवडती तुझे रंग तरंग
तव निरामय शीतल सहवासात
सुखावते मज अंतरंग ……
२. सांजवेळ
सांजवेळ ही
होते कुंद वातावरण
सुटला वारा हलकासा
हुरहुरल्या आशा जराशा ..
बाहेर साद आली कानी
विस्तीर्ण बागेत या क्षणी
वरती विशाल आकाश
उभी हिरवळीत मी ……
गुदगुल्या करी मज पायास
हरित तृणांच्या या मखमाली
तृण फुलांची गर्दी पाहुनी
मन माझे गेले हरखूनी….
ऋतु बदलाची ही तर नांदी
पालटेल रुप निसर्गाचे
माझीच मी नव यौवना
फूलवूनी पिसारा नाचले रे
— रचना : डॉ. प्रभा वाडकर. लातूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वा खूप छान रचना 👌👌👌👌