Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

“सहजीवन”

नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी बागेत फिरायला गेले. एकटीच . कारण आता मी एकटीच आहे.बागेत जावे, एक फेरी मारून सगळ्या झाडा, पाना, कळ्या,फुलांचे निरीक्षण करावे, आज काय नवीन बघावे आणि बाकावर निवांत बसावे हा माझा शिरस्ता. बाकावर बसले की पाणी प्यावे, एखादे चॉकलेट खावे आणि पर्स मधून पुस्तक काढून तास भर शांतपणे वाचावे किंवा लेखन करावे अशी माझी सवय आहे. पुस्तक वाचत असल्यामुळे कोणी अनोळखी माझ्या आजूबाजूला फिरकत नाही किंवा व्यत्यय आणत नाही.
वरवर दाखवले नाही तरी कदाचित मनातील एकटेपणा, उदासी चेहऱ्यावर दिसत असावी. कोणाचा तरी सहवास असावा असे त्यातून व्यक्त होत असावे.

त्या दिवशी मी अशीच बसले होते . माझ्या पलीकडच्या बाकावर तो बसला होता. शांत, एकटा. बरोबर कोणी नाही. त्याच्याही चेहऱ्यावर एकटेपणा,उदासीनता पाहून माझे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याच वेळी आमची नजरानजर झाली.त्याने किंचित चुळबुळ केली आणि काय वाटले कोण जाणे, तो हलकेच माझ्या बाजूला येऊन शांतपणे बसला. माझ्या मनात आले बहुतेक त्यालाही मैत्रीची ओढ वाटत असावी. पण बोलणार कसे !
मी हळूच माझा हात बाकावर ठेवला आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिले. त्याला तेव्हढा इशारा पुरला आणि त्यानेही त्याचा हात माझ्या हातावर ठेवला. मी तो हात कुरवाळला. मने जुळली. मी पुस्तक बंद करून घरी जायला उठले. सावकाश पावले टाकत होते. घरी जायची घाई नव्हतीच. काही पावले गेल्यावर मागे वळून बघितले तर तो माझ्या मागे येत होता.अगदी घरापर्यंत आला. घरात शिरून मी दार बंद करणार तेव्हड्यात तो आत आला आणि खुर्चीवर बसला.आधी बसला, मग माझ्या कडे बघितले. जणू मूक परवानगी घेत होता. संभाषण नव्हतेच. मी त्याला दुसऱ्या खोलीत बिछाना घालून दिला. तो निमूटपणे जाऊन झोपला.

असे आमचे सहजीवन सुरू झाले. तो शांत आहे, मागण्या काही नाहीत.पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. तरी दार उघडे असले की तो सतर्क असतो, दाराकडे लक्ष असते. रात्री पूर्ण घरातून फेरी मारून सुरक्षिततेची खात्री करून मगच झोपतो. सकाळ, संध्याकाळ आम्ही दोघे बरोबर फिरायला जातो.

माझ्या ह्या नवीन साथीदाराकडे लोक कुतुहलाने बघतात. पुन्हा वळून कदाचित असूयेने बघतात.कारण तो आहे मोठा रुबाबदार,देखणा. त्याची ती रेश्मासारखी मऊ फर, चकाकणारा मोतिया रंग, गेंदेदार केसाळ शेपूट. सदैव उभे कान, कपाळावरचा चॉकलेटी ठिपका खूप आकर्षक आहे. ते पाहून तर मी त्याच्याकडे आकर्षित झाले होते.अव्यक्त उदासी आणि एकटेपणाने आम्हाला एकत्र आणले. आता उदासी, एकटेपणा नाही. दोघं एकमेकांच्या सहवासात निर्धास्त जीवन जगत आहोत.

सुलभा गुप्ते

— लेखन : सुलभा गुप्ते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments