१.
माझ्या कवितेचे संदर्भ
मलाच माहीत नसतात.
माहीत असतं एवढंच
त्या काही क्षणाना
ती माझी नसून
मीच तिची असते.
२.
मन थकलेलं
मन भागलेलं
मन आसुसलेलं
मृगजळाकाठी
मन तहानलेलं
३.
पापाणीतले चंद्र गेले बुडून
बुडता बुडता त्यांनी
फांदीवरचे झुबके
नेले खुडून
दुखऱ्या देठामधून गळती
थेंब दवाचे खाली
आदीम त्या लाटेतून
उमटे चित्र अगोचर
गंधगाभाऱ्या तळी
४. ऋतुचक्र
पाने सुवर्ण होऊन
तरुतळी विसावली.
वर हासतात फुले
रत्नझळाळी ल्यालेली
आज हासतात फुले
उद्या माती चुंबतील
हसू शाश्वताचं त्यांचं
रस फळांचा होईल
रस जोजवेल बीज
बीज तरु अंकुरेल
पाना- फुलांचा संभार
वृक्ष समर्थ पेलेल
पुन्हा झडतील पाने
फुले मातीत जातील
फळ जोजावेल बीज
बीज वृक्ष प्रसावेल
— रचना : उज्ज्वला केळकर. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800