Sunday, March 23, 2025
Homeलेखकुसुमाग्रज - एक प्रेरक व्यक्तिमत्त्व

कुसुमाग्रज – एक प्रेरक व्यक्तिमत्त्व

विश्वाच्या पाठीवर असा एकही मराठी भाषक नसेल की ज्याने कुसुमाग्रजांची कविता वाचली वा अभ्यासिली नसेल. त्यांच्या प्रतिभेने मराठीतील कुठलाच साहित्यप्रकार अस्पृष्ट ठेवला नाही. मराठी भूमी, मराठी भाषा व संस्कृतीवर त्यांचे अलोट प्रेम होते ते त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेले दिसते. त्यांच्या अद्वितीय, अलौकिक प्रतिभेमुळे ते महाराष्ट्राचे दैवतच बनले; आणि २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिनांक मराठी राजभाषादिन म्हणून साजरा होण्याचे भाग्य त्यांना लाभले. या दिवशी त्यांच्या सहवासात वेचलेल्या अनेक क्षणांच्या स्मृतींची मनात दाटी होते. त्यांतील काही व्यक्त करण्याचा मोह आवरता येत नाही.

कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर ) तथा तात्यासाहेब हे योगी अरविंदांसारखे द्रष्टे साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यात उच्च दर्जाचे कवित्व आणि ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल’ पाहण्याचे भविष्यवेत्तेपणही आढळते, समाजभान ठेवून लिहिणारे ते श्रेष्ठ साहित्यिक होते. द्रष्टेपणात हे दोन्ही विशेष अन्तर्भूत आहेत.

त्यांना प्रथम १९५६ मधे मी औरंगाबाद साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पाहिले. त्यांच्या साध्या शर्ट पायजम्यातील रूपात मला साध्या भोळ्या आणि विनम्र तुकोबाचेच दर्शन घडले.
त्यांची ‘अहिनकुल’ ही कविता त्यांच्या तोंडून मी ऐकली. वाचिक वा शारीरिक अभिनयाची साथ न घेता त्यांच्या सादरीकतील नुसत्या शब्दांतून अहिनकुलाचे द्वंद्व वा जिवंत संघर्षचित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. हे खरे कवीचे सामर्थ्य आणि कवितेचे अस्सलपण. त्यांचा परिचय व्हावा ही तेव्हापासूनची इच्छा १९९१ मधे पूर्ण झाली.

माझा मुलगा नाशिकला टिळकवाडीतील जलतरण तलाव- रस्त्यावर रहात होता. त्याच्या घरासमोरच तात्यासाहेबांचा निवास नि ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ चे कार्यालय होते; माझे मेहुणे कै. मधुकरराव काण्णव हे प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून वेळ ठरवून मी तात्यासाहेबांना भेटलो. ‘माझा परिचय मेहुण्यांनी आधीच करून दिलेला असल्याने त्यांनी “काहीतरी ऐकवणार ?” या प्रश्नानेच बोलायला सुरुवात केली. एक दोन कविता ऐकवल्या आणि नाळ जोडली गेली. जुना व दृढ परिचय असल्यासारख्या मुक्त गप्पा झाल्या. देवाने उचलून हृदयाशी धरल्या चा आनंद झाला..

एरव्ही बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत जाताच समोरच ते आसनस्थ बसलेले दिसत, निवांत बसलेले जरी दिसले तरी ते विचारमग्न असत. एकटक नजरेतून तेव्हा विचारवादळे बाहेर येताहेत असे वाटे. अशा वेळी त्यांच्यासमोर जाण्याचे धाडस सहसा कोणी करत नसे. जेव्हा त्यांच्या हातात एखादे पुस्तक वा नुकत्याच लिहिलेला कवितांचा कागद दिसे तेव्हा मात्र बिनदिक्कत उंबरठा ओलांडून आत जाता येई. विचारात कितीही गर्क असले तरी चाहूल लागताच ते हसून स्वागत करीत. नव्याने लिहिलेले ऐकायला मिळे. माझे मित्र प्रा. डॉ. यशवंत पाठक व त्यांचा भाऊ यांच्या बरोबर मी अनेकदा त्यांच्याकडे जाऊन कवितांची मैफिल जमवत आनंद लुटत असे.

एकदा मी आणि माझे भुसावळचे मित्र प्रा. अडावदकर सपत्नीक त्यांच्याकडे गेलो होतो. त्या दिवशी तात्यासाहेब खूपच खुश दिसले. नित्याप्रमाणे सरबत समोर आले. त्यांनी खुर्चीवरून उठून आम्हास आजवर मिळालेल्या पुरस्कारांची सन्मानचिन्हे जातीने दाखविली. खरेतर बहुमानाची निर्जीव प्रतीके दाखविण्यासाठी ते क्वचितच उठत. एवढेच नव्हे, तर नुकतीच लिहिलेली’ ‘फक्त लढ म्हणा’ ही कविताही त्यांनी आम्हाला ऐकवली. तो आमचा बहुमानच होता. दिवसभर त्यांच्याकडे चाहत्यांची ये जा असे. त्यांत कै. यशवंतराव चव्हाण,डांग सेवा मंडळाचे अध्यक्ष कै. दादासाहेब बिडकर तिथे येऊन गेलेले मी पाहिले आहेत.

विख्यात साहित्यिक एव्हढाच त्यांचा परिचय अपुरा आहे. ते कृतिशील समाजसुधारकही होते. दुःख दारिद्ऱ्याने गांजलेल्या, परिस्थितीने मारलेल्या खेड्यापाड्यातील आदिवासी समाजाचे उन्नयन करण्यासाठी त्यांनी ‘ कुसुमाग्रज प्रतिष्ठाना ‘ची स्थापना केली. अनेक आदिवासी खेडी दत्तक घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाची कामे हाती घेतली. शिक्षण, अन्नपाणी इ. सुविधा आधी पुरविल्या की समाज आपोआप सुधारतो हा त्यांचा विश्वास. शिरूर जवळ राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनीही लष्करातून निवृत्ती घेऊन ग्रामसुधारणेचे कार्य हाती घेतलेले मला माहीत होते. त्यांच्या प्रशालेतील काही शिक्षक माझ्या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असल्याने माझे तिथे जाणे येणे होत असे. अण्णांच्या कार्याचा परिचयही झाला होता. आधी समाज सुधारावा, बऱ्या बोलाने ऐकले नाही तर शिस्तीचा बडगा उभारावा आणि नंतर त्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवाव्यात हा त्यांचा दृष्टिकोन. ध्येय एकच पण कुसुमाग्रज व अण्णा हजारे यांचे मार्ग वेगळे आहेत हे मला जाणवले. माझ्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची दोन शिबिरे आम्ही तिथे घेतली तेव्हाच मी त्या दोन ग्रामसुधारकांची भेट घडवून आणवी, परस्परांचा संवाद व्हावा असे मला वाटू लागले. मी व प्राचार्य डॉ कडवेकर अण्णांना घेऊन तात्यांकडे गेलो .ती भेट घडवून आणल्याचे मोठे समाधान मला मिळाले. थोडक्यात कवी असल्याने समाजाला पाठीवर हात फिरवून आईच्या ममतेने सुधारण्यावर कुसुमाग्रजांचा भर तर वडिलांच्या कर्तव्यकठोरतेने करड्या शिस्तीत समाजाला बदलावे ही अण्णांची दृष्टी. परस्परांच्या संवादातून कोणाकडून कोणी काय घेतले हे बघण्याचे माझे काम नव्हते.

प्रतिष्ठानाच्या कार्याने मी प्रभावित झालो होतो. पाचेक वर्षे आधी निवृत्ती घेऊन इथे सेवा द्यावी असे मनाने घेतले. १९९३ मध्ये निवृत्ती घेतलीही. कुसुमाग्रजांना मानस कळविला. त्यांनी एक सल्ला दिला, “इथे येण्यापेक्षा डांगसेवा मंडळ या नाशिकच्या सर्वात जुन्या शिक्षणसंस्थेने आदिवासी विभागात पेठ येथे नुकतेच एक महाविद्यालय सुरू केले आहे. त्यांना प्राचार्य मिळाला नाही. तू तेथे रुजू हो.” काम केल्याचे खरे समाधान मिळेल. मी ते काम स्वीकारले. पायाभरणीचे – इमारत, ग्रंथालय उभे करून अनुदान मिळविण्या पर्यंतची सर्व कामे पूर्ण केल्याचे समाधान मी मिळवू शकलो. एवढेच नव्हे तर वणीच्या पायथ्याशी अभोणा येथे ही महाविद्यालय सुरू करून दिले. ९३ ते ९८ ही आयुष्याची पाच वर्षे कुसुमाग्रजांच्यामुळेच कारणी लागली.

समाजहितासाठी झटणे हे जसे त्यांचे ध्येय होते तसेच अन्यायाविरुद्ध लढा देणे हेही तात्यांच्या रक्तात होते. मराठी माती, मराठी माणूस, मराठी भाषा यांवर त्यांचे अलोट प्रेम होते. त्यांवर अन्याय झाला की ते पेटून उठत हे मी जवळून पाहिले आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रत्येक राज्याने आपल्या मातृभाषेवरील प्रेमामुळे तो विषय सक्तीने अभ्यासक्रमात समाविष्ट केला. महाराष्ट्रात विद्येच्या माहेरघरी, मराठी भाषा, साहित्य यांच्या संगोपन- संवर्धनास प्राधान्य देण्याचा हेतू पुढे ठेवून स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठात मात्र काही धुरीणांनी मराठी विषय अभ्यासक्रमातून हळूहळू हटविण्याचा खटाटोप चालविला. शालांत परीक्षेपर्यत तो सक्तीचा असला तरी चालेल. लिहिण्या बोलण्यापुरते त्याचे ज्ञान सर्वांना असतेच. तो काय महाविद्यालय, विद्यापीठामध्ये शिकायचा विषय आहे ?
या धोरणामुळे विज्ञान, वाणिज्य विद्याशाखातून तो हटविला गेला. कला विद्याशाखेतही तो ऐच्छिक घेतला तरी चालेल असे प्रयत्न सुरु झाले. मराठीला दुय्यम ठरविले गेल्यामुळे त्या विषयास विद्यार्थी येईनासे झाले, शिकविण्याचे तास कमी झाले. मराठी शिकविणाऱ्या अनेक प्राध्यापकांना घरी बसावे लागले. मराठी भाषा आणि अध्यापक यांवर होणाऱ्या अन्यायाची झळ अनेकांना बसली. तेव्हा १९७२ मध्ये आम्ही मराठीचे सर्व प्राध्यापक शिबिराच्या निमित्ताने फर्ग्युसन कॉलेजमधे एकत्र आलो. मराठी अन्याय निवारण परिषदेची स्थापना केली. जिल्हावार समित्या नेमल्या. परिषदेची कार्यकारिणी नेमली गेली. तिच्यात विद्यापीठातील डॉ. भा. दि. फडके, पुण्याच्या फर्ग्युसनमधील प्रा. डॉ. गं. ना. जोगळेकर, नाशिकचे प्रा. वाय. पी कुलकर्णी, जळगावचे प्रा. सु का. जोशी, धुळ्याचे प्रा. चित्ते., साक्रीचे प्रा. जगताप, भुसावळचे प्रा. अडावदकर आणि मीही होतो. पुणे जिल्हा निमंत्रक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली गेली.

प्रत्येक जिल्ह्यातील समितीने शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्य संस्थात जाऊन मराठी भाषेची आवश्यकता, अपरिहार्यता समजावून सांगावी ती कार्यालयीन भाषा व्हावी, महाराष्ट्रात तिच्यावर कसा अन्याय होतोय हे पटवून द्यावे,होणारा अन्याय दूर करणारे ठराव संमत करून ते शासनदरबारी पोचविण्यासाठी परिषदेकडे पाठवावेत असे कार्य सुरू ठेवण्याचे ठरले. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्रा. गं. बा. सरदार आणि मराठीतील थोर साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली. कुसुमाग्रजांनी पाठबळ दिले आणि त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली आमचे कार्य सुरू झाले. १९८६ साली परिषदेचे अधिवेशन नाशिक येथे कालिदास रंगमंदिरात घेतले गेले. प्रा. गं. बा. सरदार अध्यक्ष होते. ते आणि कुसुमाग्रजांनी केलेल्या भाषणांतून विरोधकांचे कंबरडेच मोडले.

या अधिवेशनात माय मराठीचा अभिमान व्यक्त करणारी कविता कविवर्यांनी मला लिहायला सांगितली होती. ती लिहून मी तिथे सादरही केली. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेशिवाय ‘माय मराठी’ ही कविता लिहिली गेली नसती. मराठी राजभाषा- दिनी (कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी) आज ती अनेक ठिकाणी गाऊन सादर होत असल्याचा मला आनंद वाटतो.


माय मराठी

परमहंस पावलांची
माय मराठीची चाल
प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोल, ताल—

मराठीच्या संस्कारांनी
गर्भातच घडे काया
रक्ति वाहे हळुवार ओवी, अभंगाची माया
जन्मताच इथे पडे गळां सात्त्विकाची माळ—

सरस्वती ममतेने गाते
अंगाईची गीते
देहातील मृत्तिकाही जिते बाळसे धरीते
सळसळत्या उत्साही चुंबी पांडित्याचे भाळ—

उभे ज्ञानाचे डोंगर अनंताशी संवादिती
माझ्या कुडीतून पेटे माय मराठीची ज्योती
जागरण घडवाया होते
शाहिरी मशाल—–

घरातील जाते, जोते
अंतर्मुख निरंतर
मराठीच्या पायतळा
गीता वाचतो ईश्वर
ब्रह्मविद्येचा सुकाळ,
तिने व्यापिले आभाळ–

— लेखन : प्राचार्य सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments