Homeयशकथाजिचं तिचं आकाश : 23

जिचं तिचं आकाश : 23

“नंदिनी जोशी”

पाठांतर ही अशी गोष्ट आहे की, ती सगळ्यांना जमते असं नाही. त्यासाठी लागते चिकाटी, आवड, श्रध्दा, सातत्य… हे सर्व गुण नंदिनी जोशी यांच्याकडे आहेत. म्हणूनच त्या ५ वर्षांपूर्वी जेव्हा FHDA ह्या संस्थेशी जोडल्या गेल्या तेव्हा त्यांनी अक्षरशः त्या कार्याला वाहून घेतले. ही सगळी स्तोत्र त्यांनी पाठ केली आहेत.ती म्हणण्यासाठी त्या अनेक ठिकाणी जाऊन आल्या. ८०० च्या वर महिला ह्या पठणात भाग घेतात.

शिव तांडव स्तोत्र, वाराणसी राम तांडव स्तोत्र, रामेश्वर काली तांडव स्तोत्र, कोलकाता हनुमान तांडव स्तोत्र, हंपी कृष्ण तांडव स्तोत्र, कोची अन ३० -३१ जानेवारी २०२६ रोजी त्या गोहाटी (आसाम) येथे गौरी तांडव स्तोत्र पठण करून आल्या आहेत. त्या सांगतात,“आज मी जी काही आहे, ती परिपक्वता अनेक कडू गोड अनुभवांमुळे माझ्यात आली आहे. माझे शिक्षण एका ज्यू धर्मीय शाळेत झाले. कारण ती एकच शाळा माझगावला आमच्या घराजवळ होती. त्यांचा जेव्हा हिब्रूचा तास असे तेव्हा आम्हा हिंदू मुलांना रामरक्षा शिकवत. तीच आवड बहुतेक आजच्या तांडव स्तोत्र शिकण्यासाठी उपयोगी पडते. विशेष म्हणजे राम तांडव स्तोत्र पठणानंतर राम मंदिर बांधकामाला परवानगी मिळाली हा योगायोग.

आमच्या गुरु व संस्थापक सभासद सौ. माधुरी सहस्रबुद्धे ह्या दिल्ली स्थित असल्या तरी आम्हा सर्व विभाग प्रमुखांना त्या ही सर्व स्तोत्र साधारण चैत्र पाडव्याला शिकवायला सुरवात करतात. नंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते साधारण ११०० ते १२०० सभासदांना सर्व शिकवतो. हे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने होते. स्त्रियांस शिक्षण दिले जाते पण त्या त्यातून जीमेल, गूगल मीट, झूम वर कसे जॉइन व्हायचे, रजिस्ट्रेशन फी भरणे,फॉर्म भरणे वगैरे सर्व गोष्टी त्या शिकतात. घरातील तिसरी पिढी सुद्धा अचंबित होते. म्हणजे मातृशक्तीचा प्रत्यय जिला तिला येतो. आपल्या सुप्त शक्तीचा प्रत्यय येतो.म्हणजे धार्मिक गोष्टीं बरोबर आधुनिक माध्यम तंत्राचे शिक्षण आपोआप होते. जेव्हा एखादी ६०/७० वयाची स्त्री सभासद होते, आपल्या नातवंडाबरोबर चर्चा करते, नवनवे शिकायची इच्छा प्रदर्शित करते तेव्हा तर तिला हा बदल खूपच जाणवायला लागतो. म्हणून तर आमचे ब्रीद आहे, “मातृशक्तीचे तांडव”!
ही सर्व स्तोत्रे शिकून, शिकवून, पठण करून एक प्रकारची ऊर्जा मिळते त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. हे अनुभवणेच उत्तम !

नंदिनीताईंची शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयात जाऊन मराठी /संस्कृत विषयात पदवी घेण्याची ईच्छा होती. १५ व्या वर्षी त्या अकरावी उत्तीर्ण झाल्या. पण नोकरी शोधणे अनिवार्य होते. सरकारी नोकरी १८ वय पूर्ण झाल्याशिवाय मिळत नव्हती म्हणून चिट फंड कंपनीत, फोटोग्राफीच्या दुकानात त्यांना नोकरी करावी लागली. त्या दुकानातल्या नोकरीमुळे छायाचित्रणाची आवड लागली. खूप काही माहिती मिळाली. पण महाविद्यालयीन शिक्षणाची आस गप्प बसू देत नव्हती.
अन आयुष्याने कलाटणी घेतली. अनेक संस्थाना, विद्यार्थ्याना मदत करणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली अन त्यांचा शिक्षणाचा मार्ग खुला झाला. त्या व्यक्तीकडून, “तुला कितीही शिकायचे तेवढे शिक“ असे आश्वासन मिळाले अन त्यांचे मन आनंदात न्हाऊन निघाले.

तो महिना होता ऑगस्ट, पण महाविद्यालये जून मधे सुरू होतात. म्हणून त्यांनी टाइपिंग, शॉर्टहॅंड,पर्सनॅल सेक्रेटरी, टेलीफोन ऑपरेटर, आयकर, विक्रीकर असे छोटे छोटे कोर्सेस करून वेळेचा सदुपयोग केला. नंतर जून मधे विल्सन महाविद्यालयात कलाशाखेत प्रवेश घेतला. आयुष्यात एक नवीनच वळण आले. ज्यांनी नंदिनीताईना शिकण्यासाठी मदत केली त्यांच्या सौभाग्यवतीना अमरनाथला जायचे होते पण कोणीतरी तरुण सहकारीची मदत हवी होती. त्या साठी त्यांनी नंदिनीताईना विचारताच त्यांनी नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. अशा रितीने त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी हिमालयातल्या प्रवासाचा योग जुळून आला. एकदा हिमालयाचे दर्शन झाले की “साद देती हिमशिखरे, शुभ्र पर्वतांची“

खरोखरच अमरनाथ यात्रेमध्येच प .पू. अनंतराव आठवल्यानी कैलास मानस सरोवर यात्रेचे बीज पेरले. तोच ध्यास घेऊन १९९० मध्ये जाण्याचा योग आला. त्या करता त्यांनी १६ सोमवार व्रत केले होते. शेवटच्या बॅचमधे त्यांना सरकार कडून बोलवणे आले .मग दिल्लीला आयटीबीपी हॉस्पिटल मधे सर्व चाचण्या झाल्या अन पुढे कैलास मानसरोवर यात्रा ९ जुलै १९९० ला सुरू झाली. तो अनुभव म्हणजे नंदिनीताईंच्या आयुष्याचा सर्वोच्च बिंदू होय. त्यांचे वजन आधीच १६ सोमवार व्रताने ५० किलो झाले होते. ते ह्या यात्रेत ४७ किलो झाले. पण मनाची ताकद दुप्पट वाढली होती.

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन त्या पदवीधर झाल्या, ते ही प्रथम श्रेणीत ! चांगले गुण मिळावेत असे स्वप्न देखील त्यांनी कधीच पाहिले नव्हते ! पुढे शिकायचे होते म्हणून त्यांनी एम ए ला प्रवेश घेतला. त्याच वर्षी त्यांचा विवाह निश्चित झाला. सासरची मंडळी उत्तम होती. एम.ए. पूर्ण झाल्यावर शासकीय विधी महाविद्यालया प्रवेश घेतला पण बाळाची चाहूल लागली अन् तिथेच त्यांचे शिक्षण थांबले.

नंदिनीताईनी थोडे दिवस बाल संगोपन, बाळ लीलांचा आनंद घेतला.पण त्यांच्या स्वभावात शांत बसणे नव्हते. म्हणुन जेव्हा नाशिकचे वडिलोपार्जित घर विकले, तेव्हा त्या त्यांच्या आजे सासूबाईंनी केलेले मोत्यांचे घेऊन आल्या. कारण त्यांच्या आईची ती एकच आठवण होती. ती फ्रेम पाहून त्यांनी अनेक तबकं तयार केली आणि सर्व नातेवाईकांना दिली.पण त्यांना सगळेचम्हणू लागले, “अग आता त्या विकत दे“ संधी चालून आली. एका पोर्तुगालच्या माणसाला आर्ट गॅलरी सुरू करायची होती. म्हणुन त्याने १० वेगवेगळ्या फ्रेम्सची ऑर्डर दिली. दुसरे म्हणजे त्यांच्याच सोसायटी मधील एकीला दुबई फेस्टिवल साठी त्या फ्रेम्स हव्या होत्या. ती पण ऑर्डर पूर्ण केली. असे सुरू असतानाच आयुर्वेदाचे वेड असलेल्या त्यांच्या यजमानांनी शिकेकाई, उटणे, अभ्यंग तेल असे तयार करणे सुरू केले. उत्पादन झाले आता विक्री करायची म्हणून लोकमान्य सेवा संघात ग्राहक पेठेत व मीनल मोहाडीकर आयोजित अनेक ठिकाणी स्टॉल घेऊन १० वर्ष त्यांनी विक्री केली. दिवाळीसाठी गिफ्ट बॉक्स तयार केले. गिरगाव पासून बोरीवली पर्यंत अनेक दुकानात ह्या वस्तू विक्री करता ठेवल्या. पण सर्वात मोठे त्यांचे गिऱ्हाईक केसरी टूर्स कंपनी होती. दुसरी एक पुण्याची औषध कंपनी होती .तीही बऱ्यापैकी माल घेत असे. बाकीच्या वेळेत नंदिनीताईनी अनेक जणीना विष्णु सहस्र नाम शिकवलं आणि अजूनही शिकवत असतात. हे एक प्रभावी स्तोत्र आहे ह्याचा प्रत्यय त्यांना त्यांच्या यजमानांच्या दुर्धर आजारपणात आला.

नंदिनीताई मोत्यांचा अनेक गोष्टी करत असत. विवाहाकरता मुंडावळ्या, कलश, नारळ, सुपाऱ्या, महिरपी, तोरण, मोत्यांचे आकाश कंदील, स्वस्तिक, गणपतीत मोत्यांचे मोदक, संक्रांतीला मोत्यांचे पतंग वगैरे. त्या जेव्हा पाँडिचरीला गणपती मंदिरात गेल्या तेव्हा त्यांनी केलेल्या मोत्यांच्या १११ मोदकांचा नैवेद्य दाखवून आलेल्या सर्वांना ते प्रसाद म्हणून दिले. जी संधी येईल ती हातची न घालवता तिचे सोने करण्याची ईच्छा असते अन् म्हणूनच वयाच्या ७५ व्या वर्षी सुध्दा नवीन नवीन गोष्टी शिकण्यापासून कोणीही त्यांना परावृत्त करू शकत नाही. “पण हे सर्व शक्य झाले ते परमेश्वराचे अधिष्ठान आहे म्हणूनच. त्याची ईच्छा आहे म्हणून तो माझ्या कडून करवून घेतो” असे नंदिनीताई म्हणतात.

नंदिनीताईच्या यजमानांना नाटक, चित्रपट, पुस्तक वाचन, सांस्कृतिक कार्यक्रम ह्यांची प्रचंड आवड आहे. मुंबईत कुठेही चांगले कार्यक्रम असले कि ते हजेरी लावतात. त्या सर्वांचे नंदिनीताई उत्तम रसग्रहण करून ते त्या लिहितात. मंडळात कार्यक्रमांचे निवेदन करतांना ह्या सर्व अनुभनांचा त्यांना उपयोग होऊन त्यांचे निवेदन उत्कृष्ट होते. कुठलाही अनुभव घ्यायला त्या हसतमुखाने तयार असतात. एका जाहिरातीमध्येही त्यांनी काम केले होते. सामाजिक कामांची त्यांना आवड आहे. मंडळातल्या सर्व पदांवर त्यांनी काम केले आहे. कोणालाही, कसलीही मदत हवी असली तर त्या नेहमीच, मदत करत असतात. ह्या मदतीचे स्वरूप कसे असते ? त्या सांगतात, “सर्वांचे सखी मंडळ, लोकमान्य सेवा संघाच्या स्त्री शाखा इथे काम करताना खूप शिकायला मिळाले. सामाजिक कामाची आवड ही मी आणीबाणीत केलेल्या कामाची देणगी आहे !
ह्या आणीबाणीमधे मी एक छोटेसे काम केले. ज्या पुढाऱ्याना जेल मधे टाकले होते ते एकटेच कमावते असल्यामुळे घरी सर्वांचे हाल होत होते. अशा परिस्थितीत समाजवादी नेते लादीवाले साठे, प्रभुभाई संघवी, एस. एम.जोशी हे आर्थिक मदत करणार होते. पण प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष मदत करणारी कोणीतरी व्यक्ती हवी होती. अन ते सत्कर्म करण्याचे भाग्य नंदिनीताईना लाभले. उत्तम सामाजिक कार्यकर्त्याशी ओळख झाली.

रोज ५ घरी जाऊन महिन्याचे २५ दिवस त्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली ह्या दरम्यान फिरून प्रत्येक घरी जात. फक्त पाकीट हातात ठेवले की निघून यायचे. बोलाचाली काहीही करायची नाही. चहापाणी काहीही नाही, अशी सूचना त्यांना सुरवातीलाच देण्यात आली होती. अन्यथा त्यांनाही तुरुंगात टाकले जाण्याची शक्यता होती. त्यात नुकताच त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे हे काम गुप्तपणे होणे अत्यावश्यक होते. म्हणून नंदिनीताईनी सासूबाईना सांगितले, “मी आत्ता तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण वेळ आली की नक्की सांगेन” त्यांनी नंदिनीताईवर पूर्ण विश्वास ठेवला. पण त्यामुळे त्यांचे खूप नातेवाईक त्याना नावे ठेवत असत. सासुबाई स्वतः खूपच विचारी अन् सुस्वभावी होत्या. त्यांनी कधीही नंदिनीताईना विचारले नाही. पुढे आणीबाणी संपल्यावर नंदिनीताईनी त्यांना सर्व सत्य परिस्थिती सांगितली, तेव्हा त्यांना नंदिनीताईचा अभिमान वाटला. त्यांनी सर्व नावे ठेवणाऱ्या नातेवाईकांना मोठ्या अभिमानाने ही गोष्ट सांगितली.

मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स नंदिनीताई स्वतः करतात. सतत त्यांचा हात चालू असतो. आपल्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावे. कार्यशील स्वभावाला धार्मिक बैठक असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व शांत, सात्विक वाटते. त्यांना असेच कार्य करण्यासाठी अधिक अधिक उर्जा मिळो ह्यासाठी शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. नंदिनीताई नावाप्रमाणेच आनंद देणारी, प्रसन्न करणारी आमची मैत्रीण खरंच हरहुन्नरी आहे..

    निवेदन, रसग्रहण, सामाजिक कार्याची आवड, मोत्यांपासून अनेक सुंदर कलाकृती तयार करण्याची आवड. अनेक मंडळातील त्यांचा सहभाग. सतत नाविन्यपूर्ण कार्य करण्याची ऊर्जा वाखाणण्यासारखी आहे. शिवतांडव चे कार्यक्रम करताना त्यांच्या पाठांतराची झलक दिसते आणि ह्या वयातही त्यांचा तो उत्साह वाखाणण्यासारखा आहे. कुठलेही कार्य हाती घेतले की ते हसतमुखाने पार पाडणे आणि असे करत असताना स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला आनंद देणे हे त्यांच्या आयुष्याचे ब्रीद आहे. अशा आमच्या सखी कडून खूप काही शिकण्यासारखे आहे तिचा उत्साह असाच कायम राहो आणि तिच्या हातून नाविन्यपूर्ण कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  2. नंदिनीताईंचं अतिशय सुंदर व्यक्तिमत्व चित्राताईंनी रेखाटलं आहे. त्यांच्या अनेकविध कार्याची, दिलखुलास स्वभावाची यथार्थ ओळख करून दिली आहे. केवळ जिद्दीने एक स्त्री किती विविध प्रकारचे काम करू शकते, निरनिराळ्या आव्हानांना सहज सामोरी जाऊन यशस्वी होते याचे उत्तम उदाहरण नंदिनीताई आहेत.
    75 पूर्ण व्हायला आलेल्या वयात त्यांचा उत्साह कणभरही कमी झाला नाही. सतत कार्यरत राहून त्या अनेकांना प्रेरणा होतात. परमेश्वरावर श्रद्धा आणि आत्मविश्वास हे त्यांच्या यशाचे आधारस्तंभ आहेत.
    नंदिनीताईंना उदंड आयुष्यासाठी खूप सार्‍या सप्रेम शुभेच्छा. 🌷🙏

  3. Yes she is best
    Hard working
    Once she will decide something she will do it
    Her target if she will not complete in a day time she will work at night and then only she will be happy without completing she will not sleep
    She is happy in her work Tandav stotra ect.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments