Homeयशकथाझेप : 16

झेप : 16

“प्रा. अश्विनी रानडे”

कोऱ्या पाटीवर ओल्या स्लेटपेन्सिलने लिहिलेली अक्षरं ठळक उठावदार तर दिसतातच पण दीर्घ काळापर्यंत टिकतातही. तसेच काहीसे माझ्या बाबतीतही झाले. प्रचंड शारीरिक, मानसिक ऊर्जा असलेल्या अठराव्या- एकोणवीसाव्या वर्षी ज्योती म्हापसेकर यांचे ‘मुलगी झाले हो…’ हे नाटक पाहिले आणि नकळतपणे त्यातले विचार मनावर ठसले गेले. ते विचार अनेकांपर्यंत पोहोचवण्याची उर्मी जागृत झाली आणि मी स्त्री-मुक्ती संघटनेकडे मी ओढली गेले. योग्य वयात सामाजिक कार्याची जाणीव झाली जी अजूनही टिकून आहे. संघटनेत विविध वयोगटातील कार्यकर्ते असले तरी समवयस्कांशी आपोआप आपले सूर जुळतात तसेच सूर माझे अश्विनीशी जुळले. आम्ही दोघी एस. वाय. बी. एस. सी. या वर्गात होतो फक्त तिचा विषय गणित होता तर माझा भौतिकशास्त्र! मी चेंबूरची तर अश्विनी दहिसरची. आम्ही दोघींनी कलिना कॅम्पसला मुंबई विद्यापीठातून एकाच वर्षी आपापल्या विषयातून एम. एस. सी. पूर्ण केले आणि एकाच वेळेस आचार्य- मराठे या चेंबूरच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला लागलो. जुन्या आठवणींना उजाळा देताना अश्विनीशी केलेल्या गप्पागोष्टी-

प्रतिभा सराफ : अश्विनी, तू नेमकं केव्हा आणि कशी स्त्री -मुक्ती संघटनेत सामील झालीस ?
अश्विनी रानडे : प्रतिभा, खरंतर खूपच जुनी गोष्ट आहे पण काल-परवाच घडल्यासारखी वाटतेय. मी रूपारेल महाविद्यालयात एस. वाय. बी. एस. सी. मध्ये शिकत होते. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दहिसर शाखा या वाचनालयाची सभासद होते. तसेच ‘अंबिका योग कुटीर’ या योगासन शिकवणाऱ्या संस्थेत शिक्षका या नात्याने खूपच सक्रीय होते. याच ग्रंथसंग्रहालयातर्फे ‘मुलगी झाली हो…’ चा प्रयोग होता.

प्रतिभा : म्हणजे ‘मुलगी झाली हो…’ हा प्रयोग पाहून तू संघटनेकडे वळलीस ?
अश्विनी : नाही. या नाटकाच्या आधी मला या संघटनेतल्या कार्यकर्तीशी ओळख झाली. तिच्या प्रगल्भ विचारांनी मी भारावून गेले. त्यानंतर नाटक पाहिलं. म्हणजे त्याचं असं झालं की या नाटकाच्या आयोजकांनी मला सांगितलं की या नाटकात सर्व महिला आहेत आणि नाटकापूर्वी तीन तास आधी त्या आपल्या विभागात येणार आहेत. नाटक चार वाजता आहे. तर या नाटकात काम करणाऱ्या एका महिलेची जबाबदारी तू घ्यायची आहेस! ठरल्याप्रमाणे ‘नीला लिमये’ नावाची कार्यकर्ती आमच्या घरी आली. जेवताना आम्हा सर्व कुटुंबीयांनी तिच्याशी गप्पा मारल्या. त्या बोलण्याला ‘गप्पा’ हाच शब्द योग्य आहे कारण एखाद्या विषयावर चर्चा करण्याइतपत समज किंवा तयारी तेव्हा नव्हती. पण काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा मात्र नक्की होती. नीलाशी मनमोकळ बोलताना जाणवलं की जेमतेम एक दीड वर्षांनीच मोठी असलेली ही मुलगी किती वेगळं बोलतेय. मी तिला तसं बोलूनही दाखवलं तर ती म्हणाली, “हे मी संघटनेमुळे शिकले.” या वाक्याचा खरंतर मला फारसा काही बोध झाला नाही.

प्रतिभा : ‘मुलगी झाली हो…’ हे नाटक पाहताना नेमकं काय वाटलं ?
अश्विनी : नाटक बघून मी बधिर झाले. वेगळ्याच जगात गेले. कॉलेजात शिक्षण घेत होते, घरात सर्व नीट होतं पण मनात एक प्रकारची अस्वस्थता होती. घालमेल होती आणि त्या अस्वस्थतेचं कारण या नाटकामुळे सापडलं.

प्रतिभा : संघटनेत पहिल्यांदा केव्हा गेलीस ? तिकडचा अनुभव काय ?
अश्विनी : नाटक संपल्यावर संघटनेत येण्याचं आवाहन केलं गेलं आणि त्याला प्रतिसाद देत मी, माझी बहीण योगिनी आणि आणखी दोघीजणी मिटींगला गेलो. मीटिंगमध्ये संघटनेविषयी माहिती मिळाली. त्या दिवशी मी काहीच बोलले नाही पण स्वतःला या संघटनेतल्या लोकांशी जोडून घ्यायचा मनोमान निर्णय मात्र घेतला.

प्रतिभा : या निर्णयामुळे तुझ्या जीवनात काही फरक पडला का ?
अश्विनी : हो, निश्चितच! संघटनेच्या दादर येथील ऑफिसवर जाणं-येणं वाढलं. निरनिराळ्या लोकांशी परिचय होऊ लागला. संघटनेशी निगडित विविध चळवळींची माहिती मिळायला लागली. जीवनाविषयी अधिक सखोल विचार करायला हवा, जबाबदारीनं वागायला हवं असं वाटू लागलं. सामाजिक जाणीव वाढायला लागली.

प्रतिभा : नेमक्या कोणत्या सामाजिक जाणिवा वाढल्या ?
अश्विनी : ‘मुलगी झाली हो…’ नाटकाने स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. नुसतेच प्रश्न मांडून नाटक थांबलं नाही तर त्या प्रश्नांची उत्तरेही नाटकाने सुचवली.
पददलितांची पिळवणुकीतून मुक्ती हावी हा एकच ध्यास
मनी घेऊनी जाऊ आपण, निर्मू आपला नवा समाज.

हा प्रभावी विचार आणि समज या नाटकाने दिली. स्त्रियांची दुःख दूर करायची असतील तर त्यांचे प्रश्न मांडून आणि सोडवून चालणार नाहीत किंबहुना त्यांचे प्रश्न स्वतंत्रपणे सोडवताही येणार नाहीत.

प्रतिभा : म्हणजे तुला नेमकेपणानं काय म्हणायचंय, जरा स्पष्ट कर. ?
अश्विनी : स्त्रिया, दलित, श्रमिक या सर्व कष्टकरी, दबलेल्या आणि वंचित विभागांचे प्रश्र एकमेकांबरोबर गुंतलेले आहेत. ही तीन पायांची लंगडी आहे आणि जीवनात घोडदौड करायची असेल तर तिघांनी एकत्रितपणे धावायला हवे; म्हणून त्यांच्या प्रश्नांशी संबंध अशा सर्व चळवळींनीही एकमेकांना सहकार्य करून पिळवणुकीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध संघर्ष करायला हवा आणि यासाठी दलित चळवळ, कामगार चळवळ, आदिवासींची चळवळ , स्त्री चळवळ अशा सर्व चळवळींमध्ये माहिती करून घ्यायला हवी, हे लक्षात आलं. याच दृष्टिकोनातून ‘श्रमिक’ दादर येथे होणाऱ्या प्रत्येक लहान- मोठ्या बैठका आणि अभ्यासवर्ग यांना मी नियमित हजर राहू लागले. समाजपरिवर्तनाची चळवळ आणि सामाजिक काम (social work) यातील फरक काय ?, प्रत्येक घटनेचा अर्थ लावताना त्यातील सामाजिकचा विचार कसा करावा ? महत्त्वकांक्षा म्हणजे काय ? राजकारण म्हणजे काय ? आपण राजकारणापासून अलिप्त राहू शकतो का ? जातीव्यवस्था कशी तयार झाली ? अंतरराष्ट्रीय राजकारण आणि आपली महिलांची चळवळ यांचा संबंध काय ? स्त्री-मुक्ती म्हणजे नेमकं काय ? या आणि अशा विविध विषयांतर मी अभ्यासवर्ग ऐकले. हे अभ्यास वर्ग प्रामुखाने भाऊ फाटक, एस. के. लिमये, शारदा साठे, अरविंद वैद्य, कुमार केतकर घेत असत. समाजपरिवर्तनाच्या चळवळीत स्थिर होण्यासाठी या अभ्यासवर्गांचा उपयोग झाला.

प्रतिभा : व्यक्तिगत जीवनात काय बदल झाला ?
अश्विनी : स्त्री- मुक्ती संघटनेच्या दादरच्या कार्यालयात माझी ये-जा बरीच वाढली होती. कोणत्याही प्रश्नाचा ठाव घ्यायचा असेल तर त्याचं मूळ कारण शोधायला हवं आणि मगच उत्तर सापडतं, ही समज येऊ लागली. कोणत्याही गोष्टीचा खोल विचार करण्याची सवय लागली. विशीच्या उंबरठ्यावर घरातले ताण, त्याची कारणं, संघटनेत वावरल्यामुळे नीटपणे समजायला लागली त्यामुळे अधिक परिपक्वतेने वावरणं सुरू झालं. संघटनेत अनेक कार्यकर्त्यांशी जवळून संबंध येत होता. मिलिंद रानडे हा त्यातलाच एक कार्यकर्ता. त्याच्याशी परिचय वाढला. प्रथम परिचय, मग मैत्री, नंतर प्रेम, शेवटी लग्न असा प्रवास झाला. जीवनाला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली. डायमेन्शनच बदललं.
लग्नानंतर मी चेंबूरला राहायला आले. मिलिंद, भाऊ फाटक आणि मी असा आमचा परिवार होता. प्रथम भाऊ फक्त संघटनेच्या कार्यालयात भेटत असत पण आता आम्ही एकत्र राहू लागलो त्यामुळे सामाजिक, राजकीय प्रश्नांबद्दल सतत चर्चा करणं, मतभेद असतील तर ते मोकळेपणानं व्यक्त करणं, कोणत्याही प्रश्नाला धैर्याने सामोरं जाणं, एखाद्या प्रश्नाचा सर्वांगाने विचार करणं अशा सवयी मला माझ्याही नकळतपणे लागल्या.

प्रतिभा : स्त्री-मुक्ती संघटनेच्या चेंबूर विभागाबद्दलच्या आठवणी विस्तृतपणे सांग.
अश्विनी : १९८६ मध्ये आम्ही स्री- मुक्ती संघटना, चेंबूर विभाग या नावानं काम सुरू केलं. चेंबूर लगतचे घाटकोपर जिथल्या पंतनगर विभागातील पुरोगामी आणि आधुनिक पद्धतीने विचार करणाऱ्या तरुण – तरुणींचा ‘स्टार स्पोर्ट्स क्लब’ मधील बरेच जण संघटनेशी जोडले गेले. रवी देवधर हा त्यातलाच एक कार्यकर्ता आहे, याची आठवण ताजी आहे. स्वस्त व स्वच्छ अन्न चळवळ (एक रुपयात झुणका- भाकर चळवळ), ग्रंथाली चळवळ (दिनकर गांगल यांच्याबरोबर ग्रंथदिंडीत पुढाकार), ‘हुंडा देणार नाही, घेणार नाही असा शपथविधी, विभागाविभागात ‘मुलगी झाली हो…’ च्या प्रयोगांचं आयोजन, पाळणाघर हवेत, यासाठी सह्यांची मोहीम अशी अनेकविध काम केली. दर गुरुवारी ‘सहवास’ सोसायटीत मृणाल/ शेखर साठे यांच्या घरी आमच्या बैठका होत असत. बैठकीला येणाऱ्या लोकांची सख्या दिवसेंदिवस वाढत होती. हा प्रतिसाद पाहून आम्ही चेंबूरच्या ‘जनरल एज्युकेशन अकॅडमी’ या शाळेचे प्रमुख शानभाग सर यांना भेटलो आणि दर गुरुवारी त्यांच्या शाळेतील एक वर्गखोली बैठकीसाठी वापरण्याची परवानगी मिळवली. या बैठकीमध्ये जे निर्णय होत त्याची अंमलबजावणी आम्ही सर्व कार्यकर्ते काटेकोरपणे करत असू. चेंबूर स्टेशनकडच्या आवारात टेबलं टाकून ‘प्रेरक ललकारी’ ची विक्री, त्याचवेळी ‘आमच्या संघटनेत सामील व्हा’ ही दिलेली हाक, त्यानंतर मिळालेला उत्तम प्रतिसाद या सर्व गोष्टी उमेद वाढवत होत्या.

प्रतिभा : मिलिंद आणि तू दोघेही संघटनेत असल्याचा फायदा तुम्हा दोघांना आणि संघटनेला मिळाला का ? आणि तो कसा ?
अश्विनी : १९९० साली माधव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या साक्षरता चळवळीबरोबर (CORO) आम्ही दोघांनी स्वतःला जोडून घेतले. त्याच सुमारास संघटनेच्या कार्यकारणीत झालेल्या निर्णयानुसार मिलिंदने चेंबूर भागात रेशनच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. त्यातून नंतर ‘रेशनिंग कृती समिती’ जन्माला आली.
या काळात देशात ‘रथयात्रेचे’ वातावरण होते. देशात धर्मांध शक्ती जोर धरत होत्या. या प्रकाराला विरोध झाला पाहिजे कारण जर धर्माधिष्ठित राजकारण सुरू झाले तर स्त्री- मुक्ती चळवळ, साक्षरता चळवळ, रेशनिंग चळवळ या सर्वच चळवळी मागे रेटल्या जातील, या जाणीवने मिलिंद रानडे आणि त्याच्या चळवळीतील सहकाऱ्यांनी ‘राष्ट्रीय एकता समिती’ स्थापन केली आणि त्यानंतर सामाजिक कामाबरोबरच आमचं राजकीय कामही सुरू झालं.

प्रतिभा : संघटनेचा एक घटक म्हणून तेव्हा आणि आताच्या तुझ्या सहभागाबद्दल आम्हाला माहिती दे.
अश्विनी : १९९० ते १९९५ या काळात ‘स्त्री -मुक्ती संघटना’ झपाट्याने वाढत होती. बोरीवली, मुलुंड, नवी मुंबई या भागात पाळणाघरे सुरू झाली होती. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, दिल्ली, कोकण या भागात स्त्री-पुरुष ‘समानता यात्रा’ यशस्वीपणे पार पडल्या. वाशी-चेंबूर भागात ‘समस्या निवारण केंद्रं’ सुरू झाली. ‘मुलगी झाली हो…’ मुळे संघटनेचे नाव सर्वदूर पोहोचले होते. ‘प्रेरक ललकारी’ चा नियामित लेखक वर्ग आणि वाचक वर्ग तयार झाला होता.

‘मुलगी झाली हो…’च्या बरोबरीने ‘हुंडा नको ग बाई’ ‘बाप रे बाप’ ही पथनाट्यंही सादर केली जात होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांचा एक निश्चित संच, संघटनेत तयार आला होता. मीही या संचाचा एक घटक होते. आजही आहे. मात्र दैनंदिन कामात विशेष सहभाग घेता येत नाही, याची खंत वाटते.

प्रतिभा : एकदा ‘श्रमिक’वर गेले असता ‘अश्विनी- मिलिंदला मुलगी झाली हो…’ असं बाहेरच्या फलकावर लिहिलेलं आजही ठळकपणे आठवतंय. मुलगी झाल्याच्या आनंदाविषयी तू निश्चितपणे सांगू शकशील. तुम्ही दोघंही संघटनेतले असल्याचा उमाला काही फायदा झाला का ? तिचा संघटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे ? तिची मतं काय आहेत ?
अश्विनी : ‘मुलगी झाली हो…’ या नाटकानंतर संघटनेत काम करणाऱ्या तरुणांची मनं जुळली, जोड्या जुळल्या आणि अनेक लग्नही झाली पण त्यात सर्वप्रथम आमचं लग्न झालं. संघटनेतलं पहिलं बाळ म्हणजे आमची उमा. सहाजिकच तिचं खूप कौतुक झालं. चेंबूरच्या मीटिंग्ज असो, छोटी-मोठी सामाजिक काम असोत आणि मुलगी झाली हो व इतर पथनाट्याचा प्रयोग असो ती आम्हा दोघांबरोबर असायची त्यामुळे अजाणत्या वयापासून तिला सर्वार्थाने सामाजिक भान आलं. कष्टकऱ्यांना समजून घेता आलं. शाळेतल्या शिक्षकांना तर ती इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळेपणाने विचार करते, जास्त समजूतदार आहे, सामाजिक भान असलेली आहे हे जाणवायचं आणि तसं ते आम्हाला सांगायचेही ! आम्ही तिघं म्हणजे भाऊ फाटक, मिलिंद आणि मी जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा करायचो तेव्हा ती आपणहून चर्चेत भाग घ्यायची. आपली मतं ठामपणे मांडायची. तिने तसं प्रत्यक्ष संघटनेत काम केलेलं नाही. परंतु संघटनेविषयी तिला आदर आणि आस्था आहे. मला निश्चितपणे सांगायला आवडेल की तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आम्ही काम करत असलेल्या या संघटनेच्या विचारांचा सिंहाचा वाटा आहे.

प्रतिभा : अश्विनी, तुझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे पण शेवटचा प्रश्न विचारते की या मुलाखतीचा समारोप करताना तुला संघटनेविषयी नेमकं काय मत मांडावसं वाटतंय ?
अश्विनी : स्त्रिया – दलित – श्रमिक यांचे प्रश्न जरी एकमेकांत गुंतलेले असले तरी स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांची आणि पुरुषांची ‘पुरुषी वर्चस्वापासून मुक्तता’ म्हणजे स्त्री- मुक्ती आणि सर्व समाजाची ‘पिळवणुकीतून मुक्तता’ म्हणजे मानव- मुक्ती या समजाने मी आजही काम करते. मात्र हे सर्व आपोआप घडणार नाही तर ते प्रत्यत्नपूर्वक घडवावं लागेल, त्यासाठी चळवळी मजबूत कराव्या लागतील.

प्रतिभा सराफ

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. अश्विनी म्हणजे माश्याच्या डोळ्याचा नेमका फोकस घेऊन काम करणारी- एक शिस्तीची, अहंभाव मुक्त कार्यकर्ती!

    खूप छान टिपलंय हे! धन्यवाद 🙏

  2. धन्यवाद प्रतिभा 🙏
    उत्तम लिखाण ! माझ्या बोलण्याचा योग्य तो समज घेऊन केलेलं शब्दांकन अप्रतिम !
    तू एक सिद्धहस्त लेखिका आहेस याची पुन्हा प्रचिती आली.
    श्री. देवेंद्र भुजबळ आणि सौ.अलका भुजबळ यांचेही आभार.

  3. धन्यवाद प्रतिभा 🙏
    खूप सुंदर लेखन केलं आहेस. मी जे बोलले त्याचा योग्य समज घेऊन केलेलं शब्दांकन उत्तम !!
    मुलाखत वाचत असताना चळवळीतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    तू एक सिद्धहस्त लेखिका आहेस याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
    श्री. देवेंद्र भुजबळ आणि सौ. अलका भुजबळ यांचेही आभार.

  4. कोणत्याही प्रसिद्धीचा मोह ना ठेवता, जगात अनेक माणसं आपापल्या पद्धतीने ‘आपण समाजाचे देणे लागतो’, या भावनेने कार्यरत असतात त्यापैकीच एक अश्विनी❤️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments