उडवूया रे पतंग…!!
उंच उंच आभाळात
उडवूया रे पतंग
निळा, केशरी, गुलाबी
आहे त्यांचा जणू रंग………
चिमा, रिमा, मनू, बंडू
मांजा त्याचा हाती धरा
गोल गोल रीळ फिरे
बघताच झरझरा………
आईबाबा शेजारीच
रहा तुम्ही उभे जरा
पतंगाची दोर हाती
उडे नभी भराभरा………
पंतगात पतंगही
अडकती पहा फार
गमतच येते कशी
घेऊ हाती दोन चार………
वाऱ्यासंगे उंच जातो
भिडतोय गगनाला
मौज मजा येई किती
आनंद देई मनाला……….
एकमेकात गुंतून
पतंगच फाटलेले
खेळ असा रंगताना
हळूहळू काटलेले ……..
चला करू त्यांची कैची
पळतात दूर दूर
आनंदाच्या क्षणातून
वर्षभर हूरहूर………..

— रचना : सौ माधवी ढवळे. राजापूर, जिल्हा रत्नागिरी
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484808