पोर्ट हल्दिया
जहाजाचा समुद्रातून प्रवास सुरू असताना मुकुंदना पहाटे चार ते सकाळी आठ आणि संध्याकाळी चार ते रात्री आठ असं engine room मधे watch keeping असायचं. त्याच्या बाहेर इंजिनरूममधली कामं असायचीच. पण बंदरात पोहोचल्यानंतर हे watch keeping असायचं नाही. अर्थात त्यांची इंजिनरूमची कामं सुरू असायची. त्यामुळे संध्याकाळी रिकामा वेळ मिळायचा.
हे इंजिनरूम मधे गेले की माझं थोडंफार स्वयंपाकपाणी, वाचन, डेकवर फेरफटका मारणे हे रुटीन होतं. मला जहाजावर कधीही कंटाळा आला नाही.
तसं पाहिलं तर कोलजेट्टी आणि हल्दिया तुतीकोरीन सारखी अगदी लहान गावं ! कोणालाही हा प्रवास अत्यंत कंटाळवाणा वाटला असता. त्यात पाण्यावर तरंगणारं, जमिनीपासून लांब जहाजावरचं आयुष्य !
पण नवं लग्न झाल्यानंतरचे ते दिवस आनंदाचे, नवलाईचे, बहारीचे, भारावलेले होते. एकमेकांच्या सहवासात, प्रेमाच्या वर्षावात दिवस कसे उलटत होते समजतंच नव्हतं!
भरतकामाचे प्रयोग
मुंबईहून येताना एक मोठं बेडशीट भरतकाम करण्यासाठी मी घेऊन आले होते. कच्छी टाक्यांनी भरण्यासाठी त्याच्यावर डिझाईन छापून आणलं होतं. भरतकामाचे धागे, सुया, रिंग सर्व आयुधं बरोबर होतीच.
मग अधून-मधून विशेषतः सेलिंग सुरू असताना, माझं भरतकाम ही सुरू असायचं. मुंबईहून बेडशीट वरती डिझाईन काढून घेताना मोठ्या उत्साहात होते. पण प्रत्यक्ष भरणं सुरू केल्यावर बापरे किती किचकट काम आहे हे ! आपण भलत्याच हौसेनं मागे लावून घेतलं. आता कधी हे भरून पूर्ण होणार ? असं वाटायचं. मग मी मनाशी अगदी निश्चय करायची, आता रोज दोन तास तरी भरतकाम करायचंच, हो ! सकाळी एक तास आणि दुपारी एक तास !
सुमारे दोन-अडीच दिवस उत्साह टिकला की त्या दिवशी वाटायचं होईल ना पूर्ण, काय घाई आहे ? म्हणून बेडशीट घडी करून कपाटात ! तसंही तोपर्यंत पोर्ट आलेलं असायचं.
विणकाम, भरतकाम, नक्षीकाम, क्रेपकागद किंवा रिबनची फुलं बनवणं वगैरे माझ्या बरोबरीच्या मैत्रिणी खूप उत्साहाने करायच्या. माझी आई स्वतः उत्तम भरतकाम, शिवणकाम, विणकाम करायची. पण मला त्याची आवड अशी निर्माण झालीच नाही.
आमची वृंदा ही माझ्यासारखीच !
सासुबाई म्हणायच्या, तुम्ही दोघी नणंदा भावजया अगदी सारख्या आहात गं ! दोघींनाही भरतकाम, शिवणकाम नको… तर भरतकामाचे बेडशीट बासनात गुंडाळून ठेवलं कारण हल्दियाला पोचलो होतो.
एकीकडे कोल लोडिंग सुरू झालं होतं. मुकुंदांची इंजिनरूमची कामं नेहमीप्रमाणे सुरू होती.
नागराज आणि देऊळ
संध्याकाळी बाहेर पडलो. दुपारी पावसाची हलकीशी सर येऊन गेली होती. हवेतला उष्मा वाढला होता. इथला उष्मा जास्त दमट वाटायचा. तुतीकोरीनची हवा जास्त गरम वाटायची. तिला एक वेगळाच ताव असायचा. भारताच्या दक्षिण टोकाजवळ होतं ना, म्हणून असणार.
आज गावात नको, नुसतंच फिरून येऊ या म्हणून बाहेर पडलो. पोर्टच्या बाहेर दूरवर एक छोटं मंदिर होतं. तेथे भजन व कसला तरी उत्सव सुरू होता. चौकशी केली तर ती मंडळी आठवड्यातून एका ठराविक दिवशी तिथे संध्याकाळी भजन म्हणायला जमतात असं कळलं. लांबूनच देवळात गर्दी आहे असं दिसत होतं.
म्हटलं चला आपण त्या मंदिरात जाऊन येऊ. गावापासून लांब फारशी वस्ती नसलेला तो भाग होता. तिथून हल्दिया गाव खूप दूर होतं. अधून मधून दूरवर छोट्या वाड्यांसारख्या वस्त्या दिसायच्या.
संध्याकाळ गडद होत चाललेली. रस्त्यावर सामसूम. दूरवर घरा-घरातून लागलेले दिवे अस्पष्ट दिसत होते. त्या देवळाकडे जाणारा रस्ता काळ्या खडीचा होता. रस्त्यावर म्युनिसिपालिटीचे खांबावरचे दिवे पिवळा मंद प्रकाश ओतत होते. रस्त्यावर वाहने नाहीतच. क्वचित एखादी सायकल इकडून तिकडे जाताना दिसायची, तेवढीच काय ती हालचाल.
थंडीचे दिवस असूनही हवेत एक दमट उष्मा होता…… उगाचच मनावर दडपण आणणारा ! दोन्ही बाजूला रान आणि मधून जाणारी ही खडीची सडक ! त्या देवळाकडे दोघेच निघालो.
गप्पांच्या नादात रस्त्यावरून चालताना मुकुंदनी अचानक मला हाताला धरून थांबवलं. मी दचकलेच. मला हळूच म्हणाले, “थांब हालचाल करू नको. बोलू नको. फक्त समोर बघ !” समोर बघते तर काय…. आमच्यापासून पंधरा एक फुटावर, त्या अंधुक उजेडात रस्त्याच्या मधोमध एक भला थोरला काळाकभिन्न नाग वेटोळे घालून बसला होता. त्याची तुकतुकीत काळी कांती मंद चांदण्यात चमकत होती. आपल्या तळहाता पेक्षा मोठा फडा काढून, दिमाखात त्यावरचा पिवळा दहाचा आकडा मिरवत वेटोळ्यावर आरुढ झाला होता. तोंडातून बाहेर पडणाऱ्या जिव्हा लवलवत होत्या….. साक्षात काळ समोर उभा होता….. वाऱ्याच्या झुळकी वर स्वतःच्या धुंदीत डोलत होता. जसं भोवतालचं सारं साम्राज्य त्याचंच होतं !
निश्चल होऊन मी त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी फक्त पहात होते. मुकुंदांचा हात घट्ट धरून ठेवला होता. दोघेही शांतपणे उभे राहिलो. जवळजवळ आठ दहा मिनिटं त्याचा तो भयावह दिमाख, दरारा न्याहाळत होतो.
आपल्याच रुबाबात मग्न असलेल्या त्या नागराजाला आमच्यासारख्यांची दखल कुठून असणार ? फुस्सssss अचानक आवाज आला. त्याने हालचाल बदलली. वेटोळी उलगडू लागली आणि प्रथम हळूहळू सरपटत आणि अचानक वेग वाढवत, सळसळत जवळच्या रानात तो निघून गेला, अदृश्य झाला. तो निघून गेल्यावरही माझा पाय उचलेना.

नागराजाच्या अचानक झालेल्या दर्शनाच्या त्या गारूडातून बाहेर पडायला मला दोन-चार मिनिटे लागली. माझा थरकाप उडाला होता. वाऱ्यावर सळसळणारा माझाच पदर आणि निर्यांची हालचाल सुद्धा माझ्या अंगावर काटा आणत होती. भीतीने भरलेले माझे डोळे बघून मुकुंदांनी मला जवळ घेतलं. म्हणाले, “अगं तो गेला. घाबरू नको. म्हणून तर अशावेळी शांत उभं राहायचं असतं, कसलीही हालचाल न करता ! चल ठरवल्याप्रमाणे आपण त्या देवळात जाऊन येऊया.”
मुकुंदांच्या सावधगिरीची आणि तीक्ष्ण नजरेची खरोखरच कमाल होती. एवढ्या अंधुक प्रकाशात काळ्या खडीच्या रस्त्यावर मधोमध बसलेला तो काळाकभिन्न नाग दृष्टीने टिपणे आणि गप्पात रंगलेल्या मला हळूच पण पटकन थांबवणे या साऱ्यांनी मी थक्क झाले होते.
मनाचा समतोल, सावधगिरी हा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच गुण ! त्यात जहाजाच्या सर्व इंजिन्स व मशिन्सची अखंड निगराणी आणि जपणूक यांनी त्यांच्या तीक्ष्ण नजरेला आणखीन धार चढवली आहे.
दिव्या दिव्या दीपत्कार
देवळातलं भजन संपलं होतं. लोक प्रसाद घेऊन परतत होते. शंकराचे देऊळ होतं ते. पिंडीवर वाहिलेली पांढरी फुलं, उदबत्त्यांचा दरवळणारा सुगंध आणि विजेचे दिवे असले तरी गाभाऱ्यात तेवत असलेल्या असलेल्या दोन समया… त्यांचा तो मंद प्रकाश मनाला फार सुखावून, आश्वस्त करून गेला.
समईच्या नाजूक, मंद ज्योतीचा
तो सात्विक चमत्कार !
दिव्यत्वाचा साक्षात्कार!
दिव्या दिव्या दीपत्कार…..!
सारं शुभंकर कल्याणदाई
करणारा हा संस्कार !
इतक्या दूर प्रांतात, अनोळखी देशात, मायेचा मऊ हात पाठीवर फिरावा तसं वाटलं.
जगात कुठं ही असलो तरी सांजवातीच्या दीपकळीचं मनाचा कोपरा न् कोपरा मायेने, प्रेमाने आशीर्वाद देऊन उजळून टाकायचं विलक्षण सामर्थ्य आपल्या पूर्वजांनी जाणलं, संस्कृतीने जपलं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं ! समईच्या त्या प्रकाशाने घरातल्या सगळ्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आमच्या पर्यंत पोहोचवले. मन शांत, प्रसन्न झालं.
आम्ही देवाला मनोभावे नमस्कार केला.प्रसाद घेतला आणि त्याच खडीच्या वाटेने परत शिपकडे निघालो. आमच्याबरोबर इतरही काही लोक त्याच वाटेने त्यांच्या त्यांच्या घरी परत निघाले होते. थोडी सोबत होती. शिपवर पोहोचलो. शांतपणे जेवण करून झोपून गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी हा नागाचा किस्सा हरीला सांगितला. हरीने तर आमची दोघांची शाळाच घेतली. “इतनी रात गये तुम लोग, खाली दोनो, कहाॅं घूमने गये थे ? हमारे लिए ये सब नयी एरिया है. अगर दोनो को जाना है तो जल्दी जाके जल्दी वापस आना,”. अगदी घरचा नियम आठवला.दिवे लागणीला घरी आलं पाहिजे.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघं, हरी, फिफ्त इंजिनियर अनिल मदान, रेडिओ ऑफिसर जडे असे पाच-सहा जण गावात गेलो…. उगाचच चक्कर मारायला !
हल्दिया गावात
हल्दिया…. त्यावेळचं एक छोटं, गरीब खेडेगाव !
पांढऱ्या मातीच्या ढिगांसारख्या ओट्यावर बांधलेली मातीचीच घरं…. गवतानी शाकारलेली. त्यांच्या जाडजूड भिंती शेणानं सारवलेल्या ! कशीही वर खाली जागा मिळेल तशी बांधलेली ती घरं ! वरती चढायला दगडमातीच्या ओबडधोबड पायऱ्या. जवळपास क्लॉक क्लॉक आवाज करत फिरणाऱ्या, दाणे, किडे टिपणाऱ्या कोंबड्या त्यांची पिल, रस्त्यात धावणारी दोन-चार कुत्री, एखाद दुसरी मोकाट गाय, मध्येच पाण्याचे एक-दोन ओहोळ.
वस्तीच्या मधून जाणारा एकच डांबरी रस्ता.त्यावर म्युन्सिपाल्टीचे विजेचे खांब. तोच बाजारचा रस्ता. एखादं दुसरं लाकडी फळ्यांचं, पत्रे मारलेलं दुकान. तिथेच थोडं पुढे बाजारात रस्त्यालगत एक दोन बारकी हॉटेलं, दोन-तीन चहाच्या टपऱ्या. एखाद दुसरा पानाचा ठेला. त्याच्या आजूबाजूच्या पिचकाऱ्या ! बाजारच्या नाक्यावर आणि रस्त्याच्या कडेला एक दोन मोठ्या झाडांना बांधलेले पार.
संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर हुंदडणारी पोरं-सोरं, घराबाहेर ओट्यावर विड्या ओढत बसलेले पुरुष. गप्पा मारत भाजी निवडत, धान्य पाखडत बसलेल्या बंगाली साड्या नेसलेल्या बायका, बाजारच्या रस्त्यावर कुठे किराणा, भाजी घेणारी माणसं.
फुचकेवाला
गावात पोहोचलो. छोट्या बाजारच्या नाक्याजवळ पाणीपुऱ्या विकणारे दोघेजण दिसले. मोठ्या झाडाखाली पारावरती त्यांनी ठेले लावले होते. मोठ्या गोल टोपलीत पाणीपुऱ्या भरलेल्या. त्या टोपलीला दोन्हीकडे जाड बंद लावून गळ्यात ढोलक अडकवावा तशी ती टोपली अडकवलेली. बरोबर एका मटक्यात पाणीपुरीचं मसाल्याचे पाणी, ते ढवळायला त्या मटक्यातच टाकलेला एक डाव, एका डब्यात उकडलेले काळे हरभरे-चणे, दुसऱ्या डब्यात उकडलेला बटाटा, चिरलेला कांदा, एका डब्यात शेव आणि दोन लहान डब्यात लाल तिखट आणि चाट मसाला, सगळे डबे ॲल्युमिनियमचे आणि प्लास्टिकचे. एका पिशवीत वडाच्या पानाचे द्रोण असं सगळं बिऱ्हाड घेऊन चाटवाला उभा होता.
त्यांच्याभोवती एक दोन मोठी माणसं आणि तीन-चार छोटी मुलं उभी होती. एक रुपयाला दहा, म्हणजे दहा पैशाला एक अशी पाणीपुरी खात होती. काही जणांच्या हातात दहा पैशाची दोनच नाणी होती, मग ती दोनच पाणी पुऱ्या खायची. त्या गरीब गावात त्यांच्यासाठी तेवढीच करमणूक होती.
मी म्हटलं, “चला आपण बघूया ना इथली पाणीपुरी खाऊ.” आम्ही सगळे चाटवाल्या जवळ जाऊन उभे राहिलो. एकदम इतकं गिऱ्हाईक बघून तो बिचारा गांगरलाच ! पाणीपुरी खायला आलेली मुलं पण बिचकली. मुकुंद त्याला म्हणाले, “पहिले बच्चों को आराम से खाने दो | बाद मे हम देखेंगे |”
पानीपुरी क्या भाव दिया ? कोणीतरी विचारलं.
पानीपुरी ? त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
मग हसून बंगाली ढंगाच्या हिंदीत म्हणाला, “ये हमारे यहाॅं का बिहारी फुचका है साब | बंगाल कलकत्ता मे इसे पानीपुरी बोलते है |” (पाणीपुरीसाठी असलेल्या या शब्दाचा उच्चार फुचका किंवा पुचका असा दोन्हीही प्रकाराने करतात)
आम्ही सर्वजण त्याच्याभोवती जमलो. त्याच्या टोपलीत अर्धी टोपलीच पुऱ्या होत्या. वडाच्या पानांचा एक एक द्रोण त्यानं आमच्या हातात दिला.उकडलेल्या बटाट्यात उकडलेले काळे चणे मिसळले. त्याच्यावर चाट मसाला, सैंधव पेरलं आणि त्या मटक्यातल्या मसाल्याच्या तिखट पाण्यात बुचकळून काठोकाठ भरलेली पुरी प्रत्येकाच्या द्रोणात वाढली. बर बारीक चिरलेला कांदा, शेव आणि किंचित लाल तिखट भुरभुरवलं.पहिला घास तोंडात घातला मात्र उत्स्फूर्त दाद निघाली, “वाह वा, क्या बात है |”
प्रत्येकाच्या साधारण दहा पुऱ्या खाऊन झाल्या. तो थांबला. मदान त्याला म्हणतो, “रुको मत भैय्या और फुचका आने दो | आप गिनो मत, हम भी नही गिन रहे है | सबका पैसा दे देंगे |” आता तो चाटवाला सरसावला. त्याचा वाढता आणि आमचा खाता हात यांच्यात जशी स्पर्धाच लागली होती. रगडा, गोड चटणी वगैरे नसलेला फक्त उकडलेला बटाटा आणि चण्याचा तो तिखट-आंबट चवीचा फुचका म्हणजे जिभेवर चाट मसाल्याचा सोहळाच होता. पाहता पाहता त्या टोपलीनं तळ गाठला. सगळ्या पुऱ्या संपल्या. जोरदार धंदा झाल्यामुळे चाटवाला खुश झाला. हरी म्हणाला, “कल फिर आयेंगे तब बहुत सारी पूरी लाना |”
मुंबईत, आमच्या पार्ल्यात, मी आणि वृंदा शर्मा भेळपुरीवाल्याकडे रतिबाने पाणीपुरी खायचो. तसंही आमच्या पार्ल्यातल्या शर्मा चाटवाल्यासारखी पाणीपुरी कुठेच मिळत नाही.
तरी पण या बिहारी फुचक्यांची लज्जत औरच होती. त्या फुचकावाल्याने त्याच्या घरीच भाजून, वाटून-कुटून बनवलेला तो मसाला,हिरवी मिरची, कोथिंबीर पुदिना, सैंधव आणि चिंचेचा आंबट कोळ यांच्या वाटणाशी त्याची अशी काही गट्टी जमली होती की एका अनोख्या चटकदार चवीची बहार उडून गेली !
नंतर अनेक ठिकाणी पाणीपुरी खाल्ली. मी स्वतः घरी पण बनवते. पण त्या बिहारी फुचक्यांची चव केवळ unparallel ! खरोखर चवीने खायला भारतातच जन्माला यावं लागतं.
फुचका महोत्सव
फुचक्यांची जाहिरात जहाज भर झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत फुचका महोत्सव ! आमच्या आधी खात उभ्या असलेल्या लहान मुलांना चाटवाला हाकलायला लागला. दहा पुऱ्या घेऊ शकणारा एखादाच श्रीमंत मुलगा असायचा. गुडघ्याच्या खाली जाणाऱ्या चड्ड्या, वरती बंगरूळ शर्ट किंवा गंजीफ्रॉक! धुळीने भरलेले फ्रॉक घातलेल्या मुली, केसांच्या झिपऱ्या सुटलेल्या ! दोन किंवा तीन पुऱ्या खाण्या एवढेच पैसे त्यांच्याकडे असायचे.
चार -पाच मुलं होती ती ! आठ-नऊ वर्षाची असतील. त्या भैय्याला सांगितलं, “इन सबको जितने फुचके खाने है, खाने दो | पहिले इनको खिलाओ | मैं पैसे दे दूंगी |” त्या मुलांचा कानावर विश्वास बसेना आणि भैय्याचाही ! दहा-बारा पुऱ्या खाताच त्यांची पोटं भरली आणि खुश होऊन सगळी छोटी मंडळी पळाली.
मग आम्ही त्याचा ताबा घेतला. आजही त्याची शिगोशिग भरलेली टोपली पूर्ण खाली झाली. जहाजावरून आलेल्या ऑफिसर्सचा आणखीन एक ग्रुप दुसऱ्या फुचकेवाल्यासमोर उभा होता. तिथेही टोपलीभर पुऱ्या संपल्या. अक्षरशः पोटभर फुचके खाऊन झाले.
एक थ्रिल – बगुला भगत
संध्याकाळचे सहा-साडेसहा वाजत आले होते. तिथे थोडसं लांब एक लहानसं मैदान होतं. एक मोठा तंबू उभारला होता. त्याच्या गेटवर नारळाच्या झावळ्या होत्या.
चला जाऊन बघूया काय आहे ते म्हणून सगळे निघालो. बघितलं तर ते खेड्यातलं तंबूतलं थिएटर होतं. तिकीट विक्री सुरू होती. सिनेमा होता बगुला भगत.
अरेच्या, याच्याच तर जाहिराती मघाशी बाजारात एक दोघेजण वाटत होते. तंबूच्या गेट जवळ मोठं पोस्टर लावलं होतं. तिकीटे काढून आत गेलो. मोठा पांढरा पडदा. बसायला लाकडी बाकडी. सगळेजण आत शिरलो. जहाजावरची माणसं म्हणून इतर माणसं आमच्याकडे कुतूहलाने बघत होती, थोडी बिचकतही होती.
हे असं उघड्यावरचं तंबूतलं थिएटर आणि त्यातला असा बाकड्यावर बसून बघितलेला सिनेमा मी कधीच पाहिला नव्हता. कधी कधी खेड्यातल्या या तंबूतल्या सिनेमांची वर्णनं वाचली होती इतकच ! पण आज असा सिनेमा बघणं हा एक फार धमाल अनुभव होता.
खाली मातीवर पाणी मारलं होतं. त्यामुळे थोडंसं गार वाटत होतं. डास मात्र छान पैकी चावत होते.
बघता बघता ते थिएटर बऱ्यापैकी भरलं. सिनेमा सुरू झाला. बगुला भगत हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट. यात अशोक कुमार, कामिनी कौशल, शत्रुघ्न सिन्हा आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नायक, खलनायक यांच्या मारामाऱ्या, धावाधावी, पकडापकडी याला जोरदार दाद मिळत होती. शिट्ट्या, टाळ्या वाजत होत्या. मध्ये दोनदा रिल तुटलं. तरी ते नशिबाने दहा मिनिटात जोडलं. चित्रपटातल्या थ्रिलपेक्षा सुद्धा तंबूत सिनेमा बघण्याचे थ्रिल जास्त भारी होतं.
सिनेमा संपवून बाहेरच्या एका बारक्या हॉटेलमध्ये काहीतरी खाल्लं. सर्वजण शिपकडे निघालो ते रात्रीचे दहा वाजले होते.
तो गेटमन – जीवघेणा अनुभव
कुठल्याही जेट्टीमध्ये प्रवेश करताना गेटवर आपला गेटपास दाखवावा लागतो. तिथला गेटमन तो तपासतो आणि मगच तुम्हाला आत प्रवेश मिळतो. गेटपास शिवाय कोणालाही जेट्टीवर प्रवेश मिळत नाही. सुरक्षिततेच्या कारणासाठी कस्टम्सने केलेला हा खूपच महत्त्वाचा नियम आहे.
जहाजावरती प्रवेश केल्यावर प्रत्येकालाच हा पास मिळतो. गेटमधून जाता येता प्रत्येकवेळी त्याची काटेकोर तपासणी होते. गेटमनने तो पास तपासून परवानगी दिल्याशिवाय कोणालाही आत जाता येत नाही, जहाजावर जाता येत नाही.
रात्री दहा वाजून गेलेले. जेट्टीवरच्या सर्व हालचाली शांत झालेल्या. आम्हा चार पाच जणां शिवाय गेटवर कोणीच नव्हतं. सर्व बंदर गुडुप्प झोपेच्या तयारीत !
गेटवर गेटमन उभा होता. गेट जवळच्या कस्टमच्या ऑफिसमध्ये आत आणखीन एक शिपाई काम करत होता. आम्ही दोघं, हरी, रेडिओ ऑफिसर जडे आणि 5th इंजिनियर अनिल मदान गेट जवळ आलो. सायकल रिक्षातून उतरलो. गेटमनला पास दाखवले. बाकी सर्वांचे पास त्याने तपासले. पास बरोबर आहेत असा इशारा केला.
माझा पास चेक करताना त्यानं विचित्र नजरेने पाहिलं. डोळे तांबरलेले, त्याला धड उभं राहता येत नव्हतं. शब्द बरळल्यासारखे येत होते. दारू ढोसून तो अगदी तर्र झाला होता.
बाकी सगळ्यांना त्यानं आत सोडलं आणि माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत कुत्सित हसत म्हणाला, “इनको मैं अंदर नही जाने दूंगा | कितना पैसा देकर ये माल उठाके लेके आये हो ?”
तो काय बोलतोय हे एक क्षण मला समजलंच नाही. मुकुंदांनी त्याला माझा गेटपास परत दाखवला. ही माझी बायको आहे हे त्याला सांगायला लागले. त्यावर तो हमरी-तुमरी वर आला. निर्लज्जपणे मुकुंदांना म्हणाला, “ये लडकी का गेटपास नकली है| आप लोग अंदर जाओ | इनको रातभर इधर ही रहने दो, सुबह देखेंगे |” दात विचकत बरळला, माझ्याकडे बघून बेशरमपणे हसला.
मला तर अंगावर कुणीतरी उकळतं पाणी, जळते निखारे ओततंय असं वाटलं. उभ्या जागी रडू फुटलं. संतापानं मन उकळायला लागलं. मी ओरडले, “मैं इनकी पत्नी हूॅं | आप ये क्या बोले जा रहे हो ?” मुकुंदांच्या चेहऱ्यावर संताप उसळत होता. ते काही बोलणार तोच हरी आणि जडे पुढे सरसावले. हरी मुकुंदना म्हणाला, “बापू तू पहिले इसको सम्हाल. डर गई है वो, कितनी रो रही है | इस गेटमन को हम देख लेंगे |”
मला बाजूला घेऊन मुकुंद उभे राहिले. म्हणाले,” तू घाबरू नकोस. तो प्यालेला आहे. तो काहीही करू शकणार नाही. त्याला जे बोलायचे ते बोलू दे. तू लक्ष देऊ नकोस. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही.”
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हरी आणि जडे यांनी त्याला शांत करायचा बराच प्रयत्न केला, समजावून सांगितलं.कारण त्याने आम्हा प्रत्येकला आत जायची परवानगी देणं हे जरुरीचं होतं.
हरी म्हणाला, “हमारे सबके गेट पास genuine है | नही तो आप हमारी शिप पे चलीये और कॅप्टनसाबसे verify करिये |” पण तो आपल्या मुद्द्यावरून हटेच ना.
बरोबरचा 5th इंजिनियर अनिल मदान, पंजाबी मुलगा होता. त्याचा संयम सुटला. तो त्या गेटमनच्या अंगावर धावून गेला. आवाज चढवून ओरडला. “क्या बके जा रहे हो ? एक तो आप पी के ड्युटी कर रहे हो | हमारी भाभीजी को कुछ भी बोले जा रहे हो | हमारे साब की बीबी है वो | औरत देखी, तो कितना गंदा सोचते हो तुम” असं म्हणून त्याने तर गेटमनच्या अंगावर हात उगारला.
ड्युटीवर असलेल्या कस्टम्सच्या माणसाला मारणं हे भलतंच प्रकरण होऊन बसलं असतं. पुढचा अवघड प्रसंग ओळखून हरीने कसं बसं अनील मदानला थांबवलं.
हा आरडाओरडा ऐकून ऑफिसमध्ये बसलेला दुसरा शिपाई बाहेर आला. त्याने सर्वांचे पास तपासले आणि आम्हाला आत सोडलं.तरीही तो प्यालेला गेटमन तिथेच बरळत, हातवारे करत उभा होता.
गेटच्या आत गेल्याबरोबर आजूबाजूला कोण आहे – नाही याचं भान ही मला राहिलं नाही. मी मुकुंदांना मिठी मारली. त्यांनी मला जवळ घेतलं आणि मी ओक्साबोक्शी रडतच जहाजावर आमच्या केबिनमध्ये गेले.
मला रडू आवरतंच नव्हतं. हरी केबिनमधे आला. हरी आणि मुकुंदनी माझी खूप समजूत काढली. पण त्या गेटमनच्या शब्दांची आणि नजरेची किळस माझ्या सगळ्या अंगाला डसते आहे असं वाटत होतं. मुकुंदानी माझ्यासाठी दूध गरम करून आणलं. आग्रहानी प्यायला लावलं. हरी निघून गेला.
मी कशीबशी साडी बदलली. अंगावर गाऊन चढवला. तरीही माझे हुंदके थांबत नव्हते. त्या रात्री काहीही न बोलता बिछान्यावर मी फक्त मुकुंदांच्या कुशीत पडून होते, रडत होते.
पतीच्या प्रेमाने आणि पित्याच्या मायेने मुकुंदांनी मला जवळ घेतलं. माझ्या केसावरून, अंगावरून हात फिरवत ते मला शांत करत होते, समजूत काढत होते,आधार देत होते, धीर देत होते आणि शब्दांपलीकडच्या भाषेत मला सांगत होते “घाबरू नकोस. मी सदैव तुझ्याबरोबर आहे. मी तुला कधीही काहीही होऊ देणार नाही.”
त्यांच्या प्रत्येक स्पर्शात मला जाणवत होतं की ते माझे पती, मित्र, सखा, जिवलग सारे सारे काही आहेत.
मला आठवला विशाखापट्टणमचा तो पोक्त, पन्नाशीचा गेटमन ! रात्री नावाड्याला उठवून मी बोटीवर पतीसह सुरक्षित पोहोचते आहे की नाही हे पाहणारा, माझी काळजी घेणारा. जशी मी त्याची कुठल्यातरी जन्मातली लेकच होते आणि तो माझा पिता होता !
आणि
हा नराधम ही गेटमनच ! पण याच जन्मातला वैरी बनून आला होता !
हा ही एक दाहक अनुभव गाठीशी जमा झाला.
सांगली सारख्या लहान गावातून आलेली, आईवडिलांच्या भावंडांच्या मायेच्या सुरक्षित कवचात लहानाची मोठी झालेली, नवं लग्न झालेली, नुकतीच बावीशी सरलेली, एक मध्यमवर्गीय तरुण मुलगी होते मी !
जगातल्या पुरुषी विकृतीशी झालेली ही पहिली ओळख ! ही ओळख आयुष्यभरासाठी खूप काही शिकवून गेली.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

एका नवविवाहितेला आलेले जहाजावरचे विविध प्रकारचे अनुभव अतिशय उत्कटपणे शब्दबद्ध केले आहेस. भरतकामात मन गुंतवण्याचा प्रयत्न, त्यानंतर नागराजाचे दर्शन, त्या गावातील पाणीपुरीचा आस्वाद आणि तंबूतील चित्रपटाचाही घेतलेला आनंद आणि सर्वात शेवटी गेटमनचे अत्यंत विचित्र असे घृणास्पद असं बोलणं आणि वागणं या सगळ्याचा तुझ्यासारख्या संवेदनाक्षम मनाच्या व्यक्तीच्या मनावर वेळोवेळी काय परिणाम झाला हे तू खूप प्रभावीपणे व्यक्त केले आहेस.
जगाचा अनुभव नसलेल्या तुझ्यासारख्या भाबड्या पत्नीला त्या त्या वेळी सांभाळण्याचं अत्यंत जबाबदारीचे काम शांतपणे, समंजसपणे आणि अत्यंत हुशारीने मुकुंदरावांनी वेळोवेळी केले. अशाप्रसंगी पती-पत्नी मधील प्रेमाचा अंकुर कसा वाढत जातो हेच दिसून येते.
खूप सुंदर लेखन. पुढील लेखनास शुभेच्छा.
वेदवती ताई तुमच्या *माझी जीवननौका* याचा अठरावा भाग.
पढील भागा नंतर तुमच्या लेखनाचे टीन एज संपणार आहे.
आता आम्ही पोर्ट हल्दियाच्या सफरीवर तुमच्याबरोबर आहोत.
तुमच्या यजमानांचं वॉच कीपिंग आणि तुमचं हाऊस कीपिंग छान जोडी.
तुमचं पाण्यावर तरंगणार जीवन खरोखरीच मनमोहक आहे.
या नवीन प्रवासामध्ये तुम्ही भरत कामाचे प्रयोग केलेत.
मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याच्या वाटेवरच तुम्हाला नागराजाचे दर्शन झाले आणि तेही दहा मिनिटे. देवदर्शन कुठल्या स्वरूपात घडेल हे आपण सांगू शकत नाही हेच खरे.
तुमच्या यजमानांच्या प्रसंगावधानामुळेच तुम्ही देव दर्शनाला शांतपणे जाऊ शकलात.
अनोळखी देशामध्ये तुम्हाला देवदर्शन म्हणजे मायेचा मऊ हात पाठीवर फिरवल्यासारखे वाटले हे वर्णन खरंच खूप भावुक करणारे होते.
दिवे लागणीच्या आधी घरी या असे सांगणारे आपले आई-वडील आणि त्यांची माया तुम्हाला जहाजावरील लोकांकडूनही मिळाली हे तुमचे खरोखरीच भाग्य. हल्दिया गावाचे वर्णन खूपच छान.
पाणीपुरीचाही आनंद तुम्ही घेतलात.
बिहारी *फुचका* खाऊन तुमचा *पचका* न होता तुम्ही मनसोक्त असा आस्वाद घेतलात हे खरोखरीचेच आश्चर्यकारक.
पुन्हा एकदा पार्ल्याच्या शर्माची आठवण झाली. आपल्या गावाची आठवण कुठेही बाहेर गेल्यावर नक्कीच होते.
तुम्ही फुचका महोत्सवाचा *स्वर्गीय* आनंद मुलांना त्या खायला घालून मिळवलात.
तंबूतल्या थिएटरचाही अनुभव तुम्हाला घेता आला.
हे आनंदाचे क्षण अनुभवल्यानंतर मात्र तुमचा जीवघेणा अनुभव थोडा वेळ आम्हाला घाबरवून गेला पण तुमच्या रक्षणासाठी *हरी* धावून आला.
पुन्हा एकदा विशाखापट्टणमचा तारक तुम्हाला आठवणे साहजिकच होते.
हा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून गेला असणार.
तुमचा *मितवा*
मित्र
तत्त्वज्ञानी
वाटाड्या
तुमच्याबरोबर असल्याने तुम्ही या अनुभवाला सहज सामोरे जाऊ शकलात.
अशी ही मिश्रभावनांची तुमची सफर खूपच रोचक होती.
*डॉ. सुरेखा विवेक जोशी*
इतकी छान गोष्ट ऐकून रमून गेले होते तेवढ्यात gateman चा किस्सा सुरू झाला!!! खरच किती नीच वृत्तीची लोक असतात या जगात आणि आपल्याला त्या वयात ना त्याची जाण असते ना अनुभव !! आणि असे अनुभव विसरणं ही शक्य नसतं. I’m sure there may be other pleasant incidents which you may have forgotten but this unpleasant one would be difficult to forget. But life moves on…..
हल्दीया गावातल्या या सगळ्या आठवणी आणि त्यांचे अनेक पदर! रुबाबदार नागराजाचं अनोख दर्शन, फुचके खाण्यातला तोंडाला पाणी सुटणारा अनुभव, आणि बोटीवर परततानाचा गेटमनचा बेशरमपणा दाखवणारा विचित्र अनुभव! अनेक त-हा. नौके वरच्या जीवनाची अनेक पैलू दाखवणारी ही विलक्षण मांडणी खरी…
किती वेगवेगळे अनुभव आले तुम्हाला वेदवतीताई. चांगले आणि वाईट. पण आपलं माणूस सोबतीला असल की सगळ निभावतं.
सलग अनेक दिवस जहाजावर कंटाळवाणे होत असेल का? असा प्रश्न तसा अनुभव नसल्याने सहाजिकच पडतो.
पण तुझी जीवननौका वाचून मात्र त्यातही किती वैविध्य असू शकतं याचा अंदाज येतो.
तुमच्या सहजीवनाची सुरुवात आगळी वेगळी झाली हे मात्र खरं!🤩
पाणीपुरी भारीच,नागराजची भिती वाटली पण तो त्याच्या मार्गाने गेला पण गेटमनरुपी राक्षसाला धरुन बडवावं वाटलं पण त्या वेळची तुझी जी आवस्था झाली तो प्रसंग अंगावर काटा आणणारा होता
मस्त. Nagrajanchi भीती वाटली, पाणीपुरी प्रकरणं वाचताना तोंडाला पाणी सुटले आणी getman चा राग hi आला.
जिथं आपलं कुणीच नाही अशा जागी मिळणारं मुक्त स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला कधी उभी राहणारी निराधारपणाची जाणीव, दोन्हीही या एकाच लेखात व्यक्त झालं आहे. खूप छान!