मारुती चित्तपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदावर कार्य केले. कर्नाळा, नवेगाव, नागझिरा, मेळघाट अभयारण्याच्या विकासात भरीव योगदान दिले. वन्यजीवन संरक्षणामध्ये भरीव योगदान देताना निसर्ग सानिध्यात राहून निसर्गधन आपल्या शब्दांतून व्यक्त केले.
‘पक्षी जाय दिगंतरा १९८३ ‘, ‘जंगलाचं देणं ‘१९८५, ‘रानवाटा’१९९१, ‘शब्दाचे धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’ १९९३, ‘घरट्यापलीकडे ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड ‘, ‘आपल्या भारतातील साप’ २००२, ‘आनंददायी बगळे’ , ‘निळावंती पक्षी कोश ‘२००२, ‘चैत्रपालवी’, ‘जंगलाची दुनिया’ सारखे बाल वांड्ग्मय यामुळे शासनाने अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे. साहित्यामध्ये हिरवी भर घातली म्हणून अनेक साहित्य पुरस्कार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले.
चित्तमपल्ली यांनी आपल्या ललित गद्यातून कृषी व्यवसायाचेही दर्शन घडविले आहे. व्यंकटेश माडगूळकर यांचा स्नेह सहवास आणि शैली यांचे प्रतिबिंब चित्तमपल्ली यांच्या ललित गद्यातून दिसते. तरीही एक वन्यजीव तज्ज्ञ म्हणून एक लेखनदृष्टी असतेच ते प्रकर्षाने जाणवते. ‘जंगलाचे देणं’, ‘रान वाटा’ हे ललित गद्य इतरही ललित गद्य लेखनाचे प्रतिनिधित्व करतात म्हणून वरील दोन पुस्तकाच्या अनुरोधाने अभ्यास करता येईल कृषी जीवनाची काही वैशिष्ट्ये पुढे आली आहेत ते पाहता येईल.
जंगलात वसलेली जाणारी शेती व वस्तीचे स्वरूप पाहता महत्तप्रयासाने शेती अस्तित्वात येते आहे. गांधारी गावात माधवराव पाटलाच्या पूर्वजांनी गाव वसवितांना जमिनी दिल्या परंतु या लोकांचं लक्ष त्याकडे नसते. आजही तिथले गोंड आदिवासी देवधान, आळंबी, वेळूचे कोब, कंद, कडू कांदे, मोहाची फुले, कमलकंद यावर आपली उपजीविका करतात. शिकार, मत्स्यधन यावर आनंदाने जगतात. सागाची शेती तिचं हत्तीपासून संरक्षण करणे अवघड झाल्याने वारंवार शेती करावी लागते. आजूबाजूच्या गावातून लोकांना कामासाठी आणावं लागतं. मध गोळा करणारा माहुजी जंगलात राहून गुरं राखतो. त्याला चार बायका, खंडीभर मुलं, आता दोन बायका आहेत एक शेती बघते तर दुसरी कंदमुळे गोळा करते. असं व्यक्त केले. गाळपेर रानात गहू, हरभरा होतो त्याची रात्रंदिन राखण करावी लागते. त्यासाठी घरातील सर्वजण कष्ट करतात.

जमिनीचा पोत कमी झाला की; पळसाचं प्रमाण वाढू लागते, गुरु ढोरं, शेळ्या मेंढ्या पळसाच्या पानाला तोंड लावत नाहीत म्हणून निकृष्ट जमिनीचा प्रतीक पळस आहे. बालपणाच्या शेतीची चित्तमपल्लींना ओढ आहे. सोलापूर जवळ असणारी हाथीबावडी परिसरात मन रमत होते, त्यांना आल्याबरोबर मळ्यात बरे वाटे पण आता शेती विकल्यामुळे तिथे द्राक्षाचे मळे फुलवल्याचे दिसते. अंगाला माती न लागू देता हे मालक मळे फुलवतात. बालपणाच्या या दुःखाची सल आहे म्हणून रानातल्या घरातून जंगलातल्या घरी राहायला आलो; तेव्हा पुन्हा माझ्या घरी राहायला आल्यासारखे वाटते ही उदात्त भावना इथे व्यक्त होते.
इथले पशुपालन पाहता जंगलातील मथुरा जमानाचा मुख्य धंदा गाय पाळण्याचा आहे. धीवर, ढोकरांची अंडी गोळा करून ते विकतात, टेकराज गिळतात तो खाल्ल्यावर ज्याला पचतो तो निरोगी राहतो. माधवराव पाटलाच्या बांधावर कासवे आहेत. याचा उल्लेखही येतो. बासरी वासाचे रान हारांच्या दोन्ही बाजूने ओढ्या काठी आहे. बासरी बासाच्या रांजी इथेच आहेत. दूरदूरचे लोक येऊन या बासरीचे बास घेऊन जातात. घोटलावर राहणारे युवक युवती नाच गाण्याच्या बेहोशीनंतर पहाटे चार-पाच वाजता उठून शेतीच्या कामाला निघून जातात. वंजारी शेतकरी पारध्यांना शेतावर कामाला बोलवतात. ते लोक नाव सांगत नाहीत, एक स्त्री तर अंगावर धावून आली, “मला जमीन देत असशील तर नाव लिहावे नाहीतर नाव काढून टाक” अशी इथे माणसं आहेत. फासेपारधी गावात राहिला आला की शेतकरी पोलिसात रिपोर्ट करतात. तणमोराची विक्री करणारा पारधी कुणब्यासारखा राहतो त्याच्याकडे दोन-चार एकर शेती असते, व्याजाने तो पैसे देतो.
शेतीच्या उपयुक्त कीटकाविषयी मॅसन यांनी लिहिले आहे. ते म्हणतात, “प्रती हेक्टर ज्वारी कापसाचे उत्पन्न यामुळे मिळेल.” याबरोबर काही समस्याही इथं आहेत. विषारी औषधाच्या फवाऱ्यांने तनमोर पक्षी मारतात आणि वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण होत आहे. दिवारू चुलबंद तळ्यात मासे पकडणारा पण तेथे आता मासे मिळत नाहीत कारण आजूबाजूच्या वाडीतल्या उसाला घातलेल्या खाताना तिथलं पाणी खराब झाले. दिवारूला पावसाचा अंदाज व्यक्त करणारे ज्ञान आहे. त्या नक्षत्राच्या पाण्यावर कुठले मासे कधी व कोठे मिळतात याचा पत्ता लागतो. शिकारीवर बंदी आल्यावर माधवराव पाटील आता घरची थोडीफार शेती करतात.
मारुती चित्तपल्ली यांच्या ललित गद्यातून जंगलाच्या शेतीचे चित्रण केले आहे. जंगलात शेती मत्प्रयासाने अस्तित्वात येते. कंदमुळे गोळा करणे, शिकार करणे हाच इथला व्यवसाय! सागवानाची शेती, गहू हरभऱ्याची शेती तिचं हत्तीपासून, वन्यजीवापासून संरक्षण करणे अवघड आहे. त्यांना निकृष्ट गाळाची जमीन निकृष्ट ओळखता येते. सोलापूरच्या शेतीचं व्यवसायकरण व अंगाला माती न लागू देता द्राक्षाची शेती करणारे शेतमालकही चित्रित केले आहेत. पशुपालन जंगलात उपजीविकेसाठी व विक्रीसाठी केली जाते. बासरी रानाची ओढ आदिवासींनाही आहे. तनमोराची चोरी करणारे आता शेतीत रमू लागले आहेत.
आता वंजारी, परद्यांना शेतावर कामावर बोलावतात. शेतीच्या जंगलातही समस्या आहेत तिथं आधुनिकीकरण वाढू लागले आहे.सरकारी जमिनीवर अतिक्रमण होते, विषारी औषधाची फवारणी, वाढती लोकसंख्या, उसाच्या खताने तळ्यातले मासे मरतात. दिवारुला पावसाचा अंदाज बांधता येतो व मासे कोठे मिळणार याचा पत्ता मिळतो तो कसा मिळेल ? शिकार सोडून आता गावकरी शेतीकडे आकुष्ट झाले आहेत. अशा वैविध्यपूर्ण व नाविन्याने ज्ञात होणारी शेती चित्तमपल्ली यांच्या च्या ललित गद्यामुळे माहित झाली हे अरण्य ऋषी चित्तमपल्ली यांचं भरीव योगदान स्वागतार्ह आहे.
— लेखन : प्रो.डॉ. सुवर्णा गुंड चव्हाण.
मराठी विभाग प्रमुख, माऊली महाविद्यालय, वडाळा, सोलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
चितमपल्ली सर हे केवळ अरण्यऋषी नाहीत तर सिद्धहस्त मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्या जीवनाचे सुरेख चित्रण.