Homeलेख"युद्ध थांबविण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा"

“युद्ध थांबविण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा”

सध्या इराण व इस्रायल देशात घनघोर युद्ध सुरु असून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने इस्रायल देशास साथ दिली आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून रशिया या बलाढ्य देशाने अप्रत्यक्षपणे इराणला साथ दिली असून, चीन, दक्षिण कोरिया हे देश सुद्धा इराणच्या बाजूने आहेत. इकडे युरोपियन देश इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अमेरिकेच्या बाजूने उभे आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष खोमेनी आणि त्यांचे ४० पेक्षा अधिक महत्त्वाचे अधिकारी हे इस्रायल व अमेरिकेच्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण इराण देश बदल घेण्यासाठी पेटून उठला आहे. त्यांनी देशात लाल झेंडा फडकवून युद्धास तयार असल्याचा संकेत दिला आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून पुन्हा इस्रायल व अमेरिका हे इराक आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करू लागले आहेत. इराणनेही इस्रायल व अमेरिकेचे युद्धात असणारे ओमान, कतार, बहरीन यांसारख्या लहान राष्ट्रांवर हल्ले सुरू केले आहेत. इराकच्या शाळेवर ड्रोन हल्ला करून १९० विद्यार्थ्यांचा व दहा ते बारा शिक्षकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. अलिकडे तर इराणने दुबई सारख्या जगातील अतिशय सुरक्षित अशा शहरावर सुद्धा हल्ले केले आहेत.

ही परिस्थिती पाहता दुसऱ्या जागतिक महायुद्धाची आठवण होऊन मन सुन्न होते. अमेरिकेने व त्यांच्या मित्र राष्ट्रांनी जपानवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे भस्मसात झाली. या अनुभवातून झालेल्या विषारी किरणोत्सर्गाने आजही जपानी लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. म्हणजे अणुबॉम्ब हे किती घातक व मानव संहार करणारे आहे, हे लक्षात येते. अशीच अणुबॉम्ब निर्मिती इराण करत असून, यास अमेरिकेचा विरोध आहे. ओमान या देशाच्या मदतीने अमेरिकेने इराणची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३६ वर्षांपासून अमेरिकेचे हे प्रयत्न सुरू आहेत. परंतु इराण अणुबॉम्ब निर्मितीचे कार्य जगातील कोणत्याही देशाच्या पर्यवेक्षणाशिवाय, गुप्तपणे चालू ठेवत आहे. याचा धोका इस्रायल व त्याच्या मित्र राष्ट्रांना, तसेच जगातील सर्व मानव जातीस अधिक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे युद्ध सुरू झाले आहे. हझबुल्ला, हमास यांसारख्या संघटनांनी इराणच्या या युद्धास पाठिंबा व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे वर्चस्ववादी धोरण आणि इराणचे हटवादीपणाचे धोरण हे या युद्धाचे प्रमुख कारण असून, इस्रायल देशास युद्धभूमी बनवून अमेरिकेने या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. याचा संपूर्ण जगाच्या केवळ अर्थव्यवस्थेवरच परिणाम होत नसून, जागतिक राजकारण ढवळून निघत आहे. चंद्रावरच्या मोहिमा, मंगळावरील मोहिमा, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, मानवाने केलेली वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, या सर्व बाबी या युद्धामुळे झाकोळल्या जात आहेत. युद्धामुळे विकास थांबतो. भौतिक, जीवित हानी होते आणि देश कर्जाच्या खाईत लोटला जातो, हा इतिहास आहे. तरीसुद्धा एखाद्या देशाचे नेतृत्व आक्रमक असले आणि तो देश कोणाच्या तरी हातातील कठपुतळी बनला असेल, तर त्या देशाचे नुकसान तेथील नागरिकांना त्रासदायक ठरते. आज युक्रेन व रशिया हे युद्ध त्याचाच दाखला म्हणता येईल.

इराणने पर्शियन खाडीमार्ग रोखून संपूर्ण जगाची सागरी मार्गाने होणारी आयात निर्यात थांबवली आहे. विशेषतः खनिज तेल, धान्य तसेच इतर संसाधन उपयोगी वस्तू व औद्योगिक उत्पादन व्यापार धोक्यात येऊन, सर्वच खनिज तेल आयात करणाऱ्या व निर्यात करणाऱ्या राष्ट्रांची आर्थिक कोंडी झालेली आहे.

भारत देश ८० टक्के खनिज तेल आयात करतो. ही आयात बंद झाली तर त्याचा भारतातील उत्पादन क्षेत्रावर गंभीर परिणाम होऊन, उत्पादन खर्चात वाढ होऊन, महागाई वाढेल. आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होऊन, २०४७ मध्ये जागतिक महासत्ता बनण्याचे भारताचे स्वप्न साकार होण्यास पुढे कालखंड वाढेल.

आज पर्यटनातून जग जवळ आले असून, विविध संस्कृतीचे लोक परस्परांशी मानवतेतून एकत्र येत आहेत. सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जे जग बांधले ते लाभत आहे. जगातील सर्वच मानव जात विकासातून नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यास यशस्वी होत आहे. कोविड सारख्या दुर्धर रोगावर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधनातून, विशेषतः भारताच्या पुढाकारातून मानवाने मात केली. हा त्याचा पुरावा आहे. युद्ध ही मानव निर्मित आपत्ती आहे. मानवाच्या भावनिक अहंकाराचा तो परिणाम आहे. त्याचे वास्तवात रूपांतर झाले, तर मानव संहार होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जगातील ज्या राष्ट्रांना हे तिसरे महायुद्ध होऊ नये असे वाटते, त्या राष्ट्रांनी त्वरीत एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतासारख्या सहिष्णुतेच्या राष्ट्राने यात नेतृत्व करून वाटाघाटी केल्यास, हे तिसरे महायुद्ध थांबू शकते, अशी आशा करायला हरकत नाही.

— लेखन : प्रा. मनोहर यादव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. छान ,सरलतेने पूर्ण माहिती दिली आहे.
    आमचे विचार सुद्धा स्पष्ट झाले.

  2. Ekdam barobar aahe yudha band hone hi jagachi magani aahe ani yuddhamule jag parat 20 varshe mage chalale aahe.

  3. युद्धाला १ महिना हुण गेला। वार्तालाप मार्फत मार्ग नेघाले तर उत्तम।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments