Monday, September 9, 2024
Homeलेखरविंद्रसिंह जाधव : एक सच्चा, निर्मळ आणि अजातशत्रू प्रशासक

रविंद्रसिंह जाधव : एक सच्चा, निर्मळ आणि अजातशत्रू प्रशासक

निवृत्त आय ए एस अधिकारी श्री रविंद्रसिंह जाधव साहेब यांचं नुकतंच अचानक निधन झालं. दुसरे निवृत्त आय ए एस अधिकारी, जाधव साहेबांचे मार्गदर्शन लाभलेले, त्यांचे सुहृद डॉ पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी त्यांच्या आठवणी, कार्यशैलीवर फेसबुक वर लिहिलेला भावपूर्ण लेख पुढे देत आहे.

जाधव साहेब नाशिक विभागीय आयुक्त असताना तिथे मी विभागीय माहिती उपसंचालक होतो. तर भापकर साहेब मराठवाडा विभागीय आयुक्त असताना मी औरंगाबाद येथे माहिती संचालक होतो. या दोन्ही ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदर्श अधिकाऱ्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच. जाधव साहेबांना विनम्र अभिवादन.
– संपादक

श्री रविंद्रसिंह जाधव आय ए स यांचं दिनांक ९ जुलै २०२४ रोजी दुर्दैवी निधन झालं. सत्तरीत असून पन्नाशीचा वाटणारा हा एक उमदा, सशक्त, प्रामाणिक आणि फक्त आणि फक्त भलं करणारा, अजातशत्रू प्रशासक बघता बघता अविश्वसनीयरित्या काळाच्या पडद्याआड जावा ही सर्वांसाठी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी घटना. त्याच दिवशी रात्री त्यांच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संभाजीनगर येथून मी, श्री भास्करराव मुंडे आणि आम्हा सर्वांचे परमस्नेही
श्री उत्तमसिंह पवार साहेब आम्ही उपस्थित होतो व आपणा सर्वांच्या वतीने जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

उपजिल्हाधिकारी जळगाव पदापासून अप्पर अधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ, जिल्हाधिकारी अमरावती, राष्ट्रपतींचे सचिव, विभागीय आयुक्त नाशिक आणि पुणे विभागाचे माहिती आयुक्त इत्यादी पदांवरील त्यांचा प्रवास हा अचंबित करणारा आहे.

१९८४ पासून म्हणजे ४० वर्षांपासून आमचे मित्रत्वाचे आणि कौटुंबिक ऋणानुबंध. जाधव साहेब जळगाव विभागाचे प्रांताधिकारी होते आणि मी प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर म्हणून जळगावला रुजू झालो होतो. त्यांचा मी अत्यंत लाडका प्रोबेशनर होतो. कुटुंबातील सदस्य, एक लहान भाऊ समजूनच ते माझी खूप काळजी घेत असत. तेव्हा जळगाव प्रांतामध्ये जळगाव, भुसावळ, यावल, रावेर आणि एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) अशा पाच तालुक्यांचा समावेश होता. अत्यंत मोठा आणि समृद्ध असा हा उपविभाग होता. त्यांच्या अनेक बैठकांना मी उपस्थित राहत असे. तसेच त्यांच्या दौऱ्यातही ते मला आवर्जून सहभागी करून घेत असत. मी जळगाव मुख्यालयामध्येच जळगाव तलाठी, जळगाव सर्कल, जळगाव तहसील ऑफिस व जळगाव प्रांत इत्यादी ठिकाणी अटॅच असताना बहुतेक वेळ त्यांच्या सोबतच असे. त्यामुळे माझ्या प्रशिक्षण कालावधीमध्ये मला त्यांच्याकडून खूप शिकता आलं, याचाही मला अभिमान वाटतो.

१९८० च्या बॅच चे उपजिल्हाधिकारी असलेले जाधव साहेब तत्कालीन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल कुमार लखीना यांच्या तालमीत प्रशिक्षित झाले होते. त्याच दरम्यान प्रशिक्षणाचा भाग म्हणून ते चार महिन्यांसाठी आमच्या शेवगाव तालुक्याचे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्या दरम्यान मी पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत एम ए करत होतो. माझ्या सालवडगाव या मूळ गावापासून शेवगाव हे पाच किलोमीटर अंतरावर आहे. आमचा शेतीबरोबरच दुधाचा ही व्यवसाय होता. आमच्या घरचे दूध आमचे काका त्यांना घालत असत. उच्च प्रतीचे, १०० टक्के प्युअर दूध देण्याची आमची परंपरा होती. त्यामुळे सर्व दूध ग्राहक आमच्या दुधाच्या आणि आमच्या काकांच्या प्रेमात असत. जाधव साहेब ही आमच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून “नातं दुधाचं’ ” सुरू झालं.

पुढे मी फेब्रुवारी १९८४ ला जळगावला प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो. तेव्हा श्री रवींद्र जाधवसाहेब हे जळगाव उपविभागाचे व श्री भास्कर मुंडे साहेब हे चाळीसगाव उपविभागाचे प्रांत अधिकारी होते.
अत्यंत उमदे, ग्रामीण बाज असणारे, अत्यंत प्रामाणिक आणि बंधूतुल्य प्रेम करणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांसमवेत माझे तह हयात वृद्धिंगत होणारे ऋणानुबंध निर्माण झाले. मैत्री सोबत कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला. सख्खे भाऊ करणार नाहीत एवढं प्रेम त्यांच्याकडून मिळालं.

पुढे जाधव साहेबांची नियुक्ती विदर्भात झाली. अपर जिल्हाधिकारी – यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी- यवतमाळ, जिल्हाधिकारी- अमरावती इत्यादी पदावर कार्यरत असताना त्यांनी प्रशासनाला मानवी चेहरा दिला. कार्यालयाची आणि हृदयाची दारे सतत खुली ठेवणारा, आतून बाहेरून स्पटिका सारखा निर्मळ, निस्पृह, प्रेमळ व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ख्याती राहिली. ते विदर्भातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. विदर्भात सक्षम अधिकारी यावेत यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले.

जाधव साहेब अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. मी पुणे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना माझी बदली जिल्हाधिकारी, अमरावती या पदावर झाली आणि त्यांच्याकडून मी पदभार स्वीकारला.
“पुरुषोत्तम वैदर्भय जनता खूप प्रेमळ आहे, माणुसकी असणारी आहे, त्यांना जोरकसपणे पुढे नेण्याची गरज आहे. ही विरासत आता तुम्ही सांभाळा” असे म्हणत अत्यंत आनंदाने त्यांनी मला मिठी मारली आणि त्यानंतर मला समजले की माझी अमरावती जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती व्हावी म्हणून त्यांचाच पुढाकार होता व त्यांचे वजनही होते. त्यांच्यामुळेच मलाही विदर्भाचे प्रशासन कळले होते. उत्तम काम करता आल्याने त्यांच्यासारखाच सन्मानही मिळाला होता.

पुढे जाधव साहेब राष्ट्रपती महोदया आदरणीय प्रतिभाताई पाटील यांचे सचिव बनले. केवढा सन्मान होता तो ! उपजिल्हाधिकारी पदापासून सुरू झालेला जाधव साहेबांचा प्रवास, त्यांचे पुढे आय ए एस मध्ये जाणं आणि कठोर परिश्रम यातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतरची ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेलेली होती. संपूर्ण ५ वर्षे राष्ट्रपतींचे सचिव म्हणून काम करण्याचे भाग्य फक्त आणि फक्त जाधव साहेबांनाच मिळाले असेल.

अनेक देशांना भेटी, अनेक राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायसंस्था, उद्योजक, सर्व क्षेत्रातील उच्चतम व्यक्तिमत्वे, शास्त्रज्ञ, कलावंत, खेळाडू, लोकप्रतिनिधी यांच्यापासून तर शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांच्या पर्यंत केवढी विविधता, ज्ञान, माहिती, इत्यादीचा अनुभव घेण्याची संधी लाभली. एवढी उत्तुंग जबाबदारी निभवताना त्यांच्यातील एक सच्चा माणूस, प्रामाणिक, कष्टाळू, एक अवलिया, एक महात्मा आम्ही सर्वांनी अनुभवला आहे. चिखलदऱ्याच्या पब्लिक स्कूल मधून शिकून बाहेर पडलेला हा हिरा शेवटपर्यंत प्रखरपणें चमकत राहिला. वंचिताचे उत्थान करत राहिला.

जाधव साहेबांनी उत्तम स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आणि सकस आहार, विहार व शिस्त या बाबीही प्रयत्नपूर्वक सांभाळल्या होत्या. निवृत्तीनंतरही त्या बाबी ते अत्यंत काटेकोरपणे सांभाळत असत. जाधव वहिनी, त्यांच्या अर्धांगिनी या अत्यंत सालस. साहेब, त्यांचे कुटुंबीय आप्तसकीय, मित्र या सर्वांसाठी त्या सतत दक्ष असत. निर्भेळ, निर्मळ असे हे जोडपं आम्हा सर्वांना सतत प्रेरणादायी राहिलं आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या आमच्या सतत गाठीभेटी होत असत. जाधव साहेबांची भेट एक अत्यंत पवित्र, निर्मळ, खळाळणारा झरा वाटावा अशी प्रेरणादायी आणि अध्यात्मिक अशी असे. सोशल मीडिया वरून तर नेहमीचा संपर्क होताच. त्यांना व मला अमरावती जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून जिल्हावासि्यांनी दिलेले प्रेम आणि केलेला गौरव याचा त्यांना सतत अभिमान वाटत असे. संभाजीनगर महापालिकेतील माझ्या कार्यकाल बद्दल ते सतत भरभरून कौतुक करत आणि मला माझ्या प्रोबेशनरचा अभिमान आहे असे सतत गौरवोद्गार काढत असत. ते विभागीय आयुक्त नाशिक या पदावर कार्यरत असताना त्यांचे सोबत आम्ही, त्रंबकेश्र्वर, इगतपुरी इत्यादी भागात फिरायला जात असू.

राष्ट्रपती भवनामध्ये असतानाही जाधव साहेबांचा व्यायामावर कटाक्ष असे. त्यांच्यामुळेच राष्ट्रपती भवन जवळून पाहण्याची, तिथे राहण्याची आणि तेथील आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळाली. ते राष्ट्रपती भवनातील जिम मध्ये ही मला घेऊन गेले . जिम्नॅस्टच्या माझ्या काही कृती जशा की दोन पाय सरळ करून बसणे, हातावर चालणे, उभ्यानेच चक्रासन करत उलट उडी घेऊन उभे राहणे, डबल बार, सिंगल बार वरील ऍक्टिव्हिटीज इत्यादीचा त्यांना खूप अभिमान वाटे. त्यांच्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांना ओळख करून देताना माझ्या कामाबरोबरच माझ्या व्यायामाची ते तोंड भरून स्तुती करत. एवढेच काय कुठेही आमच्या कॉमन फ्रेंड्समध्ये चर्चा करताना माझ्या व्यायामाबद्दल नेहमीच बोलत याचे कारण हेच होते की त्यांनाही व्यायामाची प्रचंड आवड होती. ते स्वतःसाठी आवर्जून वेळ काढून व्यायाम करत असत.

जोपर्यंत आपण खुर्चीवर न बसता उभे राहून सॉक्स आणि शूज घालू काढू शकतो तोपर्यंत प्रकृती उत्तम समजावी अशा आशयाचा व्हिडिओ त्यांनी मला पाठवलेला होता. त्यामध्ये ते स्वतः असा प्रयोग करताना दिसत आहेत. व्यायामाची अत्यंत लागवड असणारा, त्यासाठी सवड काढणारा आणि इतरांनाही प्रोत्साहित करणारा असा हा अधिकारी. कधी कसला बडेजाव नाही, अहंकार नाही. साहित्यावरही त्यांचं खूप प्रेम. माझं साहित्य, फिल्म्स इत्यादी संदर्भातही त्यांना खूप अप्रूप वाटत असे. त्यांच्या राष्ट्रपती भवनातील वास्तव्याबद्दल, कामाबद्दल, अनुभवाबद्दल त्यांनी पुस्तक लिहावं असा माझा त्यांना खूप आग्रह असे. “मुक्काम पोस्ट.. राष्ट्रपती भवन” अशासारख्या नावाने. सुमारे १०० पानं लिहून झाली असं सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी मला सांगितलं होतं.ते राहून गेलं ना अर्धवट…..

एवढा नितळ मनाचा माणूस, सहृदयी, उत्तम व्यायाम करणारा, सक्षम, अनेक संकटं झेललेला, सतत आनंदी असणारा, साधा असलेला आणि शेवटपर्यंत साधाच राहिलेला, अनेकांची प्रेरणा व आश्रयदाता असणारा, इतक्या तारुण्यात झोपेतच निघून जावा ही अविश्वासनीय आणि धक्कादायक बाब आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांच्यावर दुःखाचा पहाड कोसळलेला आहे. आपणही सर्व सहभागी आहोत. परमेश्वर त्यांना शक्ती देवो. जाधव साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

— लेखन : डॉ पुरुषोत्तम भापकर. आय ए एस (निवृत्त)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. डाॅक्टर भापकर साहेबांनी आमच्या वर्ग मित्राची स्वर्गीय रविंद्र जाधव यांची किती अचूक व अत्यंत मोजक्या शब्दांत ओळख करून दिली. रविंद्र आमचा वर्गमित्र असल्याने आम्हाला त्यांचा नेहमीच सार्थ अभिमान वाटायचा तसेच कोणत्याही वैयक्तिक कामासाठी हक्काने त्यांच्याकडे मदत मागायचो. १९९९ ला जसलोक मध्ये माझी हृदय शस्त्रक्रिया पार पडली तेंव्हा बुलढाण्यावरून अकोला येथे बदली हवी होती नेमके महाराष्ट्र शासनाने बदल्या न करण्याचा निर्णय घेतला अशा परिस्थितीत जशी संधी मिळाली रविंद्र ने माझी बदलीचे आदेश निघाल्याची बातमी रात्री ११ वाजता त्यांचे जावाई श्री. बोराडे यांच्या मार्फत माझ्या कुटुंबियांना दिली. ७जुलै ला सकाळी जे रविंद्र शी बोलणे झाले ते शेवटचे असेल अशी शंकाही आली नाही. प्रतिभा वहीणीं सुध्दा तेवढ्याच प्रेमळ व कौटुंबिक स्नेह जपणा-या आहेत. रविंद्र च्या अकाली जाण्याची हुरहुर मनाला लागून राहिली आहे. रविंद्र ला चिरशांती लाभो व वहीणींना, कुटुंबातील सर्वांना दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏 🙏 🙏 ॐ शांती शांती शांती 🙏🙏🙏

  2. आदरणीय जाधव साहेबां बद्दल लिहिलेला लेख खूप भावना प्रधान आहे.
    जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    • श्री.भापकर साहेब यांनी व आपण रवींद्र दादांचं जे स्मरण लेख लिहिले.ते खूपच भावपूर्ण असे आहेत.दादांची नियुक्ती राष्ट्रपतींचे सचिव म्हणून झाल्याची बातमी जेव्हा आली.तेव्हा मी व ते वर्ध्याहून नागपूरला निघालो होतो.दादा तेव्हा अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नागपूरला होते व पंतप्रधांनाच्या दौऱ्याच्या तयारीसाठी आले होते.त्यांनी मला आनंदाने सांगितले की राष्ट्रपती कार्यालयाकडून संमतीपत्र व इतर फॉर्मलितीसाठी फोन होता.मला आता लगेच तयारी करायची आहे.
      दादा गेले यावर मा अजूनही विश्वास ठेवत नाही .प्रतिभा वहिनी ३मुली व जावई नातू नाती आणि आपल्यासारखे असंख्य मित्र यांना मागे सोडून दनी अस मध्येच एक्झीट घ्यायला नको होती.त्यांच्या फिटनेसचा लोक नमुना म्हणून बघत असताना ते बघता बघता निघू गेले.त्यांना माझा मानाचा मुजरा.,🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments