आशा बगे
स्त्रीच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार हा लेखनाचा स्थायिभाव असलेल्या आशा बगे यांची आज ओळख करून घेऊया…
मध्यमवर्गीय मराठी स्त्रियांच्या अनुभव आणि भावनांबद्दल लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आशाताई बगे, पूर्वाश्रमीच्या आशा वामन देशपांडे यांचा जन्म २८ जुलै १९३९ रोजी नागपूर येथे झाला.
आशाताईंचे शालेय शिक्षण नागपूर येथील ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’ येथून तर महाविद्यालयीन शिक्षण लेडी अमृतबाई डागा कॉलेज येथे झाले. त्यांनी एम.ए (मराठी) व एम.ए (संगीत) अशा दोन पदव्या प्राप्त केल्या. एम. ए. मराठी ही पदवी त्यांनी सुवर्ण पदकासह प्राप्त केली.

आशाताईंच्या घरातच संगीत आणि साहित्याच्या उच्च अभिरुचीचं वातावरण होतं. त्यामुळे त्यांच्या लेखनाचा पिंड त्या वातावरणात घडत गेला.
आशाताईंवर त्यांच्या आईचे व आजीच्या लेखनाचे विशेष संस्कार झाले आहेत. त्यांच्याकडे नाटकाचे, कीर्तनाचे, संगीताचे वातावरण होते.
संगीताचीही विशेष रुची असल्यामुळे आशाताई लहानपणापासून नाटकात काम करणे, एकांकिका सादर करणे, आकाशवाणीसाठी लिहिणे अशा गोष्टी करत. त्यामुळेच त्यांना लेखनासाठी नृत्य, नाट्य, संगीत याचा फायदा मिळाला. शिवाय संत वाङ्मयाचा अभ्यास आणि पंत काव्याचाही अभ्यास यांमुळे कथेची शैली घडत गेली.
कविता ही आशताईंची पहिली आवड. कीर्तने, नाटके, संगीत, माहेरी असणारी नोकर माणसे, भारतीय परंपरेतील सणवार यांच्या आसपासचे घडलेले अनुभव अधिक व्यक्त झाले आहेत. काॅलेजात असतानाच त्यांनी नाटक लिहिण आणि करण दोन्ही सुरू केलं.
आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’ पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौज प्रकाशनाचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी आशा बगे यांच्या लेखन शैलीला आकार दिला. पुढे मौज व आशा बगे असे समीकरणच झाले.
मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.

आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य :
अनंत (कथासंग्रह);
अनुवाद (माहितीपर);
ऑर्गन (कथासंग्रह);
आशा बगे यांच्या निवडक कथा (संपादक – प्रभा गणोरकर);
ऋतू वेगळे (कथासंग्रह);
चक्रवर्ती (धार्मिक);
चंदन (कथासंग्रह);
जलसाघर (कथासंग्रह);
त्रिदल (ललित), दर्पण (कथासंग्रह), धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (ललित कथा);
निसटलेले (कथासंग्रह);
पाऊल वाटेवरले गाव (कथासंग्रह), पिंपळपान भाग १, २, ३ (कथासंग्रह; सहलेखक – शं.ना.नवरे, हमीद दलवाई);
पूजा (कथासंग्रह), प्रतिद्वंद्वी (कादंबरी), भूमिला आणि उत्सव (कथासंग्रह);
भूमी (कादंबरी);
मांडव, मारवा (कथासंग्रह)
मुद्रा (कादंबरी), वाटा आणि मुक्काम (अनुभव कथन; सहलेखक भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया);
वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग १, २ (संपादित), श्रावणसरी, सेतू (कादंबरी);
आशाताईंच्या काही कथांचे अनुवाद तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली, इंग्लिश या भाषांतून प्रसिद्ध झाले आहेत.

आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी या कादंबरीला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. तर ‘”दर्पण”’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या साठी त्यांना केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला.
कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

स्त्रीच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार हा आशा बगे यांच्या लेखनाचा स्थायिभाव त्यांच्या कथा व कादंबऱ्यांतील अनुभवविश्व मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारे असले तरी त्याची मांडणी वेधक व विचार करायला भाग पाडणारी आहे.
मराठी कथा आणि कादंबरी लेखनात मानवी जीवनाचे सूक्ष्म कंगोरे उलगडणाऱ्या आशा बगे यांच्या लेखनाचं स्थान फार उंचीचं आहे.
आशा बगे यांना संगीताची खूप आवड असल्याने त्यांनी संगीतावरही अनेकदा लिहिले आहे. पु.ल. देशपांडे, भीमसेन जोशीं पासून ते अनेकांच्या मैफली त्यांच्या घरी रंगत.
आशाताईंवर संगीताचा पहिला संस्कार इथंच झाला आणि शब्दांनीही त्यांच्या मनात मूळ धरलं ते इथेच पुढे शब्दांच्या दुनियेत आशाताईंनी ऐसपैस मुशाफिरी केली आणि संगीतानं त्या मुशाफिरीवर सावली धरली. आशाताईंच्या लेखनात संगीताचे जे संदर्भ वैपुल्यानं येतात त्याचं उगमस्थान इथे आहे.
विदर्भ साहित्य संघाने पहिल्यांदा लोखिका संमेलन घेतले तेव्हा आशाताईंनी अगदी आनंदाने अध्यक्षपद स्वीकारले.
मराठीतील आघाडीच्या कथाकार अशी ओळख असलेल्या आशा बगे यांना राम शेवाळकर यांच्या नावाने सुरू झालेला पहिलाच ‘साहित्यव्रती’ पुरस्कार मिळणे हा त्यांच्या दीर्घ लेखन कारकीर्दीचा यथोचित गौरवच होय. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने २०२३ ला जनस्थान पुरस्काराने आशा बगे यांना सन्मानित करण्यात आले.
२०१२ ला मालतीबाई दांडेकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा दि.बा. मोकाशी पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ पुरस्कार,
डाॅ. अ.वा. वर्टी पुरस्कार, गो.नी. दांडेकर मृण्मयी पुरस्कार, कमलाबाई ओगले पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या लेखनातून आपल्याला आनंद देणा-या, पण त्यापेक्षाही त्यांच्या लेखनातून मिळणारा आनंद किती तरी जास्त आहे व मोठा आहे.आशाताईंचं ॠणी राहायचं ते त्यांनी दिलेल्या याच आनंदासाठी.

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800