Saturday, May 17, 2025
Homeकलास्नेहाची रेसिपी...

स्नेहाची रेसिपी…

उन्हाळा स्पेशल – भाग ४

: पान मिल्क शेक :

उन्हाळा सुरु होताच तऱ्हेतऱ्हेचे थंडगार पदार्थ.. सरबते, मिल्कशेक, फालुदा, मस्तानी, ज्यूसेस, आईस्क्रीम, डिझार्ट्स, कोल्डकॉफी, आईस टी, यांची रेलचेल असते आणि त्याची खरोखरच शरीराला थंडावा मिळण्यासाठी गरज पण असते. म्हणुनच आज आपण असाच एक वेगळा आणि रंग, चव, स्वाद आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शरीरासाठी खूपच उपयुक्त असा पान मिल्कशेक बनवूया. चला मग लगेंच..

साहित्य : 6..7 विड्याची पाने, अर्धी वाटी साखर, पाव वाटी बडीशेप, 12..15 वेलदोडे, 1लवंग, पाव वाटी गुलकंद, आवडीनुसार सब्जा बी, 1 लिटर दूध, हिरवा फूड कलर, थोड्या गुलाब पाकळ्या सजावटीसाठी.

कृती : सर्वांत आधी बडीशेप स्वच्छ करुन, ती धुवून घ्यावी.एका भांड्यात ती घालून त्यात वेलची, लवंग घालून बडीशेपेच्या दुप्पट म्हणजेच अर्धी वाटी पाणी घालून सर्व 3..4 तास भिजत ठेवावे. लगेंच बनवून प्यायचे असेल तर दूध कच्चे म्हणजे न उकळता घेतले तरी चालते. नाहीतर ते गॅसवर चांगले उकळून, थोडेसे आटवले किंवा घट्टपणा हवा असेल तर ते उकळताना 1 चमचा आपल्या आवडीच्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर किंवां कॉर्न फ्लोअर थोड्या कोमट दुधात मिसळून दुधात मिसळावे व सतत ढवळावे म्हणजे गाठी न होता लगेंच आटून दाट होईल.मग ते थंडगार करावे.

सब्जा बी 15..20 मिनिटे आधी भिजवावे म्हणजे ते छान भिजून फुगेल.
आता विडयाची पाने कट करून मिक्सरच्या भांड्यात घालावीत. त्यातच गुलकंद, बडीशेप, लवंग, वेलदोडे पाण्यासाहित घालावेत. कारण भिजल्यामुळे पाण्यात सर्व स्वाद उतरलेला असतो. त्यामुळे ते पाणी फेकून न देता ते मिक्सरमध्येच घालावे कारण पाने आणि सर्व एकदम बारीक वाटण्यासाठी ते लागतेच. नंतर ते मिक्सर मधून जास्तीतजास्त बारीक पेस्ट होईपर्यंत फिरवावे. लागले तर थोडे पाणी घालावे म्हणजे एकदम बेस्ट पेस्ट होते. आता ही पेस्ट बारीक गाळणीतून गाळून घ्यावी. म्हणजे जाड चोथा वरती राहील. लागल्यास पुन्हा एकदा हे मिक्सर मधून फिरवून गाळून घ्यावे.आता हे मिश्रण जाड बुडाच्या भांड्यात किंवा नॉनस्टिक कढईत उकळण्यासाठी ठेवावे.

त्यात साखर घालावी. उकळी येऊन त्यातील पाणी संपून थोडासा चिकटपणा जाणवला की हे काढून थंड करून घ्यावे. त्यात अगदी किंचित हिरवा फूड कलर घालावा व छान ढवळावे म्हणजे एकदम सुंदर रंग येतो. आता आपले पान सिरप तयार आहे.
आता थंड गार झालेले दूध काढून त्यात साधारण दोन ते अडीच डाव हे तयार पानसिरप
घालावे. नंतर मस्त फुगलेले सब्जा बी घालावे आणि काही आईसक्युब्ज घालून वरून गुलाब पाकळ्या घालून हा आकर्षक ‘पान मिल्कशेक’ थंड गार सर्व्ह करावा. वरून पान आईस्क्रीम किंवा व्हनिला आईस्क्रीम घातले तर ही पान मस्तानी अधिकच सुरेख लागते. त्यात जर शेवया उकडून घातल्या तर याचा पौष्टीक आणि
पोटभर असा थंडगार पान फालुदा दिल खुष करून टाकतो. मन तृप्त होते.

वैशिष्ट्य : विड्याची पाने किती गुणकारी असतात हे सर्वांना ठाऊकच आहे. म्हणूनच तर आपल्या कोणत्याही उत्सवात, सणात, देवकार्यात, शुभकार्यात हे लागतेच. बाळंतीण बाईला दररोज विडा खायला देतात. शरीराची झीज भरून काढण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हाडाच्या मजबूतीसाठी, दात आणि मुखाच्या उत्तम आरोग्यासाठी हे खूपच गुणकारी आहे. त्वचेचे काळे डाग घालवण्यासाठी, कँसरचा धोका टाळण्यासाठी, कॅलिस्टोल नियंत्रीत करण्यास, निरोगी ठेवण्यासाठी, वेदना शामक गुणधर्म आणि सुक्ष्मजीव जन्तु विरोधक असल्याने कापलेली जागा, पूरळ, व्रण यावर लेप लावला तर, या बरोबरच फोड, गळू, बेंड आल्यास तेल लावून गरम करून ते बांधल्यास उष्णतेमुळे ते पिकून फुटते. यशिवाय अस्थमा, दमा, श्वासाची दुर्गंधी दूर करणे, बद्धकोष्ठता, अपचन यांची समस्या दूर होते, शिवाय मूड सुधारण्यासाठीही पान खूप प्रभावी असते.
या फायद्या बरोबरच गुलकंदातील, सब्जातील थंडावा, दुधातील पौष्टीकता हे गुणसुद्धा यातुन
मिळतात शिवाय दिसायला आकर्षक आणि इतर कोणत्याही शीतपेयापेक्षा हटके आणि टेस्टी आहे. आता नक्की करून पहाच मग !

“हेझलनट् कोल्ड कॉफी विथ न्युटेल्ला चॉकलेट”

आतापर्यंत आपण उन्हाळ्यात बनवली जाणारी भरपूर कोल्ड्रिंक्स बनवायला शिकलो. अगदी विविध प्रकारच्या भाज्या, फ्रुट्स, नट्स या पासून बनवलेले हेल्दी ज्यूसेस् आणि मॉकटेल्स, सोलकढी पासून ते मठ्ठा ,मसाला ताक इथपर्यंत . तसेंच कोल्ड कॉफीचेही सर्वांना मनापासून आवडणाऱ्या कॉफींचे प्रकार पाहिले. आजही तशाच अजून मुलांना ,कॉलेजमधील तरुण वर्गाला ,तसेंच वयस्कर लोकांनाही शक्तीवर्धक , उत्साह आणणारी ही ‘हेझलनट् कोल्ड कॉफी विथ न्यूटेला चॉकलेट’ बनवूया.

साहित्य : 6..7आईसक्युब्ज , 2..3 चमचे कॉफी सिरप , 3 चमचे क्रीम , पाऊण कप दूध , 1 स्कूप व्हनीला आईस्क्रीम , व्हीपड क्रीम , 2 चमचे अक्रोडाचे तुकडे , न्यूटेला चॉकलेट 2 तुकडे , चोकोचिप्स ,2 आईसक्युब्ज.

कृती : प्रथम काचेच्या किंवा जाड प्लास्टिकच्या बाटली मध्ये कॉफी सिरप घालून दूध घालावे .मग बर्फाचे तुकडे घालून थोडेसे क्रीम व चोकोचिप्स घालून थोडे अक्रोडाचे बारीक तुकडे घालावेत व भरपूर फेस येऊन क्रीमी होईपर्यंत शेक करावे . त्यानंतर काचेचा ग्लास घेऊन त्यात 1 न्युटेला कॉफीचा तुकडा घालून त्यावर ही शेकर मधील कॉफी घालावी . मग त्यावर व्हनीला आईस्क्रीमचा एक स्कूप घालून त्यावर फ्रेश क्रीम घालावे .शेवटी चॉकलेटचा तुकडा ठेवून चोकोचिप्स आणि अक्रोडाचे तुकडे घालून मस्त सजवून थंडगार कॉफीचा आकर्षक ग्लास ताबडतोब सर्व्ह करावा.

वैशिष्टय: ही कोल्ड कॉफी चॉकलेट , व्हनिला फ्लेवर ,कॉफी यांच्या कॉम्बिनेशन मुळे खूपच टेस्टी बनते तर क्रीमी सुद्धा बनते त्यामुळे हिचा रिचनेस आणखी वाढतो . शिवाय अक्रोडामुळे हेल्दी ,शक्तिवर्धक सुद्धा आहे . अक्रोडातील ऑइल शरीरासाठी खूपच उपयुक्त असते . हार्ट च्या फ़ंक्शन साठी उत्तम असते . अधून मधून दाताखाली आल्यावर खूप मज्जा येते . म्हणूनच हे बेस्ट टेस्ट बरोबरच आरोग्यासाठीही उत्तम असे शीतपेय आहे . नक्की बनवाल ना ?

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८