काल जागतिक जेष्ठ नागरिक दिन होता. त्या निमित्ताने हे चिंतन…. जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
वसंत ऋतू येतो. नऊ रंग सोबत घेऊन येतो. राने जंगले फुलांनी बहरतात. अनेक जिवजंतू हे रंग माखुन येतात. पानोपानी कळ्याफुले बहरत येतात. मोराचा घननीळ रंग, हंसाचा शुभ्र, कावळ्याचा का, ळा, पाने हिरवी, आकाश निळसर, पांगारा काटेसावर लाल तर जॅकरांदा अनेक रंगात, अबोली, गुलाबी गुलाब, पिवळा सोनचाफा. असे अनेक रंग या ऋतूत डोळ्यात भरतात. निसर्गाची रंगपंचमी चालू असताना सगळी सृष्टीच आपल्या विश्वात दंग असते. जो तो आपले जिवन सार्थ करायच्या मागे असतो. कर्तव्ये पूर्ण करत असतो. जणूकाही हा सृष्टीचा नियमच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हा नवरंगी वसंत एकदाच पण नक्कीच बहरत असतो.
पण वसंतानंतर कधीतरी शिशिरही प्रत्येकाच्या वाट्याला येतो पानगळतीचा.
आपले आयुष्य आपली कर्तव्ये पार पाडत संपत येते आणि एक विरक्ती येऊ लागते. ताकद कमी होते. मिळकत थांबते.
बाहेरच्या सृष्टीतही तरूवेलींची पाने लाल पिवळी होत सुकू लागतात. सुकलेल्या पानांना काही किंमत नसते. ऊनाड वारा त्यांना गरगर फिरवत झाडखाली फेंकत रहातो.
पाने, फळे फुले संपलेले हे शिशिरातले जीर्ण वृक्ष कोणालाच आवडत नाहीत.
पण ते तुटून पडत नाहीत. ते तसेच जिवन आहे म्हणुन जगतात. बर्फ, हिम, वादळ सगळ्याला तोंड देत कसेबसे तग धरतात. मात्र असे तग धरून ऊभे असलेलेच वृक्ष पुन्हा वसंत पाहु शकतात.

घराघरात असे वसंत अनुभवलेले तरूवर आपली कर्तव्ये पार पाडत असे पानगळतीला लागलेत. रंगपंचमी संपून परतीच्या वाटेला लागलेत.
कूठे ते हवेसे असतात तर कोणाला ते नकोसे असतात.
ऊंचीवर पोचलो कि शिडी ढकलून द्यायची हा नियमच आहे का ?
या तरूवरांची पाने पिवळी झालीत…. देठे सुकलीत… त्यांना माया नाही मिळाली तर निराशेचा वारा त्यांना धक्के देईल.
नको असं नको त्यांच्या वाटेला.
असूंदेत पिवळी पाने … कधीतरी आपोआप सुकत गळून पडणारच आहेत.
त्यांच्यापाशी बसा… बोला.. हातात हात घेत मायेचा स्पर्श अमृताचा करा. बोलता बोलता कधी हातातला त्यांचा हात गळून पडेल समजणार नाही
हाताला येईल ते त्यांनी गोळा करून तुमच्यासाठी ठेवलंय. पण…. आज मात्र त्यांना क्षुल्लक खर्चावरून टोकू नका.
त्यांच्या गरजा आता फारच कमी आहेत. करा लागेल तो खर्च न कुरकुरता.
कधी त्यांचे सर्वस्व तुमच्यासाठी सोडून जातील हे समजेस्तोवर खुप ऊशीर होईल.
मोठ्याने बोलतात ते म्हणुन रागवाल पण एक दिवस आवाजच थांबेल मग मात्र …. “बाळा” ऐकण्यासाठी जिवाची कितीही घालमेल झाली तरी टांगलेल्या फोटोतुन शब्द सुद्धा येणार नाही.
वागायचं तसं वागु दे…
खायचं ते खाऊ दे… करायचं ते करू दे. नंतर थाटामाटात श्राद्ध केलंत तरी काहीही खायला ते येणार नाहीत.
आहेत तोच भेटा… कडकडून मिठी मारा.. पुन्हा पुन्हा स्पर्श अनुभवा.. बोला.. हवं ते द्या.
परत थकलेली पिवळी पाने वसंत ऋतू पहाणार नाहीत. त्यांचा शिशीर हा त्यांचा शेवट असतो. काही काळ तुमच्या मायेवर तग धरतील आणि हेच त्यांना या शिशिरातला आधार म्हणुन हवं असत.!
आणखी ते काय मागणार ?
शिशिर संपता संपता ही पिवळी पाने नकळत गळतील व वाऱ्या बरोबर पुन्हा न परतीच्या वाटेवर ऊडून जातील.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
