प्लॅंचेट
मी हवाई दलात प्रवेश केला आणि हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला. प्लॅंचेट हा एक असा विषय आहे की, बऱ्याचदा साधारण तरूण वयात काही-काही सांगितलेल्या गोष्टींवर रंगत जाऊन माणूस प्लॅंचेटकडे आकर्षिला जातो. प्लॅंचेट म्हणजे काय ? तर एका कागदावर साधारण मोठ्या कॅलेंडरचा मागचा मोकळा भाग त्यावर अ आ इ ई अशी, स्वर – कचतटपची व्यंजनमाला लिहून त्याच्या खाली १ ते ९ अंक आणि डाव्या बाजूला होय /उजव्या बाजूला नाही आणि त्या संख्येच्या खाली मधोमध ओम किंवा घर असा अक्षर आणि संख्या असलेला तक्ता तयार करायचा आणि तो सपाट टेबलावर ठेवून त्यावर घरात वापरात येणाऱ्या काही वस्तू उदाहरणार्थ छोटी वाटी किंवा चहा प्यायचा साधा कप उपडा ठेऊन त्यावर कमीत कमी तीन लोकांनी आपले एक बोट त्या कपाला स्पर्श होईल असे टेकवायचे आणि मग आपल्याला इच्छित मृत व्यक्तिशी संपर्क साधण्यासाठी म्हणून त्याला प्रार्थना करायची की ‘हे अमुक-अमुक आपण आमच्या या प्लॅंचेटद्वारे काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो’ असे म्हणून त्या कपाकडे गंभीरपणे पहात रहायचे.
काही काळाने तो कप आपल्याआप हलायला लागतो. ज्या वेळेला बारीक हालचाल करतो तेंव्हा त्या प्लॅंचेटमध्ये भाग घेणाऱ्या तिघांपैकी एक आपण आला असाल तर हो म्हणा असे सुचवतो. त्याप्रमाणे कप हळू हलून ‘हो’ या ठिकाणी जाऊन पुन्हा घरापाशी मधोमध परत येतो. याचा अर्थ असा जो कोणी (आत्मा ?) प्लॅंचेटमध्ये बोलावला गेला आहे त्याला प्लॅंचेट करणाऱ्यांशी संपर्क करण्याची इच्छा असून आता हजर आहे. त्यानंतर प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरे त्या कपाचा कान विविध अक्षरांच्याकडे जाऊन त्या अक्षराला स्पर्श करतो. उदा. शशिकांत असे उत्तर द्यायचे असेल तर तो कपाचा कान घरापासून श पर्यंत जाईल. पुन्हा मध्यस्थान ‘घरापाशी’ आणि पुन्हा श पाशी जाईल. म्हणजे श दुसऱ्यांदा दर्शविले गेले. आता त्यानंतर पुढचं अक्षर ह्रस्व इ पाशी जाईल, पुन्हा क पर्यंत जाईल, त्यानंतर आ पर्यंत जाईल. मग अं असा अनुस्वार दर्शवला जातो. आणि मग त पाशी जाईल. असं होऊन तो कप पुन्हा घरापाशी जाईल. म्हणजे सामान्यपणे एखादा शब्द सांगण्याकरता म्हणून घरापासून सुरूवात करून घरापर्यंत असा एक शब्द होतो. जोडाक्षरे दर्शवण्यासाठी स्वरांची मदत तो घेतो. असे करता शब्द बनतात. शब्दातून वाक्य बनते. या वाक्यातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित असते. हा झाला साधारणपणे प्लॅंचेट करण्याचा एक साधा आणि सोपा प्रकार.
अर्थात कपाऎवजी काही लोक अन्य वस्तू वापरतात. परदेशात असे वीजापाट विविध प्रकारात मिळतात. वीजा बोर्ड (Ouija Board) त्याला इंग्रजीमध्ये वीजाबोर्ड असे म्हटले जाते. पूर्वी पंप देऊन चालवायच्या स्टोव्हचाही वापर केला जात असे. स्टोव्हचा एक पाय आपटून अक्षर दर्शवले जाते असे म्हणतात. मी स्वत ते अनुभवलेले नाही.
प्लॅंचेट या शब्दाचे मूळ पाश्चात्य देश फ्रान्स मधे 1853 च्या सुमाराला आहे असे मानतात. भारतात याची लागण 100-150 वर्षापूर्वी झाली असावी. प्लॅंचेट हा मनोरंजनाचा गौण प्रकार असून त्यातून मिळणारी उत्तरे प्लँचेटमधे सहभागी लोकांच्या मनातील विचाराने प्रेरित होऊन ती बळेबळे कप ढकलून विचारणाऱ्याला अपेक्षित उत्तरे दर्शवली जातात, असा एक आरोप केला जातो. त्या ज्या तीन लोकांमुळे तो कप हलतो त्यांच्यावर तुम्ही खोटारडेपणा करून तो हलवता किंवा संगनमताने तो कप हलवता. असाही आरोप केला जातो. ज्यांच्यावर तो आरोप केला जातो त्यांना आम्ही असे काही करीत नाही हे म्हणण्यापलीकडे दुसरा पुरावा दाखवता येत नसल्यामुळे कप कसा हलतो हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतो. प्लॅंचेटचा कप हलतो कसा ? तो कोण हलवतो ? आणि म्हणूनच प्लॅंचेटचे एका अर्थाने गुढ राहिले आहे आणि काही जणांसाठी तो मनोरंजनाचा भाग झाला आहे. त्यामुळे यावर विशेष अभ्यासपूर्ण विचार केला गेलेला नाही.
प्लॅंचेट गोडी मला स्वतःला अशाच एका मे महिन्याच्या सुट्टीत आलेल्या नातेवाईकांकडून झाली. त्या वेळेला एका व्यक्तिच्या समवेत आणखी दोन व्यक्ती कपाला बोट लावून बसायला लागत. त्यात माझा पुढाकार असे. माझे काम एकतर कपाला बोट लावणे इतकेच होते. म्हणून मी उत्साहाने ते करे. हळूहळू असे लक्षात आले की माझ्यामुळेही तो कप हलतो. त्या कपाला हलण्याची शक्ती देण्यात माझ्याशिवाय आमच्या घरातील धाकट्या बहिणीला प्राप्त होती असे नंतर लक्षात आले. बहिणीच्या स्पर्शाने तो माझ्यापेक्षा जास्त त्वरेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो, असे हळूहळू आढळून आले. माझे प्लॅंचेट संबंधीचे उपक्रम सुरूवातीच्या काळात मजा आली म्हणून केले गेले. नंतर आलेल्या उत्तरांपैकी काही उत्तरे अनपेक्षितरित्या बरोबर आल्याचे लक्षात आल्यामुळे हा काय प्रकार आहे ? यासाठी मी डोके लढवायला लागलो व काही विचार मांडता येतील का म्हणून प्रयत्न केला.
मध्यंतरीच्या काळात मी कॉलेजमध्ये आणि नंतर हवाईदलात गेलो. त्या दरम्यान दर मे महिन्यात प्रत्येकाला किती टक्के मार्क मिळतील? निकाल कसा लागेल ? याची चिंता असल्यामुळे प्लॅंचेट करणे फार तातडीचे व गरजेचे झाले होते. त्याकाळी ‘चला प्लॅंचेट करू या’ अशी मित्रांची मागणी झाल्यावर मी मागे राहत नसे. माझे फक्त एकच मागणे असे जे प्रश्न आपण विचारतो व त्याची उत्तरे मिळतात त्या प्रश्नोत्तराची त्या व्यक्तीने लेखी नोंद करावी म्हणजे भविष्य काळात त्याचा पडताळा घेता येईल. त्याप्रमाणे आमच्यापैकी कोणीतरी वही-पेन घेऊन त्याची नोंद करण्यास सरसावून बसे.
अशा काही नोंदीचे कागद मी जपून ठेवत असे. पैकी एका कागदाची गोष्ट अजूनही आठवते. माझे दोन मित्र इंजिनियरींगच्या शेवटच्या परीक्षेत बसलेले असताना त्यातल्या एकाला 69 परसेंट मार्क मिळतील व डिस्टींक्शन थोडक्यात चुकेल. तर दुसरा विश्वविद्यालयात अव्वल क्रमांकात येईल असे कथन केलेले होते. निकाल लागला तेव्हा एका मित्राला (शिवाजी) विश्वविद्यालयात इलेक्ट्रिकल शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे मार्क व दुसऱ्या मित्राला थोडक्यात डिस्टिक्शन चुकल्याची चुटपुट आयुष्यभर राहिली.
त्या काळात मुलींचे आकर्षण असे. प्रत्येकाला आपल्या बायकोचे नाव काय असेल याचा प्रश्न पडे. त्याप्रमाणे एकदा प्रश्नाचे उत्तर येत असताना अ या अक्षरावर कपाचा कान गेला. आणि माझ्या मित्रांनी आलं आमच्या लक्षात कोण ते, म्हणून ते मला चिडवत .त्या नावाची त्याची खात्री झाली असा आर्विभाव करत तो प्रश्न तिथेच सोडून दिला गेला. पुढे अ नावाच्या व्यक्तीशी माझा विवाह झाला नाही. परंतु काही विलक्षण घटनाक्रमामुळे नंतरच्या पत्नीचे नाव मात्र अ ने चालू होणारं होतं. हे त्यावेळी उपस्थित माझ्या मित्रांना अजूनही आठवतंय. असो.
मी हवाई दलात प्रवेश केला आणि हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला. विशेषतः सिनिअर आफिसर्सच्या बायका, ‘ये ना संध्याकाळी आम्हाला बघायचय काय असतं प्लॅंचेट ते.’ असं म्हणून गळ घालत आणि मी देखील, ‘हो-हो जरूर! का नाही ? पण रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा असू दे’ असं म्हणून त्यांच्यावर थोडीफार हुकूमत गाजवत असे. माझ्या मित्रांना हा प्लॅंचेट करतो आणि सिनिअर ऑफिसरच्या घरी पार्ट्या झोडतो असा हेवा वाटून त्यांनी माझ्याबरोबर यायचे टाळायला सुरूवात केली.
विशेषतः मी श्रीनगरला असताना प्लॅंचेटचे प्रस्थ फार झाले. एकदा तर माझे अकौंट्सचे वरिष्ठ, स्क्वाड्रन लीडर पीव्ही राव, जे कानडी होते, सिगरेट सुलकावत, माझ्याकडे न पाहताच बायकोने सांगितलय म्हणून जरा तुच्छतेने, ‘आमच्या घरी ये बरं’ असं मोघम निमंत्रण देते झाले. ‘का सर ?’ मी मुद्दाम विचारून खोदून पाहिले.
‘अरे ये तर खरं’, असं म्हणून प्लॅंचेट हा शब्द टाळून त्यांनी मला निमत्रंण दिले. रात्री मी त्यांच्या राजबाग या भागात पोहोचलो. त्यांच्या पत्निने आल्याआल्या प्लॅंचेटचे नाव काढल्यावर आमच्या बॉसच्या कपाळाला आठ्या चढल्या. सभ्यतेचा शिष्टाचार म्हणून ‘ओ आय सी !’ असे खोटे खोटे उदगार काढून रोष ओठात दाबला. मी ही जरा आढ्यतेने, ‘सर जरा ते कॅलेंडर काढून द्याना’ असं म्हणून त्यांना कामाला लावले. ‘उद्या ऑफिसात ये तुला दाखवतो’ असे मनात कुढत त्यांनी नाइलाजाने कॅलेंडर काढून पुढ्यात ठेवले. आपला भाव वधारलेला पाहून व ते माझे वरिष्ठपण अकौंट्स ब्रांचचे असल्यामुळे मी चान्स घेत म्हटले, ‘सर मी प्लॅंचेट करीन पण एका अटीवर’, तेंव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही आहात कानडी. मला कानडीचा गंध नाही आणि प्लॅंचेट करताना नेहमीच, हा ओक कपाचा कान पकडून त्याला हवी ती उत्तरे देतो असे माझ्या अपरोक्ष म्हटले जाते. म्हणून आपण एक प्रयोग करू या आणि मग पाहू काय होते ते.’
कानडीतून प्रयोग
‘ओके नो प्रॉब्लेम’ असे म्हणून त्यांनी नवी सिगरेट शिलकावली आणि त्यांनी कॅलेंडरच्या मागील भागावर कानडी अक्षरांचा एक तक्ता तयार केला व प्लॅंचेटला बसलो. कानडीमध्येच त्यांची नवरा-बायकोत थोडीफार बोलाचाली झाली आणि माझ्या वरिष्ठांनी पत्निच्या कानउघाडणी नंतर हातातली सिगारेट तात्पुरती टाकून, हात जोडून देवाला नमस्कार करून कपावर बोट टेकून ठेवले. एकदोन मित्र तोवर जमले. ते सगळे स्थानापन्न झाल्यावर पैकी एकाने कपावर बोट लावायला उत्सुकता दाखवली. शेवटी मी माझे बोट टेकवले आणि बॉसना ‘कोणा मृताला बोलावणार? असा प्रश्न केला. प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे त्यांच्यात पुन्हा कानडीत चर्चा झाली. हळूहळू आवाज वाढला आणि शेवटी मी मध्ये पडून म्हटलं, ‘ठीक आहे असु दे, ते तुम्ही नंतर ठरवा. सध्या मी अशा व्यक्तीला बोलावतो की ज्याला कानडी येत नाही’.
‘ओ येस, दॅटस् ओके’ असं म्हणून माझ्या सरांनी होकार सुचवला. मी मग मराठी व्यक्तिला आवाहन केले आणि त्याप्रमाणे खूपच पटकन कप हालला ‘हो’ म्हणून पुन्हा घरावर स्थिरावला. आता विचारा प्रश्न असं म्हटल्यावर ते एकमेकांच्याकडे पाहायला लागले. त्या बाईंनी म्हटले, ‘अहो, काय प्रश्न विचारायचे असतात, असं असतं का? मला तर माझ्या मैत्रिणीने सांगितले की ओक सगळी उत्तरं सांगतो. आता तुम्हीच प्रश्न विचारा आणि तुम्ही उत्तरं द्या.’ मला हसू यायला लागले. ‘अहो प्रश्न तुम्ही विचारायचा. त्याचे उत्तर प्लॅंचेटच्या तक्त्यावरून मिळते. मी प्रश्नांचे उत्तर देत नाही.’
‘ओ आय सी, साऊंड्स इंटरेस्टिंग’ असं म्हणून हातातला रमचा ग्लास बॉसनी खाली ठेवला. अती थंडीतील त्या दिवसात बुखारी नामक- शेगडीप्रमाणे घराचे तापमान गरम करायला कोळसे घालायच्या निमिताने ते उठून आपला व मित्रांचा रम पेग भरून खातिरदारी केली, माझ्यासमोर कोक पटकावला व मुंगफलीचे तबक सरकवले.
सरांना आधी वाटले तितके प्रकरण फालतू नाही असे त्यांच्या हावभावातून जाणवत होते. कारण उशीरा आलेल्या मित्रांना ते समजाऊन सांगत होते की प्लॅंचेट म्हणजे काय ते. मग पुढचे अर्धा ते पाऊण तास कानडीमधून प्रश्न विचारणे चालू होते. प्रश्न विचारला आणि तो कप हालू लागला. तो कप कुठे हलत होता हे मला तक्त्यावर दिसत होते, परंतु ती अक्षरे माझ्याकरता शून्य होती. कारण त्या अक्षरात कुठलं काय अक्षर आहे हेही माहित नव्हतं आणि त्या अक्षरातून निर्माण होणारा शब्द व वाक्य काय बनते आहे याची मला पुसटशी सुध्दा जाणीव नव्हती आणि मुख्य म्हणजे विचारलेला प्रश्न काय आहे जो कानडीत विचारला गेला त्या प्रश्नाचा काय रोख आहे, उत्तर काय हवय याचा मला पत्ता नव्हता. अधून मधून त्यांच्या बोलण्यात जेव्हा इंग्रजी शब्द येत त्यावरून मला थोडाफार अंदाज लागे. पण प्रश्न नक्की काय होता हे मला आधी समजत नव्हते. असे होता होता त्यांचे प्रश्न आणि उत्तरे संपली आणि तो कप उचलून मी त्यात फूंक मारली आणि धन्यवाद असे म्हणून तो प्लॅंचेटचा डाव संपवला.
त्यानंतर घडलेल्या चर्चेत असे लक्षात आले की त्यांनी कानडीतून प्रश्न विचारून मिळवलेली कानडी भाषेतून मिळालेली उत्तरे समर्पक होती. एकतर ज्या व्यक्तीशी संपर्क केला मृत व्यक्ती कानडी नव्हती त्यामुळे तिला कानडी येण्याचा प्रश्नच नव्हता. मला स्वतःला कानडी येत नाही. हे त्या कुटूंबियांना माहिती होते. त्यामुळे मी प्रश्नांची उत्तरे देतो हा माझ्यावर नेहमी केला जाणारा आरोपही खोटा आहे असे स्वतः रावांनी मान्य केल्याने मला बरे वाटले. व संशोधन तऱ्हेने या विषयाला हाताळल्याचे समाधान मिळाले.
शेवटी डेंटिस्टच झाला !
असेच आणखी एकांच्याकडे मी प्लॅंचेट करीत असताना खूप मजा आली. त्यावेळेला ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली ती मी विसरून गेलो. परंतु काही वर्षानंतर त्या व्यक्तीशी पुन्हा अचानक भेट झाली. त्यावेळी एकदम हस्तांदोलनाला हात पुढे करून त्यांनी म्हटले, ‘ओक, अरे तुला भेटले की मुद्दाम सांगायचे ठरवले होते. आठवतय का ? आपण श्रीनगरमध्ये प्लॅंचेट केलं होतं? त्या प्लॅंचेटवर माझ्या मुलाला कॉलेज शिक्षणासाठी कुठली शाखा मिळेल असे मी विचारले होते ? ते अगदी बरोबर आले बर का.’ मला गोड धक्का बसला. त्यांच्या मुलाला मेडिकलला जायचं होतं पण प्लॅंचेटवरून तो डेंटिस्ट होईल असे उत्तर आल्यामुळे ती व्यक्ती फार खट्टू झाली होती, पण शेवटी तो डेंटिस्टच झाला. हे त्यांच्या बरोबर लक्षात राहिले आणि त्यांनी माझी भेट होताच प्रथम उल्लेख केला त्या प्लॅंचेटचा व त्या उत्तराचा. असो.
प्रचिती द्या तरच मानू
आता आणखी एक किस्सा सांगतो. तो माझ्या बहिणीच्या घरी डोंबिवलीला झाला. त्याचे असे झाले की माझ्या बहिणीचे लग्न होऊन तिने डोंबिवलीत आपला संसार थाटला होता. तिचा पती म्हणजेच माझा शाळेतील मित्र अविनाश. गप्पात त्यांच्या मित्राने प्लॅंचेटमध्ये खूप रस दाखवला. प्लॅंचेट करू या म्हणून प्लॅंचेटचा पट मांडला गेला. त्यावेळी बहीण पु. गोंदवलेकर महाराजांना आवाहन करून बोलवत असे. तेही पटकन अवतीर्ण होत असत. त्याप्रमाणे आम्ही प्लॅंचेट करायला बसलो. बहीण म्हणाली की पु. गोंदवलेकर महाराज येतात आणि काही प्रचिती देऊन जातात, असे यापूर्वी आमच्या प्लॅंचेट मधून जाणवले आहे. ते ऐकून मी त्यावेळी गोंदवलेकर महाराजांना बोलावल्यानंतर तुम्ही आल्याची प्रचिती द्या असं म्हटलं. ही प्रचिती कशी आली हा किस्सा फार मजेशीर आहे. मी हा प्रश्न गोंदवलेकर महाराजांना उद्देशून म्हटला. कप हलला आणि ‘माझ्या तसबिरी समोर बसा मग पहा काय होते ते’ असे म्हटले गेले व कप पुन्हा घरापाशी आला. बहिणीच्या घरातील पु. गोंदवलेकर महाराजांच्या फोटोसमोर आम्ही तिघे मांडी ठोकून बसलो. बहीण, तिच्या शेजारी अविनाश, मी जरा मागे.
‘डोळे मिटून स्तब्ध होऊन मनात प्रचिती द्या, असे म्हणा’ अविनाश म्हणाला. तसे आम्ही काही काळ ध्यानाच्या मुद्रेत होतो. तेवढ्यात गोंदवलेकर महाराजांच्या तसबिरीसमोर आमचे डोके हळूहळू त्या तसबिरीसमोर टेकेल इतपत जमिनीवर खाली वाकून टेकले गेले. मांडी घालून बसलेल्या पध्दतीत तसे करणे सहज शक्य नव्हते. तरीही तसे झाले आणि काही वेळानंतर पुन्हा ताठ बसत आम्ही एकमेकांकडे पहात म्हटले, ‘मला आत्ता सुगंध आला .तुला आला? हो. नक्की आला म्हणून खात्री केली आणि तिथून उठून पुन्हा प्लॅंचेट करायला चालू केले. त्यातला पहिला संवाद, ‘काय प्रचिती आली का सुगंधाची?’ असा गोंदवलेकर महाराजांचा होता !
प्लॅंचेटमधून प्रश्न विचारून नुसतेच मनरंजन होते असे मानण्या इतके ते साधे व सरळ नाही. उत्तरे देणाऱ्याच्या मृताच्या अकलेची चेष्टा करून त्याची टर उडवल्याने उत्तरे गांभिर्यपुर्वक दिली जात नाहीत असे ही जाणवते. त्यातील उत्तरे भविष्यकथने नाहीत हे समजून घ्यावे. या विश्वात आणखीही काही आयाम आहेत याची जाणीव झाली तरी खूप आहे.
प्लॅंचेटबद्दल विविध लोकांनी बोलावून सतावल्याने मी पुढच्या काळात ते करणे बंद केले. गेल्या कित्येक वर्षात प्लॅंचेटच्या कपाला बोट लावून बसल्याचे आठवत नाही. एका अर्थाने प्लॅंचेट करायचे संपले. परंतु प्लॅंचेटचे आणखी एक प्रगतरुप म्हणजे ‘आटो राईटिंग’ माझ्या जीवनात 1998 साली आले आणि नंतर ते येतच राहिले. ते कसे ? ते माझ्या आटो राईटिंगवरील लेखात वाचा, धन्यवाद.
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
प्लँचेट करणारे कोण वाचक असतील तर त्यांचे रंजक अनुभव वाचायला आवडेल.