भूतान मध्ये प्रकाशित झालेल्या; श्री देवेंद्र भुजबळ यांनी लेखन- संपादन केलेल्या “झेप” पुस्तकाबद्दल छान छान प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. आज वाचू या निवृत्त माहिती संचालक श्री शरद चौधरी, नागपूर यांची प्रतिक्रिया…
चौधरी सरांचे मनःपूर्वक आभार.
— संपादक
शरद चौधरी, सेवानिवृत्त माहिती संचालक (महाराष्ट्र शासन). नागपूर
प्रिय श्री. देवेन्द्र जी,
अभिनंदन.
मान्यवरांच्या कर्तृत्ववान व दिमाखदार कार्यशैलीला साजेसे असे ‘झेप’ हे सर्वंकष दर्जेदार प्रकाशन पाहून लेखक-संपादक म्हणून आपण व प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये एक नवीन नाव यशस्वीपणे निर्माण करणाऱ्या सौ. अलकाताईंचे अभिनंदन.

देवेन्द्रजी, आपले पहिले पुस्तक ऑस्ट्रेलियात, दुसरे मलेशियात, तिसरे जपान मध्ये तर चौथे पुस्तक, भुतान मध्ये प्रकाशित करून आपण एक विक्रम नोंदविला आहे, तर दुसरीकडे भारताबाहेरील मराठी रसिक वाचकांची वाचनाची भूक ही भागविली आहे.

आकाशात झेपावणाऱ्या ३६ मान्यवरांची ‘झेप’ इतरांनाही प्रेरक ठरावी, त्याचे सार्वजनिक कौतुक व्हावे, या उद्देशाने प्रकाशित ‘झेप’ पुस्तकाचे शिर्षक देखील चपखल व चित्ताकर्षक आहे.

यात प्रकाशित ३६ यशोगाथांमध्ये प्रामुख्याने डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, तुकाराम मुंढे, सुधाकर तोरणे, विकास खारगे, राधिका भंडारकर आदी दिग्गज मान्यवरांच्या निश्चयाचे धैर्य निश्चितच नवीन तरुणाई व विशेषतः जेन-झी’ ना नवी दिशा देतील, यात शंका नाही. दूरदर्शन आणि माहिती व जनसंपर्क मधील आपला दांडगा जनसंपर्क व प्रशासकीय अनुभवामुळे आपण आपल्या संपर्कात आलेल्या तब्बल १५ मान्यवरांना यशोगाथेतून योग्य न्याय दिला आहे. त्या खालोखाल माझे मित्र प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी ६ यशोगाथा आकारल्या आहेत.

दर्जेदार ‘झेप’ निर्मितीसाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे देखील अभिनंदन.
शेवटी, ग्रामीण, आदिवासी भागातील कृषी, आरोग्य, जल व्यवस्थापन, पर्यावरण आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या यशोगाथांचे (कायमसाठी) ‘झेप – २’ हा नवीन प्रकल्प आपण हाती घ्यावा, या शुभेच्छे सह !
स्नेहांकित,

— लेखन : शरद चौधरी. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
