भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान भारतरत्न स्व इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. या निमित्त हा विशेष लेख. स्व.इंदिराजीना विनम्र अभिवादन.
– संपादक
इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी उत्तर प्रदेशातील इलाहाबाद (प्रयागराज) येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परिवारात झाला,अन् जणू मातृभूमीला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी एक जाबांज रणरागिणी उदयास आली.
खरं तर,नेहरू घराण्याला देशभक्तीचा एक समृद्ध वारसा लाभला होता. लहानपणापासूनच इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य संग्राम अगदी जवळून पाहिल्याने देशभक्तीची भावना त्यांच्या रोमारोमात भिनली होती. इंदिराजींचे आजोबा मोतीलाल नेहरू,पिताश्री पंडित नेहरू,आई कमला नेहरू आणि इंदिराजींचे पती फिरोज गांधी या सर्वांचं स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान होतं. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९४२ च्या चले जाव चळवळीत इंदिरा गांधींनी स्वतःला झोकून दिलं होतं.जाज्वल्य देशप्रेमाचं हे त्यांचं ज्वलंत उदाहरण होय.
महान नेत्या इंदिराजी गांधी ह्या स्वकर्तृत्वाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.”जगातील महाशक्तींवर विसंबून न रहाता,आपण प्रत्येक क्षेत्रात स्वयंसिद्ध असायला पाहिजे”,ही इंदिराजींची ठाम भूमिका होती.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान असताना त्यांनी १८ मे १९७४ रोजी राजस्थानच्या पोखरण येथे अणुशक्ती मंडळामार्फत अणूस्फोटाची भूमिगत चाचणी यशस्वी करून दाखविली.”आण्विक शक्तीचा उपयोग रचनात्मक कार्यांसाठी केला जाईल”, हा संदेश त्यांनी भारतासह जगाला दिला.आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करून भारत हा कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नाही,हे त्यांनी जगाला दाखवून देत,आपल्या देशाला जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून देणारं असं हे कणखर अन् महान नेतृत्व भारताला लाभलं,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
वंदनीय इंदिराजी गांधी ह्या पहिल्या महिला पंतप्रधान,ज्यांनी १५ वर्षे १० महिने भारताचे पंतप्रधान पद भूषविले.त्यांच्या कार्यकाळात भारत-पाक युद्ध(१९७१) ; बांगला देशाची निर्मिती ; बँकांचे राष्ट्रीयकरण : पोखरण अणुचाचणी : देशात आणीबाणीची घोषणा (१९७५-१९७७) ; त्यातून १९७७ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पराभव ; त्यानंतर १९८० मध्ये पुनश्च सत्ताप्राप्ती ; जून १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टार लष्करी कारवाई आणि ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची नवी दिल्ली येथे अंगरक्षकांकडून झालेली हत्या ह्या प्रमुख घटना त्यांच्या कारकिर्दीत घडल्या.३१ ऑक्टोबर हा त्यांचा पुण्यतिथी दिवस देशात राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळला जातो.

इंदिराजी ह्या अलिप्तवादी व विकसनशील देशांच्या खऱ्या पुरस्कर्त्या होत्या.हे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनीही मान्य केलं होतं. परराष्ट्र धोरणाविषयक बाबी त्या अत्यंत कौशल्याने व मुसद्देगिरीने हाताळत असत.त्यातूनच त्यांनी जगातील बड्या नेत्यांचा विश्वास संपादन केला होता.बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची आग्रही भूमिका होती.इंदिराजी पंतप्रधानपदी असताना पश्चिम पाकिस्तानच्या लष्करी अत्याचाराला कंटाळून देश सोडून आलेल्या सुमारे एक कोटी निर्वासित बांगलादेशींना भारतात आश्रय दिला. अशा बिकटप्रसंगी इंदिराजींनी अतिहृदयशील भावनेने निर्वासितांना आश्रय देऊन मानवतावादी भूमिका बजावली.पाकिस्तानी लष्करशाही राजवटीचे खरेखुरे चित्र जगापुढे ठेवून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडले.हे त्यांच्या राजकीय मुसद्देगिरीचे ठळक उदाहरण होय.अशा धाडसी निर्णयांमुळे त्यांची जगात पोलादी महिला (आयर्न लेडी) म्हणून ख्याती होती.इंदिरा गांधींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बांगलादेशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मुजिबूर रहेमान म्हणाले की,”इंदिराजी केवळ भारतीय जनतेच्या नव्हे,तर अखिल मानवजातीच्या नेत्या होत”.
भारत-रशिया यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.१९६४ मध्ये लंडन येथे झालेल्या राष्ट्रकुल परिषदेत भारत-आफ्रो-आशियाई देशांमध्ये मैत्री व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात इंदिराजींनी मोलाची भूमिका बजावली होती.या सर्व गोष्टींमुळे १९८३ मध्ये त्यांची जगातील तटस्थ राष्ट्रांच्या गटाच्या अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड होणं,ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भरीव कामगिरीची खरी पावती होती.
ओरिसा दौऱ्यात भुवनेश्वर येथील जाहीर सभेत बोलताना,”माझ्या रक्तातील प्रत्येक थेंब अन् थेंब”….. असे भविष्यसूचक उदगार इंदिराजींनी काढले होते.त्या भाषणाची दृश्ये दूरदर्शनवर लाखो लोकांनी पाहिले होते व त्यांच्या उदगाराचा ठसा प्रत्येक भारतीयाच्या मनावर उमटला होता. त्याच दिवशी ३० ऑक्टोबर रोजी त्या रात्री दिल्लीला परतल्या.३१ ऑक्टोबरला सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या निवासस्थानातून कार्यालयाकडे निघाल्या असता,त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी त्यांची धोक्याचे गोळ्या झाडून हत्या केली. बंधू-भगिनींनो,इंदिराजींनी आपल्या स्वतःच्या सुरक्षेची कधीच पर्वा केली नाही,परंतु देशाच्या सुरक्षिततेची त्यांना सदैव काळजी असे.देशाचं स्थैर्य व ऐक्य यांचं प्रतिक असलेलं असं भव्यदिव्य व्यक्तिमत्व एकाएक पडद्याआड गेलं.परिणामी भारतासह सारं विश्व एका महान नेत्याला पोरकं झालं.वैश्विक नेत्या वंदनीय इंदिराजी गांधी यांना सकल भारतीयांचे विनम्र अभिवादन अन् त्रिवार मानाचा मुजरा !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

— लेखन : रणवीरसिंह राजपूत. निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800
