Homeकला"कलाकारांचे मानधन" झाकली मूठ कितीची ?

“कलाकारांचे मानधन” झाकली मूठ कितीची ?

सध्या कलाकारांच्या मानधनावरून उलट सुलट चर्चा , वाद सुरू आहेत. आजकाल सोशल मीडियामुळे सर्वांनाच व्यक्त व्हायला मोकळे रान मिळाले आहे.प्रत्येकाला त्याच्या कामाचे, परिश्रमाचे यथायोग्य मानधन/ मोबदला मिळालेच पाहिजे यात दुमत नाही. कुठल्याही प्रकारची खाजगी किंवा सरकारी मासिक नोकरी यात महिन्याला ठराविक पगार मिळतो. तो किती मिळेल , त्याची विभागणी कशी असेल( बेसिक पगार , डी ए, वार्षिक वाढ) हे लेखी स्वरूपात ठरले असते. पण कलेच्या क्षेत्रात मात्र नेमके काय चालते, लेखी करार होतात की सगळे तोंडी विश्वासाच्या भरवशावर चालते , कुणाला किती मिळतात, हे कोण ठरवते .. इत्यादी गुपितच असते.

म्हणजे नाटकाच्या, सिनेमाच्या कोणत्या कलाकाराला किती पैसे मिळतात हे बाहेर कुणालाच कळत नाही. हिंदी सिनेमाच्या बाबतीत तर लाखो करोडोच्या गप्पा चालतात. अमुक सिनेमा शंभर / दोनशे करोडचा, शाहरुख सलमान इतके करोड घेतात, नट्याना नायकाच्या तुलनेत बरेच कमी पैसे मिळतात अशा चर्चा (गॉसिप) ऐकू येतात. इथे संगीतकार, गायक गायिका ,कवी ,वादक, दिग्दर्शक, लेखक यांचे वेगवेगळे मानधन असणार. ते नेमके किती हे कधीच बाहेर येत नाही.

नाटकाच्या बाबतीत देशी परदेशी दौरे असतात सारखे. तिथे प्रत्येक प्रयोगाची नाईट असते! ( सकाळ दुपारच्या प्रयोगाला पाकीट म्हणत असावेत ! पण त्यात कुणाच्या पाकिटात किती ते सीक्रेट. लेखक दिग्दर्शक संगीतकार यांना ठराविक रक्कम देऊन मोकळे करत असावेत.

आता सीरिअल्स, ओ टी पी चा जमाना आहे. त्यांचे वेगळे दर असावेत. हॉट सीन्स चे वेगळे रेट असतील कदाचित!शास्त्रीय संगीताच्या मैफली होतात. दिवाळी पहाट, अभंगवाणी वगैरे. पूर्वी आर्केस्ट्रा नावाचा म्युझिकल शो असायचा. आता तर कवितांचे देखील कार्यक्रम सुरू झाले आहेत. प्रत्येकाचे आर्थिक गणित वेगळे असणार. प्रत्येक कलाकाराच्या पाकिटातील रक्कम वेगवेगळी असणार. हे कोण कसल्या आधारे ठरवतं? हे सामान्य रसिकाला , जो तिकीट काढून हे सगळे कार्यक्रम बघतो त्याला, कधीच कळत नाही.

हे कलाकारापुरते च मर्यादित नाही. आपण खाजगी डॉक्टर कडे जातो. प्रत्येक डॉक्टरची फी सारखी नसते. प्रत्येक ठिकाणच्या तपासण्याचे दर वेगवेगळे असतात. ते तसे का हे आपण विचारत नाही. त्याची आपल्याला गरज वाटत नाही. अनेक डॉक्टर तर फी घेतल्याची पावती देखील देत नाहीत. फक्त नोटा ड्रॉवर मध्ये( किंवा खिशात) टाकतात. त्यांचे उत्पन्न काय ते कुठल्या आधारे टॅक्स भरतात हे कुणालाच कळत नाही. कुणी ते विचारत नाही. मासिक पगार घेणारे शिक्षक, प्राध्यापक, बॅन्क कर्मचारी , कामगार, अधिकारी या सर्वांच्या उत्पन्नाची लिखित नोंद असते . त्यांना वर्षाअखेर फॉर्म मध्ये दाखला मिळतो उत्पन्नाचा. या नाट्य सिने कलावंताच्या बाबतीत काय घडते नेमके? ही मंडळी टॅक्स कुठल्या आधारावर भरतात? लेखी काही करार असते तर हे वाद घडले नसते फसवा फसवीचे. याने पैसे बुडवले , त्याने तर काहीच दिले नाही अशा तक्रारी एकीकडे अन् सलमान, शाहरुख, ऐश्वर्या यांच्या मानधनाचे करोडोचे आकडे दुसरीकडे असा विचित्र आर्थिक गोंधळ सुरू आहे. सरकारचे यावर काहीच नियंत्रण नाही असे दिसते. सगळ्यांना मोकाट रान दिल्यासारखे गुप्त आर्थिक व्यवहार सुरू आहेत.

हे सगळे प्रकार नाट्य, टीवी, सिने क्षेत्रा पुरतेच मर्यादित नाहीत. पुस्तक प्रकाशन क्षेत्रातही हा आत बट्याचा व्यवहार अनेक वर्षा पासून सुरू आहे. संपादक, प्रकाशक ,लेखकाला क्षुल्लक लेखित त्याची फसवणूक करतात. मानधन देत नाहीत. उलट आपण लेखकाचे साहित्य प्रकाशित करून त्याच्यावर एक प्रकारे उपकारच करतो असा त्यांचा आविर्भाव असतो. लेखकाची देखील गोची होते. त्याला प्रकाशात येण्यासाठी प्रकाशक, संपादकाची गरज असते. त्याचा गैर फायदा घेतला जातो. सुदैवाने बहुतेक लेखक पोटासाठी लेखनावर अवलंबून नसतात. आता तर या प्रकाशन क्षेत्रातील गैर व्यवहारावर चक्क स्वतंत्र पुस्तकच येते आहे !!
मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची हा प्रश्न येतो. अधून मधून नाट्य, सीरियल ,सिने क्षेत्रातील फसवणुकीचे किस्से बाहेर येतात, आता दोन तरुण कलाकारांनी आवाज उठवला तसे. इथे कोण चूक कोण बरोबर हा वादाचा मुद्दा नाहीच. सगळे आर्थिक व्यवहार खुले पारदर्शक असावेत हा महत्वाचा मुद्दा आहे. आताही पाकीट मानधन असेच शब्द वापरले गेले. किती ठरले, काय ठरले, किती मिळाले हे टॉप सिक्रेट! कशासाठी हा लपंडाव? नाट्य सिने कलाकारांचे खरे मानधन, खरे व्यवहार सामान्य माणसाला कळायला काय हरकत आहे. सरकारी, खाजगी कर्मचारी अधिकारी, लोक प्रतिनिधी, मंत्री या सर्वांचे पगार भत्ते हे सगळ्यांना माहिती असते. मग या सिने नाट्य क्षेत्रातील कलावंतांनी देखील सर्व व्यवहार उघडे ( लेखी) करायला काय हरकत आहे? यामुळे कोणत्या कलाकारामुळे इन्कम टॅक्स विभागाचे किती नुकसान होते दरवर्षी हे कळेल तरी सामान्य नागरिकांना !

कारण हे आर्थिक गणित माहिती नसल्यामुळे जे नाटक मुंबई पुण्याचे रसिक चार पाचशे मध्ये बघतात, त्याच नाटकासाठी आम्हा हैदराबाद च्या रसिक वेड्या ना हजार बाराशे रुपये मोजावे लागतात! युरोप अमेरिकेतील मराठी नाट्य वेड्या ना किती युरो, डॉलर्स मोजावे लागत असतील देव जाणे! यामागे कलाकाराच्या विमानाचा खर्च , इतर वाढता खर्च ही ( संयुक्तिक ) कारणे सांगितली जातात. आम्हीही नाटकाची भूक भागवायची म्हणून ही चुपचाप सहन करतो. पण महाराष्ट्रा बाहेर राहण्याची ही अरसिक शिक्षा कितपत न्याय्य आहे ? याचाही विचार व्हायला हवा.

मुळात हा वाद चव्हाट्यावर आणून मानधन मागणारे तरुण कलाकार, तसेच ज्येष्ठ कलावंत निर्माते या दोघांनीही अरसिकतेचे घाणेरडे प्रदर्शन केले आहे. एकत्र बसून गुण्या गोविंदाने हे प्रकरण दोन्ही पक्षी समंजस वृत्तीने सहज मिटवता आले असते. पण आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होण्याची, व्यक्ती स्वातंत्र्याचे जाहीर प्रदर्शन करण्याची खोड लागलीय प्रत्येकाला. त्याशिवाय अन्न पचत नाही आजकाल कुणालाच !
आता उघड्यावर आलाच आहात तर सांगून टाका सगळे. रसिक मायबापाना कळू द्या कुणाला किती कसे मिळतात ते. झाकल्या मुठीत काय ते उघड झाले की दोन्ही पक्षी सगळे प्रश्न उघड्यावर सुटतील. प्रश्न अंधारातील कुजबुजीने निर्माण होतात. बंद दरवाजा आड झालेल्या चर्चेने निर्माण होतात. उघडा दरवाजे. जरा मोकळी हवा येऊ द्या !

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : विजय पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती’: सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण