सध्याची अवतीभवतिची परिस्थिती बघता शीर्षकातला विचार मनात येणे स्वाभाविक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली आहेत. त्यावेळी हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या विचारांच्या हजारो देशभक्तांच्या मनात या देशाच्या भविष्याविषयी जी काही स्वप्ने, संकल्पना असतील, त्या उद्दिष्टांच्या किती जवळ, किती दूर आहोत आपण ? या लांबलचक प्रश्नाच्या उत्तराचा शोध खरच त्रासदायक आहे. माणसाला निराशेच्या गर्तेत नेणारा आहे.
केवळ भौगोलिक विस्तार, तांत्रिक प्रगती, लोकसंख्येची अनियंत्रित वाढ, वाहतुकीचे रुंद रस्ते, प्रचंड फ्लायओव्हर, रेल्वे विमानाचे विस्तारित जाळे, वाढलेल्या शिक्षण संस्था, शहरातील गगनचुंबी इमारती, गावोगावी पसरलेले इंटरनेट चे जाळे, डिजिटल क्रांती … याला प्रगती म्हणायचे का ? कारण या सोबतच दारी आलेले तिसरे महायुद्ध, त्यात होणारा प्रचंड रक्तपात, हिंसाचार, देशात वाढलेले धर्मातील वैमनस्य, माणुसकीला काळीमा फासणारे बलात्कार, अत्याचार, havs and have not ही सातत्याने वाढत चाललेली प्रचंड आर्थिक दरी, धोक्यात येऊ पाहणारी लोकशाही, स्वातंत्र्यावर गदा आली म्हणत वाढत चाललेला असंतोष, रस्त्यावर उतरलेले,आतून खवळलेले जेन झी.. हे परस्पराविरोधी आहे अगदी. म्हणजे प्रगती खरी की दुसऱ्या बाजूने दिसणारी अधोगती खरी हा मूळ गहन प्रश्न आहे.
यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल – आपण सारेच गुन्हेगार !
म्हणजे स्वातंत्र्य मिळवलेही आपण अन् त्या स्वातंत्र्यावर घाव करायला उठलो तेही आपणच. भ्रष्टाचाराला नावे ठेवतो आपण, त्याने चिडतो आपण . अन् भ्रष्टाचार करतोही आपणच ! सरकारला दोष देतो, त्याविरुद्ध उठाव करतो आपण अन् ते सरकार लोकशाही मार्गाने निवडून देतो आपणच. शाळा कॉलेज नीट नाहीत, व्यवस्था ठीक नाही म्हणायचे अन् दुसरीकडे अभ्यास न करता गैर हजर रहायचे. परीक्षेत गैर प्रकार करायचे. एकीकडे पेपरफुटी विरोधात आंदोलन करायचे अन् दुसरीकडे आपल्या पैकीच काहींनी मुलामुलींसाठी लाखोच्या लाच देऊन पेपर विकत घ्यायचे! यात कुणाला कुठे दिसते नैतिकता ? कुठे दिसतात संस्कार ?

तरुण पिढी व्यसनी होत चालली आहे म्हणणारे आईबाप स्वतःच मुलांसमोर दारू पितात. मुलांनी नीट वागावे अशी अपेक्षा करणारे पालक त्यांच्यासमोरच कचाकचा भांडतात ! स्वतः खोटे बोलतात अन् मुलांनी खरे बोलावे, काही लपवू नये ही अपेक्षा करतात. हा विरोधाभास रंजक आहे.
मुलींची चित्र विचित्र फॅशन ही पालकांची खरेदी असते. आपल्याला मिळाले नाही ते मुलांना मिळाले पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे अशा समजुतीचे पालक हातात पैसा खेळतो म्हणून वाट्टेल तसे लाड करतात मुलांचे. साहजिकच मुले वाहवत जातात. दोष कुणाला द्यायचा ?
लग्न संस्था आता टिकेल की नाही अशी भीती निर्माण झालीय समाजात. घटस्फोटाचे प्रमाण वाढतेच आहे भूमिती श्रेणीने. त्याला मानसिक, शारीरिक छळ हाही एक अँगल आहेच. इथेही पालक प्रश्न सामोपचाराने सोडविण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचेच काम करतात. कुणीच कुणाला सामोपचाराचे धडे देत नाही. एक पाऊल मागे घेण्याचा सल्ला देत नाही. उलट “तू नही और सही” अशी शिकवण दिली जाते. लग्नाची गरजच काय असाही आधुनिक विचारसरणीचा प्रश्न विचारला जातो. ते दोघे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतात, चांगले चालले आहे असे अभिमानाने, नि:संकोचपणे सांगितले जाते. समोरून हो का म्हणत स्वीकारले देखील जाते ! इथे देखील कुणाचे कुणाचे काय चुकले हे विचारायचे नसते. आपण सगळेच सारखेच गुन्हेगार.
शिक्षक, प्राध्यापक म्हणतात मुले वर्गात येत नाहीत. अभ्यास करीत नाहीत. त्यांना कशातच इंटरेस्ट राहिला नाही. पण इंटरेस्ट निर्माण करायचा कुणी ? प्राध्यापकांना च शिकवणे म्हणजे ओझे (teaching load) वाटते. तेच बेशिस्तिने वागताना दिसतात. मग त्यांच्याकडून शिस्तीची अपेक्षा कशी करायची ? विद्यार्थ्यांवर संस्कार वगैरे फार दूरचा प्रश्न.

ज्यांना आपण विश्वासाने निवडून देतो तेच भ्रष्टाचारी निघतात. कायदे करणारेच कायदे मोडतात. जेल मध्ये गेलेला, जाऊन आलेला गृह खाते सांभाळतो, दहावी पास शिक्षण मंत्री होतो, स्वच्छतेशी देणेघेणे नसलेला आरोग्य मंत्री होतो, कायदे मोडणारा न्याय खाते सांभाळतो, स्वतःच्याच तिजोऱ्या भरणारा शिक्षण मंत्री ! वर कुणाला काही बोलायची, प्रश्न विचारायची देखील सोय नाही. सगळे बहुमताने आपणच निवडून दिलेले !! म्हणजे आपलेच दात अन् आपलेच ओठ. कुणाला नावे ठेवणार ? सगळेच गुन्हेगार वर पासून खालपर्यंत!
ही समस्या कुण्या एका समाजाची, राज्याची किंवा देशाची राहिली नाही आता. ती जागतिक समस्या झाली आहे. त्यात आता तो ए आय नावाचा प्राणी येऊ घातलाय, नव्हे ऑलरेडी आलाय आपल्या डोक्यावर बसायला, डोक्याला ताप द्यायला. तोही आकाशातून पडला नाहीय धरतीवर. ती देखील आपलीच निर्मिती आहे. डायनामाईट चा शोध लावून संहाराच्या भीतीने पश्र्चाताप झालेल्या आल्फ्रेड नोबेल ने नोबेल पुरस्कार सुरू केले करोडो किंमतीचे. पण “अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत” अशी हिंदीत म्हण आहे. शहाणपणाचे निर्णय वेळच्यावेळी घ्यायचे असतात. ते शहाण्या माणसाला कधीच सुचले, जमले नाही. आग लागल्यावर विहीर खोदायची हीच आपली परंपरा!
ही आपल्या समाजातील गुन्हेगारी काही आजची नाही, नवीन नाही. अगदी रामायण महाभारतापासून हेच चालू आहे. सीतेवर, आपल्या लहान मुलांवर श्रीरामाने अन्याय केला (धोबी प्रकरण), अशी अनेकांची धारणा आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण लहानपणी लोणी चोरून खायचा, स्नानाला गेलेल्या गोपिकांचे कपडे पळवायचा ! महाभारत युद्धात नेमका दोष कुणाचा ? निवडक कौरवांचा! पण मृत्युमुखी पडलेले सगळेच दोषी नव्हते. म्हणजे निरपराध हत्याच म्हणायची की ! या तर्कात दोष काढायचा म्हटले तर काढता येईल. कारण निखळ सत्य, शंभर टक्के न्याय असे काहीच नसते. ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे, परिस्थिती प्रमाणे हवे ते अर्थ लावता येतात, गुन्हे लपवता येतात, नाकारता येतात.
एकलव्याचा अंगठा मागणारे गुरु द्रोणाचार्य गुन्हेगार होते की नव्हते ? अशा उदाहरणांची कमी नाही. आपण सगळेच स्खलनशील आहोत. ब्लॅक अँड व्हाईट असे काही नसते. आयुष्य ग्रे शेड्स ने व्यापले असते. प्रत्येक चांगल्या माणसात काही ना काही वाईट गुण असणारच. वाईट माणसात देखील काहीतरी चांगले असतेच. प्रश्न आपल्या दृष्टिकोनाचा, विचारसरणी चा आहे.
तेव्हा कुणीच वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. दुसऱ्याला नावे ठेवण्याचीही गरज नाही. कारण आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत, आपण सारेच गुन्हेगार आहोत.
आता आपल्याला शिक्षा कुणी करायची हा खरा प्रश्न आहे !!

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
