सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचे काल; 31 मे 2026 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांना सुमनांजली वाहणारा हा लेख. सुमन कल्याणपूर यांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
माझी आणि सुमनताईंची पहिली ओळख झाली ती माझ्या गाण्याच्या बाईनीं मला “नाविकारे वारा वाहे रे” हे गाणे शिकवले तेंव्हा. तेंव्हा फक्त हे गाणे सुमन कल्याणपूर यांनी गायले आहे इतकेच ठाऊक होते. जसजशी मोठी होत गेले तशा सुमनताई अनेक गाण्यातून भेटत गेल्या. एक अविस्मरणीय गोडवा , कमालीचा मधाळपणा त्यांच्या स्वरांमध्ये होता. आज त्या आपल्यात नाहीत, असे म्हणताना अतीव दुःख होते. मराठी भावगीत ज्यांच्या अभिजात सुरांनी, लडिवाळ आवाजाने समृद्ध झाले त्या सुमनताई काळाच्या पडद्याआड गेल्या ही अगदी न भरून येणारी पोकळी आहे.
आपण एक श्रोते म्हणून खरोखरच भाग्यवान आहोत की आपल्याला लता, आशा, सुमनताई, रफी, मन्ना डे, किशोर, हेमंतकुमार, मुकेश, तलत अशा सर्व दिग्गजांना ऐकण्याची, भावसंगीत व सिनेसंगीता मधील सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी मिळाली. आज या पैकी कोणीच हयात नसलं तरी त्यांचं स्वरमयी अस्तित्व इथेच आहे हे आजही जाणवते .
पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी सुमन कल्याणपूर झाल्या आणि त्यांनी या नावाने आपला खास ठसा मराठी भावसंगीतावर, हिंदी गीतांवर उमटवला. लताबाईंशी त्यांच्या आवाजाचं असणारं साधर्म्य हे कदाचित त्यांना पुरेशी संधी न मिळणार ठरलं पण सुमनताईनी याबद्दल कधी अवाक्षरही काढलं नाही. उलट त्या शांतपणे आपलं काम करतच राहिल्या. आपल्या स्वरांशी , गाण्याशी, प्रामाणिक राहून संगीताची सेवा करतच राहिल्या.
सुमनताई हे नाव आठवताच किती गाणी आठवतात ? त्यांच्या अत्यंत सुमधुर स्वरात भिजलेलं ‘जिथे सागरा धरणी मिळते‘, जुळल्या सुरेल तारा, ‘एकतारी सूर जाणे’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ म्हणत वाऱ्याला माहेरी पाठवणाऱ्या सुमनताई किती म्हणून गाणी आठवावी. एकेक गाण्यावर एक एक लेख होईल. स्वरांमधलं आर्जव, अत्यंत पक्के सूर, ते गाणं कोणत्या धाटणीचं आहे त्यानुसार केलेले शब्दोच्चार. किती म्हणून सांगावं ?

लिंबलोण उतरू कशी म्हणतानाची एका आईची व्यथा लांबूनच दृष्ट काढण्याची तिची असोशी सारं अगदी लख्ख दिसतं. चल उठ रे मुकुंदा हे गाणं तर खास सुमताईंनीच गावं. कृष्णाला उठवायला आलेल्या यशोदेचा सूर त्यांनी असा काही लावलाय कि आपण थेट गोकुळातच पोहोचतो. ‘नंदा घरी नंदनवन फुलले’ म्हणतानाही तेच.इतकं स्वरमाधुर्य येत तरी कुठून असंच वाटतं.
अशोक पत्कींच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी गायलेलं ‘केतकीच्या बनी तिथे’ तर निव्वळ अप्रतिम ! काय ते मेघाचं गहिवरण त्यांनी उभं केलंय ? लीलया वरच्या पट्टीत जाणारा सूर कुठेही विचलित न होणारा , शास्त्रीय संगीताची पक्की बैठक असणारा, ओघवता, आपल्या मनावर स्वर मोहिनी घालणारा ! अतिशय प्रभावी, मोहक, कितीतरी काळ स्मरणात राहणारा असा सूर आज लोपला याचा फार वाईट वाटतं.
अंगाई आठवताना तर आजवरच्या सर्व आयांनी आजतागायत आपल्या लेकरांसाठी ऐकवलेलं ‘निंबोणीच्या झाडामागे’ हे आणि हेच आठवतं. किती सुरेख अंगाई सुमनताई गाऊन गेल्यात ? ‘उठा उठा चिऊताई’ असच ! घरट्यातल्या पिलांना हलकेच उठवणारा आवाज अतिशय मृदू, कमालीचा मुलायम असाच. ‘पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा’ म्हणताना सुमनताईंनी ते गाणं किती अलवार म्हटलंय !त्यांच प्रत्येकाचं गाणं एक वेगळा वस्तुपाठच आहे. अशा दिग्गज कलाकार पुन्हा होणे नाही. ‘देवा दया तुझीही’ हे एकदा डोळे मिटून ऐकून पहा, डोळ्यांच्या कडा आपसूकच ओल्या होतात इतकी ताकद सुमताईंच्या गाण्यात आहे.
हिंदी सिनेमातील त्यांचा ठसा तर केवळ अविस्मरणिय ! मग ते गरजत बरसात सावन आयो रे असो वा पर्बतों के पेडो पर , न तुम हमे जानो सारखी अत्यंत मधुर गाणी, अजहून आयो सारखी क्लासिकल बेस्ड गाणी , मुझे कभी कभी सपना ये आये के शाम मोरे सपने मे आये, कहदो कहदो जहांसे सारखं अवीट गाणं असो. ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे, बेहेनाने भाई कि कलाई पे अशी गाणी तर सुमनताईंची सिग्नेचर गाणी.

अशी किती गाणी ऐकत ऐकत आपण बालपणातून , तारुण्यात आणि तारुण्यातून मध्यम वयात कधी आलो हे कळलं देखील नाही. लहानपणी ऐकलेला सुमनताईंचा मधाळ स्वर तसाच कानात रुंजी घालत राहतो.
मराठी, हिंदी सह अनेक भारतीय भाषेत त्यांनी तीन हजारावर गाणी गायली. लता मंगेशकरांच्या स्वरातील साधर्म्यामुळे त्यांना सेकंड लता असा काहीसा दुय्यम दर्जा आयुष्यभर कुवत असून देखील सहन करावा लागला याचं वैषम्य त्यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोनं करून कधीच वाटून घेतला नाही हे त्यांचं कमालीचं मोठेपण आहे. काही काळापुरते रफी साहेब व लताबाईंमध्ये वाद निर्माण झाले असताना बऱ्याच संगीतकारांनी तितक्याच तोडीचा आवाज म्हणून सुमताईंकडून गाणी गाऊन घेतली हे आपलं सद्भाग्यच म्हणावं लागेल. नाहीतर हे लखलखते स्वर नकळे कुठे हरवले असते !
आईच्या मायेने अंगाई गाणाऱ्या सुमनताई, प्रियकराला साद घालण्याऱ्या सुमनताई, भावावर प्रेम करणारी बहीण, श्रीकृष्णाला आळवणारी भक्त, त्याच्यावर माया करणारी यशोदा, अशी सुमनताईंची किती किती रूपे आठवावी ? आज कदाचित स्वर्गामध्ये एक अविस्मरणीय मैफल जमली असेल ज्यात अस्तित्वरहित सुरांमध्ये सर्वजण चिंब भिजलेले असतील.देव गंधर्व त्याचा आस्वाद घेत असतील.
पृथ्वीवरून या महान गायिकेला आपण सर्वजण मानवंदना आणि श्रद्धांजली अर्पित करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता समर्पित करूया. जिथे जातील तिथे त्या आपल्या स्वरांच्या मोहिनीने सर्वाना आपलेसे करतीलच तरीही सुमनताई तुम्ही या पृथ्वीवर कायम आमच्या स्मरणात राहाल हि खात्री बाळगा.
सरतेशेवटी त्यांच्या स्वरांमध्ये भावविभोर होण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या लाडक्या श्रोत्यांकडून एका अद्वितीय महान गायिकेला विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.

— लेखन : शिल्पा कुलकर्णी, केंटकी, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800
