अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रम शासनाच्या मदतीशिवाय सुरू असल्याबद्दल कौतुक करत या वृद्धाश्रमाच्या जागेचा व अनुदानाचा प्रश्न आपण स्व:त लक्ष घालवून सोडवू अशी ग्वाही शालेय शिक्षण, सामाजिक न्याय व विशेष मागास प्रवर्ग राज्यमंत्री श्री बच्चू कडू यांनी नुकतीच दिली.
या वृद्धाश्रमाला त्यांनी भेट देऊन तेथील अडी अडचणी, समस्या अत्यन्त आस्थेवाईकपणे जाणून घेतल्या.
श्री कडू यांनी यावेळी बोलताना वृद्धांमुळे, घर परिवार टिकत असल्याने त्यांना जपा असे आवाहन जनतेला केले.
श्री कडू प्रमुख असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांनी एप्रिल महिन्यापासून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आजपर्यंत या वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांच्या रोजच्या भोजनाची व्यवस्था केली आहे आणि लॉक डाऊन संपेपर्यंत ही व्यवस्था सुरू राहणार आहे. या उपक्रमाचे नामदार बच्चुभाऊ कडू यांनी कौतुक केले.
सर्व अनाथ वृद्धांच्या समस्या जाणून घेताना अचानक तहसीलदार रुपेश सुराणा यांना त्यांनी फोन लावला व सर्व अनाथ वृद्धांचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड काढून श्रावण बाळ योजने अंतर्गत सहाशे रुपये महिना व रेशन देण्याची व्यवस्था करावी असे तात्काळ आदेश दिले.

शरणपूर वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर व त्यांचे कुटुंबीय, सहकारी शासनाच्या मदतीशिवाय हा वृद्धाश्रम चालवतात त्यांच्या कार्याचे कौतुक करत शासन दरबारी वृद्धाश्रमाला मान्यता देऊन पाटबंधारे खात्याच्या जागेची गरज पडल्यास जमीन देण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.

श्री कडू यांनी यावेळी शरणपूर वृद्धाश्रमाला रोख दहा हजार रुपयांची मदत केली. यावेळी वृद्धाश्रम कमिटीचे मार्गदर्शक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, सुरेश उभेदळ, भिवाजीराव आघाव, प्रहार वारकरी संघटनेचे अजय महाराज बारस्कर, प्रहार शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे, रघुनाथदादा शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रुपेंद्र काले, प्रहार जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, प्रहार धरणग्रस्त अध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, नेवासा तालुका संघटक नवनाथ कडू, नेवासा वरिष्ठ कार्याध्यक्ष अनिल विधाटे, महारुद्र आव्हाड उपस्थित होते.
– लेखन : सुधीर चव्हाण.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
