(भुजंगी वृत्त कविता)
सुखाने जगावे मला वाटते
सुखाचा तरी मंत्र मी शोधते
हरी नाम राहो मुखी रे सदा
नको दुष्ट भावांस थारा कदा
असावे तुझे शुद्ध आचार ते
विचारात सुद्धा नको पाप ते
चुकीच्या पथाला नका हो धरू
सदा सत्य जे नित्यनेमे स्मरू
नको द्वेष हेवा कुणाचा मनी
जगू स्नेहभावे सुखाने जनी
उद्या काय ते ज्ञात कोणा असे
म्हणूनी जगावे जसे जे असे
सबूरी नि श्रद्धा धरीसी जरी
समाधान चित्तास लाभे तरी
नदीच्या प्रवाहातली नाव ही
तराया तिला शांत वृत्ती हवी
प्रभू एक तो तारितो विश्व हे
तयाचीच भक्ती करू जाण हे

– रचना : अरूणा मुल्हेरकर
