Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं : ९६

ओठावरलं गाणं : ९६

नमस्कार
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत ! आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून सकाळी साडेसात वाजता लागणाऱ्या “भावसरगम” या १५ मिनिटांच्या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांना त्या काळात खूप छान छान गाणी दिली. या “भावसरगम” कार्यक्रमातून श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेलं ज्येष्ठ कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं एक गाणं आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –

“परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का
भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशील का”

सुरवंटाचं जसं फुलपाखरू होतं त्याचप्रमाणे आपल्या कुमार वयामधून तारूण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश करणाऱ्या एका युवतीच्या मनातलं हे पहिलं प्रेम आहे. तारूण्य सुलभ लज्जा आणि अव्यक्त भावना यांच्याबरोबरच यौवनाच्या उंबरठ्यावर उभी असली तरी या तरूणीला अजूनही परीकथेतला राजकुमार आठवतो आहे आणि तसाच देखणा जोडीदार आपल्याला ही मिळावा असा विचार मनात येऊन ती त्याला विचारते आहे की माझ्या स्वप्नात येशील का आणि नुसतं स्वप्नात येऊन चालणार नाही तर माझ्या मनात जे अनामिक असे शब्दांनी सांगता न येणारे भाव आहेत ते ही ओळखशील का?

या डोळ्यांचे गूढ इषारे
शब्दावाचून जाणून सारे
राणी अपुली मला म्हणूनी तुझिया संगे नेशील का

आपल्या या स्वप्नातल्या राजकुमाराकडून तिच्या काय अपेक्षा आहेत हेदेखील ती अगदी मोकळेपणाने, कोणत्याही प्रकारची भीडभाड न बाळगता त्याला सांगते आहे. खरंतर पुरूष मंडळींना डोळ्यांच्या खुणा, डोळ्यांनी केलेले इषारे स्पष्ट बोलल्याशिवाय कधी समजत नाहीत. ही युवती आपल्या प्रिय राजपुत्राला हेच विचारते आहे. मी काहीही न बोलता तू माझ्या मनातली गोष्ट ओळखशील का? बरं मी आत्ता सुद्धा तू नेशील तिथे तुझ्याबरोबर कुठेही यायला तयार आहे. माझ्या मनात काय चाललंय हे समजा तू ओळखलं नाहीस, पण मी डोळ्यांनी केलेले गूढ इषारे वेळेवर समजून, तेंव्हा तरी तू मला साथ देशील का?

मूर्त मनोरम मनी रेखिली
दिवसा रात्री नित्य देखिली
त्या रुपाची साक्ष जीवाला प्रत्यक्षातून देशील का

राजकुमारा, माझ्या जीवाला वेड लावील अशी तुझी देखणी मूर्ती फक्त माझ्या ह्रदयातच नाही तर माझ्या मनाची जागाही तूच व्यापली आहेस. त्यामुळे दिवस, रात्र आणि स्वप्नातही मी तुलाच पहात असते. इतके दिवस मी स्वप्नात पहात असलेलं, मनाला भुरळ घालणारं तुझं देखणं रुप आता प्रत्यक्षात पहाण्याची ओढ माझ्या मनाला लागली आहे. माझ्या मनातली इच्छा तू आज मला भेटून पूर्ण करशील का?

लाजून डोळे लववीन खाली
नवख्या गाली येईल लाली
फुलापरी ही तनू कापरी ह्रदयापाशी घेशील का

तू भेटशील तेंव्हा मला तुला डोळे भरून पहायचं आहे असं जरी मी म्हणत असले तरी तुला पाहिल्यावर मात्र स्त्री सुलभ लज्जेमुळे माझी नजर आपोआपच खाली वळेल. माझं सौंदर्य तू अनिमिष नेत्रांनी पहात राहाशील तेंव्हाही माझे गाल आरक्त होतील. ह्रदयाची धडधड वाढेल आणि शरीराला सूक्ष्म असा कंप सुटेल. अशा वेळेस तू पुढे होऊन मला तुझ्या मिठीत घेऊन, ह्रदयापाशी घट्ट धरून आश्वासक हाताने धीर देशील का?

लाजबावरी मिटून पापणी
साठवीन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले स्वप्नच माझे होशिल का

तुझ्या बाहुपाशात मी, पाठीवर तुझा आश्वासक हात, तुझ्या बाहुपाशात मिळणारं स्वर्गसुखाचं समाधान आणि लज्जेने आरक्त झालेले माझे गाल हे सारं चित्र मी पापण्यांची कवाडं बंद करून माझ्या डोळ्यात साठवून ठेवीन, ह्रदयात जतन करुन ठेवीन‌. राजकुमारा, मनाला भुरळ घालणाऱ्या या चित्रामधलं स्वप्न तू पूर्ण करशील का ?

गाण्यातील शब्दांना साजेसं संगीतदिग्दर्शक अनिल मोहिले यांचं संगीत आणि नवतरुणीच्या मनातील भावना आपल्या आवाजातून व्यक्त करणारा कृष्णा कल्ले यांचा सुंदर आवाज या दोन्हींचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे आजही हे गाणं आपल्या हृदयात घर करून रहातं.

विकास भावे

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. विकास, हे गाणं म्हणत म्हणत आम्ही मोठे झालो. तुम्ही खूप छान लिहिता नेहमीच पण मला एक पडलेला प्रश्न
    पुरुषांना खरच प्रेम सांगावे लागते? तुमचा अनुभव आहे का असा?

  2. वंदना विटणकर यांचं हे गाजलेले सुरेख गीत. अनिल मोहिले यांनी त्यावर चढविलेला संगीताचा सुंदर साज व कृष्णा कल्ले यांचा आवाज म्हणजे दुग्धशर्करा योग होय. आपण या गीतांचे केलेले रसग्रहण सुद्धा तितकेच सुंदर झाले आहे.

  3. नेहमीप्रमाणे खूप सुंदर रसग्रहण👌👌👌👌

  4. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या वेळी मेंदीच्या पानावर नावाची कॅसेट वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज होत होती…. त्यामुळे अनेक सुंदर सुंदर गाणी आम्हाला ऐकायला मिळाली…
    त्यातील हे गाणं परी कथेतील राजकुमारा …
    इतका सुंदर गाणं आहे आणि इतका सुंदर गाईला आहे की काय सांगू… भावे सर तुम्ही इतका छान लिहिलंय की वाचताना सुद्धा ते फील होतं आणि खूप आनंद आला आणि जुन्या आठवणींमध्ये गेलो बालपणीच्या… ज्यावेळेस ही गाणं मला कळत नव्हतं पण ऐकायला खूप भारी वाटायचं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…