माझा एक “वेडा” मित्र श्री रविंद्र हनमट्टेकर आसाम मध्ये गुवाहाटी येथील युवा विकास केंद्रात प्रकल्प अधिकारी म्हणून काम करतो. हा कधी भेटला तर अखंड बडबड. डोक्यात एकच खूळ… आसाम आणि पूर्वांचलातील अन्य राज्यातील संस्कृती आणि विविधता, बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, समस्या आणि आव्हाने, त्याचे नवे नवे प्रयोग आणि उपक्रम. …
युवा विकास केंद्र नावाच्या एका संस्थेमार्फत युवकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण विनामूल्य देऊन युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असे त्याचे काम आहे. गेल्या सहा वर्षात बाराशे हून अधिक युवक – युवतींना प्रशिक्षित केले आहे. आणि हो ! केवळ प्रशिक्षण देऊन तो थांबत नाही तर त्याच युवतींना घेऊन रेडीमेड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करून त्यांनी बनवलेले कपडे गुवाहाटीच्या मार्केटमध्ये विकण्यासाठी अथक परिश्रम करतो.

गावातील शेतकऱ्यांना गोळा करून विविध विषयावर प्रशिक्षण देतो. भाताचे बियाणे तयार करायला शिकवतो. मासेमारी हा या प्रदेशातला मोठा व्यवसाय. मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या युवकांना एकत्रित करून सहकारी सोसायटीच्या मार्फत विविध सहकारी योजनांचे लाभ मिळवून देतो. सरकारकडून नदी व तलाव भाडेतत्त्वावर घेऊन मासेमारी करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
बचत गटाकडून हळद पावडर, आले पावडर, लोणची, मध, तेल अशा अनेक वस्तू तयार करून घेतो आणि त्या विकतो. रोजगार केंद्र चालवतो. नुकतेच एक पेपर रीसायकालिंग आणि हॅण्डमेड पेपर मनुफॅक्चरींग युनिट सुरू केलं असं म्हणतोय…
दर वेळी भेटला की नवं नव्या कल्पना ऐकवतो. कुठून आणतो एवढा उत्साह ? परवा त्याला मुद्दाम म्हटलं , मला पण असं काहीतरी करायचं आहे रे पण वेळच मिळत नाही. त्यावरही त्याच लगेच उत्तर तयार होतच. “अरे तू फक्त आसाम ला फिरायला आलास ना तरी खूप आहे. आमच्या लोकांना त्यातही थोडा रोजगार मिळेल.” ” व्हॉट्सअप वर सक्रिय आहेस ना ? मग झालं तर ! आमच्या सारख्या अनेक संस्था आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते पूर्वांचालात विविध विषयावर काम करतात. त्यांची माहिती तुझ्या मित्रा पर्यंत पोहाचवलीस तरी खूप मदत होईल तुझी.”

” तुझ्या मित्रांना पूर्वांचल कळेल. कुतूहल वाढेल. एकदा भेट दिली की ते प्रेमातच पडतील या पुवांचलाच्या भूमीच्या… “
” आणखीन एक काम कर. आमच्या अनेक उपक्रमांना नेहमीच आर्थिक चणचण भासते. शक्यतो प्रत्येक उपक्रम स्वयं सिद्ध असावा असा आमचा प्रयत्न असतोच पण नव्या उपक्रमांना सुरुवातीला आर्थिक मदत लागतेच. आणि जर आर्थिक पाठबळ असेल तर अधिक जोमाने काम करता येईल, नव्या प्रकल्पांना हात घालता येईल.”

बरं ! बघतो !! प्रयत्न करतो . असं बोलून त्याची बोळवण केली खरी पण नंतर कुठे तरी तो भुंगा मनात घर करून राहिला आणि सहजच व्हॉट्सॲप वर हा लेख टाईप करायला घेतला.
तर मित्रांनो, माझ्या या मित्राला मी माझ्या तर्फे यथाशक्ती मदत करणारच आहे पण तुम्ही देखील करावी अशी विनंती करतो.
— लेखन : आशिष शिवलकर. डोंबिवली.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800