कल्याण (पूर्व) येथील नूतन ज्ञान मंदिर शाळा हीन विद्यार्थ्यांसाठी नेहमी कल्पक उपक्रम राबविण्यासाठी आणि त्याच बरोबर त्यांना केवळ एका प्रकारच्या पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्नशील असते.
या शाळेच्या प्रांगणामध्ये पूर्व प्राथमिक विभागात नुकताच “चिमुकल्यांची भाजी मंडई” हा अत्यंत अभिनव उपक्रम संपन्न झाला. ही “चिमुकल्यांची भाजी मंडई” पाहताना…..
ll कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ll
ll लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी ll
हा संत सावता महाराज यांचा अभंग आठवत होता. या भाजी मंडईत भाजी विकणारी मुलं ही साक्षात विठ्ठलाचे रूप भासत होती.

या मंडईत विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या तसेच कडधान्य यांची विक्री केली जात होती. पूर्व प्राथमिक विभागाची निरागस चिमुकली आपल्याला भाजी विकताना दिसत होती. त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही होते. भाजी तर विकतच होते त्याच सोबत पैसेही व्यवस्थित ठेवत होते.

पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री जोशी सांगतात की, विद्यार्थ्यांना आई डब्यात जी भाजी देते ती भाजी कशी दिसते ? ती कशा प्रकारे बाजारातून आणली जाते? भाजी मंडई कशी असते? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी “चिमुकल्यांची भाजी मंडई” हा उपक्रम शाळेमध्ये घेतला गेला. काही चिमुकल्यांनी आपल्या पालकांसोबत भाजी विक्री केली तर काही चिमुकल्यांनी आपल्या पालकांसोबत भाजी खरेदी ही केली.
या उपक्रमास पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तसेच याशाळेतील शिक्षकांनी सुद्धा या चिमुकल्यांच्या भाजी मंडईतून भाजी खरेदी केली.

या चिमुकल्याच्या भाजी मंडईला आकार दिला तो पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री जोशी तसेच त्यांच्या सहशिक्षिका सौ समिधा कदम, सौ दिपाली पवार, सौ ज्योती महाजन, सौ नंदा जोशी, सौ शितल सोनावळे व सौ सुजाता कारंडे या सहशिक्षकांनी.
कोणत्याही शाळेत न गेलेल्या संतांनी आपली मराठी भाषा जिवंत ठेवली. याच मराठी भाषेला आपणही जिवंत ठेवण्यासाठी आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा वाचवणे गरजेचे आहे अशा प्रकारचे शाळेत उपक्रम राबवून आपली मराठी शाळा आपले मराठीपण जिवंत ठेवत आहे.
या शाळेचे अनुकरण इतरही शाळांमध्ये होणे गरजेचे आहे.
— टीम एन एस टी ☎️ 9869484800
