निळ्या डोंगरांवर झुले
नाचणारा निळा मोर
झाडा आडून झुकते
निळे गोजिरे अंबर.
शुभ्र नभाची ही रेखा
घाले मनाला भुरळ
तुझ्या माझ्यासाठी सखे
माझी कवितेची ओळ.
असे झाडाच्या तळाशी
गोल उंबरा पानाचा
तुझ्या माझ्या कवितेचा
शब्द सखे जपायचा
खेळ धरेचा चालतो
पान नवे येते जाते
काही सरताना दिस
माती मायेत भिजते.
काही नाती ही अजोड
काही कोरडी सखोल
पान गळताना थोडे
झाड थोडेसे अबोल.
तुझ्या माझ्या हाती आले
नव्या नक्षत्राचे गाणे
नवे सुटतांना कोडे
फिटे शब्दाचे पारणे.

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
