Thursday, February 19, 2026
Homeसाहित्यसंगती रंग : 2

संगती रंग : 2

“झेंडूची पाने”

“संगती रंग” हे सदर पंधरा दिवसातून एकदा प्रसिद्ध केले जाईल, असे मागच्या पहिल्या भागात जाहीर करण्यात आले होते. पण पहिल्याच भागाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने लेखिका वसुंधरा घाणेकर यांनी हे सदर दर आठवड्याला लिहिण्याचे ठरविले आहे, या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्व वाचकांना हार्दिक धन्यवाद.
— संपादक
विशाखाने डोकावून पाहिले, अजूनही आजींचे दार बंद होते.एरवी जाळीचे दार लावून, आतमध्ये आजी आजोबा बसलेले असतात. कधी टी. व्ही समोर तर कधी पुस्तक, पेपर किंवा टेप रेकॉर्डर. (होय, तोच तो कॅसेटवाला !)
तिनं न राहवून बेल वाजवली. आजी तुरुतुरु आल्या. आजी ठार बहिऱ्या आहेत. त्यामुळे बेल वाजवली की प्रत्येक खोली दिव्याने उजळते ! विशाखा चौकशी करायला आली म्हटल्यावर कानाचे यंत्र हाताने चाचपत आजींनी हसत शेरा मारला,
“अगंबाई ! अशी खुशाली विचारणं शोभत नाही हो, फ्लॅट संस्कृतीत !”
“सांगा हो, कुठे होतो आपण…”
“डिनर डेट होती आमची. नवीन चायनिज झालं आहे ना, चौकापाशी. चालत पाच मिनिटांवर आहे.
पण वॉकर घेऊन कसा जाऊ मी ? जावयाने टेबल बुक करून ठेवलं होतं. मुलाला ऑनलाईन काम आहे आज. त्यानं हॉटेलमध्ये पोहोचवलं, घरी सोडलं. मस्त झाली डिनर डेट ! लंगड्या बहिऱ्याची जोडी आमची.“
मग स्वतःच खो खो करून हसले. विशाखाला म्हणाले,
“हसू दाबून धरू नकोस. हास गं… करा आम्हा म्हाताऱ्यांची चेष्टा.”
“कुणी केली चेष्टा ?” विशाखाने उसळून विचारलं.
आजींना म्हणाले, “तिला वडी दे गं, काल केलीस ती. तोंड गोड कर. रागावली वाटते …”
आजींनी वडी दिली. पाणी आणून ठेवले. शिवाय हातात गजरा दिला.

“डिनर डेट तुझ्या आजींनी केली हो साजरी… तिला पेन्शन मिळतं. माझा मी फंड वाटून टाकला मुलांना .”
“आज डेट म्हणून, गजरे आणले बरं.” मिस्किल हसत आजी.

चिरतरुण वृत्तीची आनंदी माणसे आहेत ही. विशाखाने एकदा विचारले होते “ह्या वयात इथे एकटे कशाला राहता ?” “अगं, आम्ही दोन वेगवेगळी माणसे दिसत नाहीत का तुला ? एकटं म्हणतेस खुशाल ते ?” आजींनी निरुत्तर आणि नि:प्रश्न करून टाकले होते, तेव्हा.
“पेपर दे गं. आज वाचलाच नाही. डिनर डेटच्या गडबडीत. चष्मा कुठे आहे ते शोधून दे.” आजोबा बसून बसून फर्मावत असतात.
“किती कामं सांगता हो.” नेहमीच आजी लटकं ओरडतात. खूपदा वयाबरोबर माणसे कडवट होत जातात.
कोणत्याही कामात ऑफिसमध्ये असो, उत्सवमंडळात असो किंवा सोसायटीच्या कामात असो. नवशिके, उत्साही शिरले की लगेच अशी मंडळी कबड्डीच्या आक्रमक मूडमध्ये येतात. नकारात्मक बोलतात..
‘किती दिवस फुरफुरतो बघू.’
नवीन काही आले पिक्चर, नाटक किंवा एखादी फॅशन, सुरू होतं., ‘आमच्यावेळी नव्हतं हो, असं ! ‘ .
वय वाढल्यावर माणसे खूपदा समीक्षक, परीक्षक, उपदेशक होतात. आस्वादक व्हायचे जणू विसरतात !
ही दोन्ही माणसे जगण्यातली गोडी टिकवून होती. शिवाय ती गोडी आजूबाजूच्या लोकाना वाटत होती.

पेपर वाचून आजोबा एकाएकी हसत सुटले.
“काय झाले ? “
” आठवले मला. धोतर नेसत होते काका,तोच निसटल्या… “
” पुरे पुरे” आजींनी थांबवले.
“बरं, पुरे.”
विशाखाला सांगू लागले,
“झेंडूची फुले, वाचलं आहेस का ? अत्र्यांचं …आमच्या काळचं हो ! त्यात मिश्किल कविता आहेत. राजकारणावर आहेत त्यात अशा कितीतरी !…राजकारणात काका, मामा, अधू मेंदू अजूनही असतातच. राजकारण नसते कुठे ! क्रीडा, चित्रपट, साहित्य… जिथे जिथे राजकारण तिथे झेंडूची फुले आठवतात.”

“मी अनेक म्हातारी माणसे पेपर वाचून निराशेचे उद्गार काढताना पाहिली आहेत. आजोबा, तुम्हाला झेंडूची फुले आठवतात !”
“अगं निराश कशाला व्हायचे ? सुष्ट आणि दुष्ट दोन्ही प्रकारची माणसे अनादिकाळापासून आहेत. इतिहास वाचा. रामायण, महाभारत, वाचा. कपट, कारस्थान, फितुरी, द्वेष, स्वार्थ नव्हतं कधी ? आपली भूमिका आपण प्रामाणिकपणे करायची. “
विशाखाने खरोखर हात जोडले.”ग्रेट आहात !”
“माणूस फळं खात होता, तोपर्यंत नसेल तो कदाचित दुष्ट. पण शिकार करू लागला. गायी, म्हशीच्या वासराचं दूध तो स्वतः पिऊ लागला. तेव्हाच त्याच्या दुष्टपणाला सुरुवात झाली असणार नाही का ? ”आजींनी विशाखाला नेहमीप्रमाणे निरुत्तर केले.
“तुमच्याकडे येऊन कूल वाटतं आजी.”
वडी खाऊन, पाणी पीत ती म्हणाली, “किती छान वास असतो, माठातल्या पाण्याला…”
आजी फ्रीज, मिक्सर घरात ठेवत नाहीत. भाजी ताजी आणायची. इडलीचं पीठ सून आणून देते. दाण्याचं कूट मुलगी पाठवते ! दूध उरलं तर दही लावायचं. वडीसाठी पातेले मात्र हवे !
“करायचं काय,आता अडगळ बाळगून ! आम्ही पिकली पानं !” आजी म्हणतात.
पिकली पानं ? ही झेंडूची पानं ! सुरेख, कोरीव, सदासतेज.

वसुधा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments