1. वसंतोत्सव
जीर्ण पिवळी पाने गळता शहारला
पाहुनी पर्णविहिन स्व रुप व्याकुळला
वारा हेलावला,हात हळुवार फिरवला
अचानक तांबुस रंगात पालवला,,,,,
परिसर वसंत कुसुमांनी दरवळला
लाल गुलमोहरासंगे बहावा झुलला
स्वागता पुष्पगुछ देत बोगनवेल वाकला
सुवासित कडूलिंब पिकस्वरे घुमला,,,,,
बोलका रावा थवा खिडकीत विसावला
कोणा वृक्षास केवळ फुलांनी नटवला
रंगीत तंतुमय फुलांनी शिरीष सजवला
आनंदाचा अनमोल खजिना गावला,,,,,
होलिकादहने मनामनातील द्वेष संपला
हात हाती गुंफले,जो-तो प्रेमरंगात रंगला
हसत स्नेहठसा उमटविण्यात गुंतला
मंगलमय कामना देण्यात रमला-दंगला,,,,,
— रचना : विजया केळकर. नागपूर.
2. धुळवड …
वैशाखशुद्ध पौर्णिमा
होलिकोत्सव साजरा
जाळले अहंम् असूरा
दुर्गुण अशुद्ध कचरा
बोंबाबोंब आग डोंब
अपशब्द करी निचरा
वाणी हो मधाळ शुध्द
विसर्जित क्रोधबोचरा
हात गुंफून हातांमध्ये
होळीभोवती फेर धरा
पुरण पोळी एकमेकां
गाणीगोड स्फुरे अधरा
अग्नी शांत दुजे दिनी
धुलीवंदन प्रभाते करा
धुळवड सुखे खेळावी
नमन करून दिनकरा
चिखलचोळता शरिरा
उष्मा होणारं थंड बरा
उन्हाळा सुसह्य व्हावा
आयुर्वेदीयउपाय खरा
अवगुण मळी गळाली
निरोपद्यायचा विकारा
सणसंस्कृती जाणहवी
शुध्द श्रध्देने स्विकारा
हास्य कवी संमेलनात
बौध्दिकहोळीसाकारा
व्यंगावरती बोटनसावे
नव पध्दती ये आकारा
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
3. होळीचा खेळ
कृष्णाची होळी सांगा किती होती भोळी
खेळा रे खेळा तुम्ही गोपाळांची होळी |धृ|
रासक्रिडा खेळायची मजा येई न्यारी
हंडी मडकी गुलालाची उधळण भारी
राख गुलाल शेणीची चालायची खेळी
खेळा रे खेळा तुम्ही गोपाळांची होळी |१|
होळीला काम,क्रोध,राग,मत्सर जाळी
नका रे नका खेळू ही अंधत्वाची होळी
दुर्गुण जाळा सद्गुण भरा वेळोवेळी
खेळा रे खेळा तुम्ही गोपाळांची होळी |२|
जंगलाची कत्तल झाली सगळी कडे
कुठून वेचून आणावी सुकी लाकडे
सुख,शांती, प्रेमाची करा पुरणपोळी
खेळारे खेळा तुम्ही गोपाळांची होळी |३|
रासायनिक रंगाने मानवधर्म बुडे
नको कुविचार हे मानवा तुझ्या पुढे
षडरिपुंच्या होळीची करावी राख रांगोळी
खेळा रे खेळा तुम्ही गोपाळांची होळी |४|
— रचना : शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई.
4. रंगोत्सव
सरता शिशिर दिस मोठा होईल,
तांबडं फूटता पूर्वा गुलाल ऊधळील,
रथातील रवीराज धरा सोनेरी करील,
अंबरात कापूसमेघ विहरतील.
राने वने चैत्रपालवीत पोपटी होतील,
जाई जुई मोगरा शुभ्र वसनी नटतील,
गुलाबी काटेसावर हळूच लाजेल,
लाल पांगारा अग्नी होईल,
अनेक रंगात रानी वनी फूलोरे बहरतील,
आंब्यावर बाळकैरी हिरवे तोरण बांधेल,
फणस जांब पपया जांभळे,
आपल्या रंगात रंगुनी घेतील हिंदोळे,
वृंदावनी घननीळ होळी खेळेल,
भिजूनी राधा प्रेमरंगात रंगेल,
पिवळ्या मुंडावळी बांधून
ग्रिष्माचा बहावा येईल,
सोनचाफा आंबा अबोली,
पिवळ्यारंगात ऋतूराजाची पालखी येईल
सजलेली चैत्रगौर चैत्रांगणी खेळेल,
रंगोत्सव वसंताचा भूमीवर रंगेल.
— रचना : अनुराधा जोशी. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
