Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“आयुष्याची नवी पहाट”

कवयित्री निशा खापरें यांचा “आयुष्याची नवी पहाट” हा पहिला काव्यसंग्रह समीक्षणार्थ स्नेहपूर्वक पोहचला. पहिली कलाकृती असली तरी गतकालीन ओरखडे जपून वास्तवानुभ घेऊन अवतरलेली हि शब्दकळा आहे याची कबुली मनोगतात निशानी दिली आहे. माझ्या मनातील विचारशलाकेतील भावनोद्रेक निर्मळ करून, मायसखी होऊन कविता माझी पाठराखण करते. याच अर्थाने काव्य संग्रहाचे शीर्षक “आयुष्याची नवी पहाट ” समर्पक असे आहे. पेपर वाचताना काहीतरी लिहिले पाहिजे अशी जाणीव मनात रूजली, हीच कवितेची उर्मी ठरली. मनातील आत्मियता, स्नेह, प्रेम, कुटुंब आणि घर संसार याविषयीचा भावबंध व्यक्त करताना अन् अस्तित्व खुणा जपताना ती व्यक्त होते,
“अथांग अशा अस्तव्यस्त पसाऱ्यात
तळाला लागू नये आपले अस्तित्व
म्हणून सावरते आहे
हेलकावणाऱ्या त्या घडीला तोल” (जीवन नौका)

आयुष्याच्या वळणावर आलेल्या भावनिक हिंदोळ्याच्या पदराखाली विसावलेली ही कविता आहे.
निशाची कविता प्रगल्भ मनाची आहे याची प्रचिती अनेक कवितांमधून येते.
शब्दातून कविता प्रसवते, पण शब्दकळा सोसून आलेली कविता माणसाचे बोट धरून, माणसांकडे पाठ फिरवणाऱ्या विकृती विरोधात उभी राहते.
‘अस्तित्वाच्या सुगंध ज्योती ‘ चा दरवळ हेच व्यक्त करतो,
“नको अंतरी गर्व मानवा
नश्वरतेच्या या देहाचा,
भान असू दे तुझ्या मनाला
जगणे मरणे खेळ क्षणाचा,
या जन्माला लाव सार्थकी
कर्म चांगले निर्मळ करूनी,
अंतरीचे उधळ चांदणे
माणुसकीला हृदयी जपुनी (पृ२८)
कवयित्री निसर्ग सानिध्यात रमणारी आहे, शेतशिवाराच्या सहवासात अनुभवलेला हिरवाईचा चढविलेला शब्दसाज हे काव्याचे बलस्थान म्हणता येईल. “सृष्टीचे रुप, पाऊस, श्रावण, सरी मृगाच्या, जीवनचक्र,भिजते काळी आई, श्रावणझुला,या कवितांचा नामोल्लेख या अनुषंगाने अटळ ठरतो.

कवयित्री निशा खापरें

कवयित्री निशाची निसर्गातील रमनीयता व ती आशयघनता ताकतीने टिपण्याची निरिक्षण शक्ती, मांडणीचे कसब वाखाणण्याजोगी आहे. निसर्गचक्रात सजलेल्या धरतीचे विविध रुपे साकारली आहेत,
“हिरवी रांगोळी / खुलून दिसते
शिवार नटते / श्रावणात
“चल खेळूया मुक्त बागडू हिरव्या हिरव्या रानी
इवल्या इवल्या पंखामधूनी ऐकू सुंदर गाणी” (सृष्टीचे रुप)
“डोंगर झरते नदी वाहते पक्षी गाती गाणी
शेतशिवारी पिके डोलती दरवळ पानोपानी” (सरी मृगाच्या)
जीवनाचे चिरसत्य अधोरेखित करणारी “जीवनचक्र “ही कविता ,
“मृग नक्षत्राचे येणे
वैशाखाचे आहे देणे
जीवनाचा असा खेळ
हेच ऋतूचे सांगणे”(८४)
जीवन मृत्यूची अटळता ऋतूंच्या येण्याजाण्यातून होणाऱ्या बदलातून मानवी जीवनाला स्थायी परिणाम देते.
स्त्रीजीवनाच्या वेदना दृगोचर करणाऱ्या कविता संग्रहाचे बलस्थान आहेत. प्रेम, विरह, शोषण, मातृत्व, वैवाहिक जीवन, संसार, अशा बहुअंगाने स्त्री विश्व चितारणात्या कविता निशा खापरेंच्या अनुशीलतेची प्रचीती देऊन जातात.
“बाई जातीचे जीवन
तळतळणारी राई
जीव जळतो तरीही
गाते सुखाची अंगाई” (बाईपण)
राईची झिजण्याची उपमा म्हणजे अनुपम योजन नवरा- बायको या नात्यातील जबाबदारीची जाणीव व्यक्त करणारी एक दखलपात्र कविता !
स्त्री मुक्ती चळवळीच्या उद्गात्या जिजाऊ, सावित्रीबाई फुले, जीवनाची आयुष्यातील प्रथमगुरू, मार्गदर्शक, असलेल्या आईला वंदन करणाऱ्या कविता समर्पणाचे प्रतिक आहेत. प्रत्येक माउलीमध्ये जिजाऊ, भीमाई ,क्रांतिज्योती शोधण्याचे काम करण्याचे आवाहन देखील आहे. मातेसमान जगात कुठलेही कृपाछत्र नाही, ती मुलांसाठी निरपेक्ष कल्पतरू असते आजच्या कठोर काळात एक स्त्री म्हणून लढणाऱ्या आईला आयुष्याची नवी पहाट हा पहिलाच संग्रह कवयित्रीने अर्पण केला आहे.

“तिच्या घामाचा सुगंध” कवितेत निशा भावना व्यक्त करताना लिहिते,
“संसाराच्या ठिगळाला
माय जोडते प्रेमाने
चिंध्या झालेल्या मनास
पुन्हा सांधते कष्टाने”
ही कविता बहुआयामी आहे अनेक विषयांवर चपखल भाष्य करते. ‘कविता म्हणजे नुसता शब्दांचा मेळ नसून प्रतिभेची उत्कटता जपणारी मायेची पालवी असते ‘ ह्याची प्रचिती नक्कीच वाचताना येते .एकूण ९२ कविता संग्रहात आहेत. त्यातील काही गेय पूर्ण, तर काही वास्तववादी, व्यवस्था बदलांवर निष्ठा व्यक्त करणाऱ्या आहेत. बहुतेक कविता चार ओळींचे कडवे असणाऱ्या आहेत. अपवादात्मक दीर्घ कविता मुक्तछंद धाटणीची अनुभूती देतात.
अनुभव व्यापकतेमुळे सर्वस्पर्शी काव्य फुलले आहे. हा काव्यसंग्रह जीवनानुभवातील भावविश्वाला अर्थघनता प्रदान करतो या अनुरोधाने आवर्जून वाचनीय आहे. ही साहित्यकृती पहिलीच असली तरी वाचकस्वीकृती नक्कीच मिळवेल, असा विश्वास ब्लर्बमध्ये प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी व्यक्त केला आहे, तो याच अर्थाने! माझे सन्मित्र डी. बी. जगत्पुरिया यांच्या चिकित्सक प्रस्तावनेत कवितेचे केलेले सर्वांगीण मूल्यमापन वाचकांना प्रेरणादायी आहे. काव्यप्रांतात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या लेखनासाठी निशा खापरे यांना शुभेच्छा देतो !!
चित्रकार अरविंद शेलार सरांनी आशयघन मुखपृष्ठ चितारले आहे. सुबक छपाई करणाऱ्या अविशा प्रकाशनाचा उल्लेख अपरिहार्यच !!!

— समीक्षण : साहेबराव मोरे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 98694 84800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर पुस्तक परिचय करून दिला आहे. हा लेख वाचून कवयित्री आणि समीक्षक ह्या दोघांच्याही प्रतिभेचा परिचय घडत आहे. दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सोनं !

दिन विशेष

झेप : 18

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments