Homeकलासुमन कल्याणपूर : गोड सुर हरपला !

सुमन कल्याणपूर : गोड सुर हरपला !

सुमन कल्याणपूर यांचं देहावसान झालं तेव्हा आम्ही लंडन हून परतीच्या प्रवासात होतो. काय योगायोगाच्या दुःखद घटना लागोपाठ घडत आहेत बघा… आशा ताई भोसले आपल्याला सोडून गेल्या आणि दीड महिन्याच्या कालावधीत सुमन कल्याणपूर यांनी शेवटचा श्वास घेतला. जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक दिवस जाणारच असतो हे ठाऊक असूनही काही व्यक्ती गेल्यावर आत्यंतिक दुःख होतं, त्यामधील सुमन कल्याणपूर यांना जाणता येईल. अतिशय गोड, निरागस गाणी त्यांनी आपल्याला दिली. सुमन कल्याणपूरचा आवाज लता दीदीशी मिळता जुळता. गोडवाही तसाच. आशा ताई लता दीदीच्या समवयस्क आणि त्याच काळातल्या असल्यामुळे त्यांना लता आशा एवढी प्रसिद्धी मिळाली नाही हे खरं. पण त्यांची गाणी कुणाहीपेक्षा कमी खचितच नव्हती.

सुमन कल्याणपूर यांचा चेहरा इतका सुंदर साधा आणि निर्लेप होता आणि त्यांच्या गोड मुलायम भावनाप्रधान गाण्यांना अगदी साजेल असाच ! पुष्कळदा चेहरा मोहरा आणि गायलेली गाणी यांचा समन्वय लागणार नाही. म्हणजे सोज्वळ चेहरा असूनही उडती किंवा कॅब्रे डान्सर ची गाणी काही गायिकांनी गायलेली आहेत, अर्थात तीही अतिशय सुंदर. हा एक अस्खलित गुण आहेच. चेहरा आणि गाणी जुळत नाहीत म्हणून त्यांचं महत्वही कमी होत नाही. पण सुमन कल्याणपूर ने गायलेली गाणी त्यांच्या स्वभावाशी, चेहऱ्याशी जुळतात हे नक्कीच.

सुमन कल्याणपूर ने गायलेली काही गाणी, जसं आजकाल
‘तेरे मेरे प्यारके चर्चे”,
‘ना ना करते प्यार’,
‘तेरा मेरा तेरा मेरा’.. ही गाणी तर मला वाटत होतं की लतानेच गायलेली आहेत. ती सुमन कल्याणपूर ने गायली आहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. किती गोड गाणी आहेत ही. शिवाय तिचं
‘केतकीच्या बनी’ असो की
‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई’ किंवा
‘घाल घाल पिंगा वाऱ्या’..असो तो स्वर तेवढ्याच प्रकर्षाने हृदयाला भिडतो.

‘लिंबोणीच्या झाडामागे‘ हे ऐकताना तर एक आई आपल्या बाळासाठी गाते आहे असच वाटतं.
घाल घाल पिंगा वाऱ्या’ हे माझं अतिशयच आवडतं !! दूर राहणारी लेक आपल्या माहेराला किती झुरते हे स्पष्टपणे कळतं. कित्येकदा हे गाणं गुणगुणत असताना कंठ दाटून आला आहे.
जिथे सागरा धरणी मिळते‘ हेही तसच भावनांनी ओथंबलेलं भावगीत आहे. ‘देव माझा विठू सावळा‘ हे ऐकताना पुढ्यात साक्षात विठ्ठल उभा आहे अशी जाणीव होते.
माझी आई एक तिचं गाणं नेहमी म्हणायची. ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे.. ‘अतिशय गोड वाटायचं, लहानपणी. अजूनही ते गाताना तसाच भाव उमटतो.

सुमन ताई खरं तर तुमचा आवाज लताशी जुळत असल्यामुळे कित्येक तुमची गाणी मी लताचीच समजत गेले. त्यासाठी तुमची अगदी मनापासून माफी मागते. आता ती गाणी पुन्हा ऐकताना तुमची आठवण येणारच येणार आणि खेदही दाटून राहणार की तुम्हाला तुमची प्रसिध्दी जेवढी मिळावी तेवढी मिळाली नाही. पण तुमचा स्वर, भाव, गोडवा हा नेहमीच अंतरात भरून राहील हे नक्कीच. अशी सुमन पुन्हा होणे नाही !!

देवाच्या दरबारात तुमचं स्वागत कौतुकाने झालं असणार. कदाचित देवाने तुमच्या गाण्यांच्या मैफिलीसाठी मुद्दाम तर बोलवून घेतलं नसेल ? तिथेही तुम्ही तुमच्या गाण्यांचा गोडवा पाझरत राहणार यात शंका नाही.

सुमनताईंना भावपूर्ण आदरांजली🙏🙏

प्रज्ञा आठल्ये.

— लेखन : प्रज्ञा आठल्ये.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments