Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

‘निवडणूक – एक आजार’ : हास्यतुषारांचं शिंपण

निवडणूक हा तसा गांभीर्यानं घेण्याचा विषय. निवडणूक म्हणजे लोकशाही व्यवस्थेतील मतदान प्रक्रियेद्वारे मतदारांनी नेते मंडळींची निवड करणं. निवडणूकीच्या काळात मिरवणूकींचा महापूर येतो. सामान्य माणूस मात्र बिचारा रस्त्याच्या कडेला उभं राहून ही सगळी ‘शो-बाजी’ पाहत असतो. निवडणूकीच्या काळात एकीकडे नेत्यांचे प्रचार दौरे, सभा, आश्वासनं यांमुळे राजकीय घडामोडींना उधाण आलेलं असतं, तर दुसरीकडे नेत्यांची भाषणं ऐकताना प्रचाराचा आनंद घेत सामान्य माणसांमध्ये खुमासदार चर्चा रंगलेली असते. या सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित निरीक्षणप्रधान, उपरोधिक व मिश्कील विनोदनिर्मिती करण्यात लेखक नागेश शेवाळकर सरांचा हातखंडा आहे. साहजिकंच सदर साहित्यकृतीत इतरांच्या भावनांना न दुखावता निवडणूकीचा विषय अगदी मजेशीर पद्धतीनं त्यांनी हाताळला आहे.

मुखपृष्ठकारानं कथासंग्रहाच्या विनोदी गाभ्याला साजेसं असं मजेशीर मुखपृष्ठ चितारलेलं असून ते वाचकांचं लक्ष अगदी सहज वेधून घेतं. पात्रांचे भन्नाट हावभाव पाहताक्षणीच वाचकांच्या चेहऱ्यावर हास्यरेषा उमटते. साहित्यकृतीच्या मलपृष्ठावर सदर साहित्यकृतीचे लेखक श्री. नागेश सू. शेवाळकर यांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आढळतो.

निवडणूकीच्या काळात राजकीय ज्वराचा चढलेला पारा पाहून शेवाळकर सरांनी निवडणूकीला आजाराची उपमा दिली असावी, असा कयास वाचक मंडळी बांधतात. याच अनुषंगानं ‘निवडणूक: एक आजार’, असं उपहासात्मक शीर्षक सदर साहित्यकृतीला शेवाळकर सरांनी योजलेलं दिसून येतं. “हसणं आरोग्यास फायदेशीर आहे”, या उक्तिनुसार रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी एखाद्या रासायनिक औषधाचा परिणाम व्हायला अधिक वेळ लागतो, त्या मानानं हास्यौषधीनं मात्र रुग्णास व्याधीतून लवकर मुक्त करता येतं. या संकल्पनेला हेरून शेवाळकर सरांनी अतिशय चतुराईनं ‘निवडणूक’ नावाच्या या आजारावरती हास्यौषधीचं हळूवार लेपन करून वाचकांना चिंतामुक्त करण्याचा सफल प्रयत्न केलेला आढळतो.

सदर साहित्यकृतीच्या मनोगतातून शेवाळकर सरांनी त्यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वाची तोंडओळख केलेली दिसून येते. सोबतंच ‘निवडणूक: एक आजार’ या साहित्यकृतीच्या निर्मितीचा आनंदोत्सव त्यांनी शाॅपिजनच्या माध्यमातून साजरा केला आहे. शाॅपिजन हे एक साहित्य-केंद्रित ऑनलाईन वेबपृष्ठ असून दर्जेदार साहित्य निर्मिती आणि सादरीकरणाला सदर मंच विशेष प्रोत्साहन देतो. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. पुस्तकात समाविष्ट असलेल्या राजकीय विनोदी कथांना वाचकांच्या पसंतीची मोहोर उमटेल, असा दृढ विश्वास त्यांनी साहित्यकृतीच्या मनोगतातून व्यक्त केला आहे. शाॅपिजनसोबतच्या साहित्यप्रवासात ज्यांचं मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं, त्यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक ऋणोद्गार त्यांनी काढले आहेत. शाॅपिजन या डिजिटल मंचाच्या मराठी विभाग प्रमुख असलेल्या ऋचा दीपक कर्वे यांनी शाॅपिजनच्या संकल्पनेविषयी दोन शब्द व्यक्त करून लेखक मंडळींचे आभार मानले आहेत. सदर साहित्यकृतीत ‘इ (विलक्षण)’, ‘भेटूया… पाच वर्षांनी’, ‘सभा की भास’, ‘न्यारे मतदान’, ‘शाई लावा’, ‘गुडघ्याला बाशिंग’, ‘नगररागिणी’, ‘शिरापुरी’, ‘आमनेसामने’, ‘वाढवा टक्का मिळवा मुक्का’, ‘वाजवा की टाळी!’, ‘निवडणूक: एक आजार’, ‘भाकरीची फिरवा फिरवी…’ अशा वैविध्यपूर्ण तेरा विनोदी कथांचा समावेश झालेला दिसून येतो. लेखक नागेश शेवाळकर यांनी अगदी मोक्याच्या ठिकाणी ‘टायमिंग’चा मेळ साधत विनोदनिर्मितीला पोषक वातावरण या साहित्यकृतीतून निर्माण केलं आहे.

सदर साहित्यकृतीतील विनोदी कथांमधील ‘इ (विलक्षण)’ व ‘शाई लावा’ या दोन भन्नाट विनोदी कथा इतर कथांच्या तुलनेत किंचित वरचढ ठरल्या आहेत. ‘इ (विलक्षण)’ या दशपृष्ठी कथेतून ग्राम पंचायतीच्या निवडणूकीची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. गावच्या मातीशी जोडणारी अस्सल बोलीभाषा, स्थानिक शब्दसंग्रह व पात्रं यांची अप्रतिम गुंफण या कथेत झालेली दिसून येते. वाचकांना अक्षरशः हसता हसता विचार करायला लावणारी ही कथा आहे. या कथासंग्रहातील ‘शाई लावा’ ही कथा तब्बल बारा पानांमध्ये सामावलेली असून या कथेत मतदानाच्या दिवशी राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी हक्काची मिळालेली सुट्टी मतदार कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी फुकट कशी घालवतात, याचं मार्मिक रेखाटन केलं आहे. मतदारांना मतदान केंद्रावरती आकर्षिक करण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून आकर्षक भेट योजना, कुपन असलेलं पाकिट, मोफत आरोग्य तपासण्या, हाॅटेलमधला चहा-नाश्ता, दुपारच्या जेवणानंतर माॅलमधली सवलत, रात्रीच्या जेवणाचं कुपन, पंचतारांकित हाॅटेलमध्ये स्पेशल ‘लोकशाही थाली’ फ्री, अशा नाविन्यपूर्ण मनोरंजनात्मक उपाययोजनांची केलेली सरबत्ती पाहून वाचक मंडळींमध्ये एकंच हशा पिकतो. निवडणूक प्रक्रियेतील या दिखाऊपणावर लेखक नागेश शेवाळकर यांनी उपरोधिक पद्धतीनं ताशेरे ओढले आहेत. अशा पद्धतीनं ‘एक दिवसाचा राजा’चा फील मतदारांना यावा, मतदारांचे चोचले पुरवावेत, या उद्देशानं भुलवणारी आश्वासनं व त्यांना बळी पडलेली ही जनता-जनार्दन यांवरती विनोदी शैलीत शेवाळकर सरांनी टोला लगावला आहे. सामान्य वाचकांना या कथा वाचून प्रत्यक्ष अनुभवाचा घोट प्यायल्याची प्रचिती येते.

सदर साहित्यकृतीतील विनोदी कथा केवळ मनोरंजनात्मक भूमिकेतून मांडलेल्या नसून, राजकीय घडामोडी, नेत्यांची कार्यशैली व राजकीय क्षेत्रातील वास्तव यांचं आरस्पानी दर्शन या कथांमधून घडतं. कथा वाचल्यानंतर अंतर्मुख होऊन वाचक मंडळी विचार करायला प्रवृत्त होतात. मनमोकळेपणानं हसणाऱ्यांसाठी तणावमुक्तीचा एक साधा-सरळ उपाय म्हणून ही साहित्यकृती एक उत्तम ‘स्ट्रेस-बस्टर’ (Stress-buster) ठरू शकते, यात शंका नाही. शेवाळकर सरांनी हसवण्याचं महत्तम कार्य तडीस अवश्य नेलं आहे, परंतु वाचकांनीही हसण्याची तसदी घ्यावी, हे वेगळं नमूद करायला नको !

प्रियांका शिंदे जगताप

— परीक्षण : प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप सुंदर, आकर्षक मांडणी!
    धन्यवाद, मा. श्री भुजबळ सर तसेच समीक्षक प्रियांका शिंदे जगताप आभारी आहे!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments