ललित

“श्रावणसर”

चाहुल लागली आहे श्रावणाची. सृष्टी आषाढाच्या संततधारेत चिंब भिजुन तृप्त झाली आहे. पाऊस थोडा दमलाय. आता मधुं मधुन विश्रांती घेईल. पानोपानी हिरवाईच्या छटात श्रावणपालवी पानाआड डोकावत आहे. जाई, जुई, मोगरा कळ्यांनी बहरून आलेत. आषाढी पावसाने पार झोडपून काढले होते.तरूवेली मात्र डवरून आल्या आहेत. डोंगरमाथे, मैदाने शेतात नाजुक तृण व बाळरोपांचे हिरवे जावळ वारा खेळवतोय. बळीराजाचे वावर हिरवे झाले आहे. झरे ओहळ भरलेत. त्यांचा खळखष आवाज दूरवर जातोय. आभाळ फारसे अंधारलेले दिसत नाही. आषाढाची संततधार थांबली आहे.
चालू झाला मन मोहरून टाकणारा श्रावण. पांढरी पांढरी पांच दहा मिनिटे टिकणारी श्रावणधार येते दिवसातुन काही वेळा एरवी छान सोनेरी ऊन पडतंय. ऊन्हात पाण्याचे थेंब सप्तरंगी दिसत आहेत. ऊनपावसाचा जणू लपंडावच चालू आहे.

वनात पिसारा फुलवत मोर नाचत आहेत तर काही केकारव करत आनंदात आहेत. पक्षांची पिल्ल घरट्यात सुरक्षित आहेत. आलीच एखादी झिम्माड सर तरच नाहीतर पाऊस मंदावतोच. या सोनेरी श्रावणसरी माळरानावर पसरतात व थेंबा थेंबात चमकतात. बागा, झुडपे गवत फुलांनी बहरून येतात. सुगंधी घमघमाट सुटलेला आहे. वृक्षवेली ऊन्हाचे सोनेरी मुगूट घालून ताजेतवाने झालेत. शेतात पिके पोटरीत मोती पिकलेले दाखवू लागलीत. निसर्गच अनेक रंगात परत सजलाय. गंध दाटलाय.

फांद्यांवर मुलींनी हिंदोळे बांधलेत. लेकी माहेरी आल्यात. सुख समाधान चेहेर्यावर पसरलंय. नागपंचमीची, राखीची जिवतीची पूजा गाणी यांची लगबग चालली आहे.

घराघरात पुरणा तळणाचे लोभस वास येतायत. ललना पूजा पाठ मंदिरे व्रते, फूलं दुर्वा पत्री गोळा करण्यात दंग आहेत.
बैलपोळा येऊ घातलाय. बैलांना कसं सजवावं या विचारात तरूणाई गुंतली आहे. हार गजरे दारी तोरणे, सजावट, यांची चंगळ आहे. अंगणी रांगोळ्या सजल्यात.
आसमंतात निसर्गात चैतन्य, आनंद, ऊत्साह भरुन राहिला आहे. म्हणुनच श्रावणाला हंसरा नाचरा श्रावण म्हंटले आहे. परंपरेचा मांगल्याचा, भक्तीमय असा हा श्रावण त्या झिम्माड सरींबरोबर हात पकडत कधी संपतो कळतही नाही.

— लेखन : अनुराधा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर