“समुद्रातले शहर”
काही वर्षापूर्वी “हमराज” चित्रपट पाहिला होता. तो पाहिल्यापासूनच आपणही क्रुझवर जावे हा विचार मनात घोळत होता आणि कधीतरी असा योग येईल हा आशावाद होता.
अशा प्रकारच्या पर्यटनात माहीर असलेले आमचे स्नेही श्री दत्ताजी भालेराव यांनी दोन रात्री, दोन दिवसांच्या क्रुझ द्वारे केरळ ते कन्याकुमारी ट्रिपची माहिती पाठवली आणि या ट्रिप मध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतलाच.
या ट्रीपमध्ये कोचीहून मुन्नार, आलापिनी थेकडी, त्रिवेद्रम, कन्याकुमारी आणि ईतर ठिकाणी जायचे. बोट लागते, त्रास होतो हे ऐकले होते. आपल्याला त्रास झाला तर काहीच एन्जॉय करू शकू की नाही ? ही शंका मनात होती. पण घरच्या पेक्षाही जास्त आपुलकीने काळजी घेणारे सहल व्यवस्थापक असल्याचे आधीच्या सहलीत अनुभवल्यामुळे मन तसे निर्धास्त होते.
आम्ही 28 सप्टेंबरच्या सकाळी बेलार्ड पिअर येथील International Cruise Terminal ला पोहचलो.
दोन दिवस आधीच बोर्डिंग पास मिळाले होते. आधार कार्ड, बोर्डिंग पासचे चेकिंग होवून आत गेलो. आत “स्वागत पेय” देऊन आमचे स्वागत करण्यात आले. 11 मजल्याची (मजल्याला डेक म्हणतात) भव्य सुंदर डेकोर हि क्रुझ नटलेल्या राणी सारखी भासली.
आमच्या नावे असलेल्या खोलीची किल्ली घेऊन आम्ही खोलीत प्रवेश केला. आत डबल बेड, स्वच्छ बाथरूम, महत्वाचे लाईफ जॅकेट होते. ते लाईफ जॅकेट पाहून “टायटॅनिक” ची आठवण झाली आणि मनात काही काळ धडकीच भरली !

थोड्या वेळाने आम्हाला एकत्र करून बोट टुर दिली. प्रत्येक मजल्यावर काय काय आहे ते दाखवले. यात रेस्टॉरंट, थिएटर, म्युझिक रूम, जिम, मसाज, स्पा, कसिनो, स्विमिंग पूल आणि बरेच काही होते.
त्यानंतर ईमरजन्सी आली (वादळ वगैरे) तर काय करायचे लाईफ जॅकेट वापर कसा करायचा, कोणत्या दरवाजातून बाहेर पडून लहान बोटीत जायचे हे समजावून सांगितलं. बोटीच्या नियमाचे सोपस्कार झाल्यावर आम्ही मजा करायला मोकळे झालो.
प्रथम आम्ही वरच्या डेकवर गेलो. चहुबाजूने निळाशार, अथांग समुद्र, अनेक माणसाची वर्दळ असताही मन शांत, नि:शब्द होत गेले. मावळतांनाही रंगाची उधळण करणारा सुर्य पहाताना मावळत्या दिनकरा अधर्य तुज जोडून दोन्ही करा म्हणत हात जोडले गेले.

निळ्याशार सागराने काळोखी शाल पाघरली आम्ही जेवणगृहाकडे वळलो. पदार्थाची रेलचेल, जैन, ईटालियन पदार्थहि भरपूर गप्पा मारत बसलो. तितक्यात सुमधुर संगीताचे स्वर कानी आले. क्लासिकल बेसची सदाबहार गाणी लाईव्ह ऐकायला मिळाली. गायक गायिका सुस्वरात, वाद्यवृदही तितकाच सुमधुर ! मन प्रसन्न झाले.
एका डेकवर खिडकीच्या जवळच्या खुर्ची वर बसुन आम्ही रसाचा आस्वाद घेतला. तर काही जण त्यांना आवडणारी खास ड्रिंक घेत होती.परत वरच्या डेक वर गेलो (आम्हाला जीम, स्पा, मसाज, कसिनो काहीही करायचे नव्हते) तिथे डीजे सुरू होता. दम मारो दम मिट जाए गम ऐकताना नकळत आमचीही पावले थिरकली. (या ही वयात हं) चैतन्य, जोष यानी सारे वातावरण दुमदुमत होते. सँडविचेस आणि रसाचा आस्वाद घेतच होतो. नंतर आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.
सकाळी थोडे उशिरा उठल्यामुळे सुर्यादय पहायचा राहून गेला. परत खाणे, पिणे, फिरणे सुरू झाले. थिएटर मधे बले बले हा डान्स ड्रामा शो पाहिला. त्यांचा सेट, लायटिंग, ड्रेपरी, कलाकाराची कामे छानच झाली. एकदम मज्जा आली. लाईव्ह गाणी ऐकली.
मावळत्या दिनकराला परत डोळे भरून पाहिले डीजेच्या तालावर जमेल तसे नाचलो. या क्रुझवरचे वातावरण म्हणजे उत्साहाचा वसंत बहारच, बहरलेली सुंदर नगरीच ! अथांग सागरासारखे निर्मळ आणि मोठे मन कर अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.
क्रुझ म्हणजे समुद्रातले शहर याची प्रचिती आली. “ईच्छिले ते घडले” हा आनंद वेगळाच असतो. आता वेध लागलेत, ते पुढच्या अशाच दुसर्या सहलीचे !
— लेखन : शुभदा डावरे चिंधडे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
