Homeसंस्कृती"कोल्हापूरची खाद्यसंस्कृती"

“कोल्हापूरची खाद्यसंस्कृती”

कोल्हापूर हे अनेक विविध बाबींसाठी ओळखल्या जाते. त्यातीलच एक, ज्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते, ती म्हणजे “कोल्हापूरची खाद्यसंस्कृती” होय. अशा या खाद्यसंस्कृती चमचमीत “खाद्यसंस्कृती” बद्दल लिहिले आहे, वनिता पाटील यांनी.

अल्प परिचय : वनिता पाटील या बीएससी (इलेक्ट्रॉनिक) झाल्या असून त्या कवयित्री आणि लेखिकाही आहेत. त्यांनी
अभंग, लावणी, पोवाडा, वृत्तबद्ध, अष्टक्षरी काव्य, गझल, मुक्तछंद आदी काव्य प्रकार हाताळले आहेत. त्यांचे लेखन विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे स्वागत आहे.
– संपादक

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर कोल्हापूरचे स्थान जितके मानाचे आहे, तितकेच ते खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. अंबाबाईचा आशीर्वाद, कुस्तीचा फड, कोल्हापुरी चपलांचा रुबाब आणि माणसांच्या स्वभावातील दिलदारपणा यांसोबतच कोल्हापूरची ओळख आहे ती इथल्या झणझणीत, रुचकर आणि अस्सल खाद्यसंस्कृतीमुळे!
कोल्हापूर म्हटले की डोळ्यांसमोर येतो तो तांबडा-पांढरा रस्सा आणि जिभेवर रेंगाळणारी कोल्हापुरी चवीची आठवण!कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा मानाचा तुरा म्हणजे तांबडा आणि पांढरा रस्सा. तांबड्या रश्श्याचा लालभडक रंग, मिरच्यांचा झणझणीतपणा आणि मसाल्यांचा दरवळ यामुळे तो खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. तर पांढऱ्या रश्श्याची सौम्य, नारळाच्या दुधाची आणि मसाल्यांची वेगळीच चव जिभेला तृप्त करते. मटण, चिकन, सुकं मटण यांसारखे पदार्थही कोल्हापुरी पद्धतीने बनवले की त्यांच्या चवीची बातच न्यारी! या पदार्थांच्या चवीमागे असतो तो घराघरांत पिढ्यान्‌पिढ्या जपलेला कोल्हापुरी मसाला. सुके खोबरे, कांदा, लसूण, खडे मसाले आणि खास कोल्हापुरी मिरच्यांच्या मिश्रणातून तयार होणारा हा मसाला म्हणजे कोल्हापुरी पाककलेचा आत्माच!

मात्र कोल्हापूरची खाद्यसंस्कृती केवळ मांसाहारापुरती मर्यादित नाही. शाकाहारी पदार्थांचीही इथे समृद्ध परंपरा आहे. ज्वारीची किंवा बाजरीची गरमागरम भाकरी, पिठलं, झुणका, भरली वांगी, पालेभाज्या, ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी यांची ताटातली मांडणी म्हणजे साधेपणात दडलेली श्रीमंतीच! चुलीवर भाजलेली भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांद्याची फोड यांची चव कोणत्याही पंचतारांकित भोजनालाही लाजवेल अशीच !

कोल्हापुरी मिसळ हा तर स्वतंत्रपणे चर्चेचा विषय! झणझणीत तर्री, उसळ, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबाची फोड यांची एकत्रित मेजवानी म्हणजे मिसळप्रेमींसाठी पर्वणीच! प्रत्येक ठिकाणच्या मिसळीची चव वेगळी आणि प्रत्येक खवय्याची आवडही वेगळी. सकाळच्या नाश्त्यापासून ते मित्रमंडळींच्या गप्पांपर्यंत मिसळीने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
कोल्हापुरातील फडतरे मिसळ, कळंबा मिसळ, बावडा मिसळ हे खूप प्रसिद्ध आहे बावडा मिसळ, कळंबा मिसळ आणि फडतरे मिसळ ही कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीची खास ओळख आहेत. झणझणीत तर्री, तिखटजाळ कट, चवदार उसळ आणि पाव यांचा अप्रतिम संगम म्हणजे कोल्हापुरी मिसळ! तिची अस्सल चव जिभेवर रेंगाळते आणि खवय्यांना पुन्हा पुन्हा खुणावते.

तसेच राजाभाऊंची भेळ म्हणजे चटकदार चवीचा एक अनोखा अनुभव ! कुरकुरीत चुरमुरे, तिखट-गोड चटण्या, बारीक शेव, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक घासात आंबट, गोड, तिखट अशा चवींची मेजवानी मिळते. एकदा खाल्ली की पुन्हा खावीशी वाटणारी ही कोल्हापूरची खासियत ! 😋
पुरणपोळी, मोदक, खीर, लाडू असे पारंपरिक गोड पदार्थ सणासुदीला घराघरांत तयार होतात. दिवाळीचा फराळ, गणेशोत्सवातील मोदक, गौरीच्या नैवेद्याची पक्वान्ने यांतून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते.

कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत गरम मसाले आणि कांदा-लसूण चटणीला विशेष महत्त्व आहे. अस्सल कोल्हापुरी मसाल्यांचा तिखटजाळपणा, खमंग सुगंध आणि झणझणीत चव पदार्थांची रंगत वाढवते. लाल मिरची, खोबरे, धणे, तीळ आणि विविध मसाल्यांच्या मिश्रणातून तयार होणारे मसाले जेवणाला खास कोल्हापुरी ठसका देतात. तर कांदा-लसूण चटणीची झणझणीत चव भाकरी, पिठलं, मिसळ आणि तांबड्या रस्स्यासोबत अप्रतिम लागते. या मसाल्यांशिवाय कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीची चवच अपुरी आहे !

कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत पाहुणचारालाही विशेष महत्त्व आहे. घरी पाहुणे आले की आग्रहाने जेवायला वाढणे, पुन्हा पुन्हा वाढप घेण्याचा आग्रह करणे आणि जेवणानंतरही काही गोडधोड खाण्याचा आग्रह धरणे, हा इथल्या माणसांचा स्वभावच! इथे जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचे साधन नसून प्रेम, आपुलकी आणि आदर व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत आहे.

या खाद्यसंस्कृतीला स्थानिक शेतीचाही मोठा आधार आहे. ज्वारी, बाजरी, कडधान्ये, ऊस, दूध, भाज्या आणि मसाल्याचे पदार्थ यांची उपलब्धता इथल्या आहाराला समृद्ध करते. ग्रामीण भागातील चुलीवरचे जेवण असो किंवा शहरातील आधुनिक उपाहारगृहे, पारंपरिक चवीचे आकर्षण आजही कायम आहे.

बदलत्या काळानुसार अनेक पदार्थांना आधुनिक रूप मिळाले आहे. सोशल मीडिया आणि पर्यटनामुळे कोल्हापुरी खाद्यपदार्थांची ख्याती महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जग भर पोहोचली आहे.

कोल्हापूरला येणारा पर्यटक अंबाबाईचे दर्शन घेतो, रंकाळ्याच्या काठावर फेरफटका मारतो, पन्हाळ्याचा इतिहास अनुभवतो आणि त्याचबरोबर कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय त्याची सफर पूर्ण होत नाही. कारण इथले जेवण ही केवळ चवीची मेजवानी नसून कोल्हापूरच्या संस्कृतीचा अनुभव आहे.
आजच्या आधुनिक युगातही आजीच्या हातची पाककृती, आईच्या हातचा मसाला आणि घरच्या जेवणाची चव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक घरच्या मसाल्याची चव वेगळी, प्रत्येक हाताच्या स्वयंपाकाची पद्धत वेगळी; पण त्यामागची भावना मात्र एकच – प्रेम आणि आपुलकी !

खरे तर कोल्हापुरी खाद्यसंस्कृती म्हणजे केवळ तिखट, झणझणीत पदार्थांचा पसारा नाही. ती आहे इथल्या मातीचा सुगंध, कष्टकऱ्यांच्या जीवनाची कहाणी, परंपरेचा वारसा आणि माणसांच्या मनातील दिलदारपणा! म्हणूनच कोल्हापुरी जेवणाची चव जिभेवर रेंगाळते आणि त्या चवीमागची आपुलकी मनात कायमची घर करून राहते.अस्सल कोल्हापुरी बाणा जसा जगण्यात, तसाच तो जेवणातही !

वनिता पाटील

— लेखन : वनिता पाटील. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण
पूजा टंकसाळे सातारा on कोणी तरी असावे….