Homeलेखसंगती रंग : ३३

संगती रंग : ३३

“गुड गर्ल“

निळ्यासावळ्या कावळ्याचे वर्णन करताना आमच्या सोसायटीतली पक्षी मंडळी मी वर्णन करून सांगितली होती. आमच्या सोसायटीत आजूबाजूची झाडं विशेष उल्लेख करावी अशी नाहीत. सिमेंटच्या बेसुमार माऱ्यापासून काही तग धरून राहिलेली बिचारी कशीबशी उभी आहेत. शेवगा, सावरी, औदुंबर आणि मुळांचा गळा दाबूनसुद्धा अंग चोरून उभा राहिलेला किरटा वड ! दोन चार अशोक म्हणवणारी झाडं. नारळाचं झाड होतं एक.पण होतं, ते आता नाही. इतक्या तुटपुंज्या हिरवाईमध्ये हे पक्षी एकोप्याने रहातात ही त्यांची उपजत प्रेरणा असावी.
पक्ष्यांची विविधता खूप आहे. कट्ट्यावर डाळिंबाचे दाणे ठेवले तर टिपून खातात बुलबुल. चिमणी किंवा कावळ्यापेक्षा बुलबुल संख्येने कमी आहेत, पण त्यांची गोड किलबिल ऐकू येत असते. गेटपाशी एकदा एक पिलू पडलेले दिसले. बुलबुल पक्ष्याचे होते ते. त्याची आई त्याला कसे सोडून गेली बरं ? असे कसे ते पडले असेल ? आम्ही सगळे विचारांत पडलो. आपण हात लावला तर त्याच्या भाईबंदांना चालेल का असाही प्रश्न पडला.

शेजारच्या काकू म्हणाल्या, “उडायला शिकत असेल, बिचारं धडपडलं.” खालच्या मजल्यावरच्या आजी सांगू लागल्या, ”पिल्ले सुरक्षित राहावी म्हणून साळुंकी घरटं बदलते.बुलबुल पण तसे करत असतील.आणि तसं करताना पडलं की काय ?”
आमची चर्चा चालू होती, तेवढ्यात हर्षूने ते पिलू एका रुमालात घेतलं आणि एका खोक्यात ठेवलं. आणि कापसाच्या बोळ्यांत दूध टाकून पिळून बळेच त्याला थेंबभर पाजलं.
हर्षवर्धन हा अतिशय माया करतो समस्त प्राणीमात्रांवर. त्यांच्या घरात एक दोन मांजरी असतातच.
“तुमच्या घरातली मांजर मटकावेल त्याला … हर्षू. बाहेर राहूदे ते. त्याची आई घेऊन जाईल त्याला.”
सर्वांनी त्याला अडवलं.तो ऐकणार नव्हता. पिल्लाने दूध थोडं घेतलं की खोक्यातल्या फडक्यात सांडलं बहुदा..

“हर्षूला आता अभ्यास टाळायला कारण मिळालं. ते आपल्याला वाढवायला का जमणार आहे ? त्याला त्याची आई हवी.”
त्याच्या आईची कुरबुर सुरू झाली.
मी मात्र हर्षूकडे जाऊन पिलू काय खाईल असा विचार करू लागले. दुकानात जाऊन ड्रॉपर आणला.
“ते दूध पिऊ लागलं तर जगेल हर्षूच्या आई ! थर्माकोलचे एक अदबशीर बॉक्स आहे माझ्याकडे मी ठेवते माझ्या घरी..”
“होय तसंच करावं लागेल. आमच्या घरात दोन मांजरी आहेत.केव्हा मटकावतील , कळणार नाही. मनी तरी बरी, ती ब्राऊनी तर भारी खादाड आहे…”
हर्षू त्याला “शोना”, “माझं पिलू” असं गोड गोड शब्दात विनवू लागला. पण त्याचं क्याव क्याव करणं सांगत होतं की त्याला भूक लागली आहे आणि ड्रॉपर किंवा इतर कसलाच त्याला उपयोग होत नाही ये. त्याला त्याची आईच हवी , त्याचं घरटं हवं, त्याचं अन्न हवं. भूक भागायला हवी ,त्याची नात्यागोत्याची हवीत.
इतक्यात ब्राऊनी तिथं आलीच आणि मिशा फेंदारून थबकून पाहू लागली.
“म्या ss व ! ”
“हर्षू ह्या नव्या पाहुण्याचे लाड करत आहे,
ते ब्राऊनीला बिलकुल आवडत नसणार. तुम्ही आताच न्या बाई तुमच्या घरी..सुखरूप राहूदे ते.”
आम्ही असं बोलतोय तोच, ब्राऊनीने ते पिलू झडप घालून तोंडाने उचललं. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच ती त्याला घराबाहेर घेऊन गेली. हर्षू तिच्यामागे धावला.
“ब्राऊनी, पिलाला सोड, पिलाला सोड.“ अशी हाकाटी मारू लागला. अशोक समजल्या जाणाऱ्या आसो पालव झाडांच्या आडोशाला बुलबुल जोडी घरटं बांधून रहात होती. फडणीस अमेरिकेत असतात, त्यांच्या ए. सी. केबलवर बुलबुल दांपत्याने टेरेस फ्लॅट बनवलेला होता. तिथे ब्राऊनी त्या पिलाला सोडून आली. त्याच्या घरट्यांत त्याला लगेच सामावून घेतले गेले. माणसांचा स्पर्श झाला होता, तरीही त्याचे स्वागत झाले होते तिथे.

काय असतात त्यांचे नियम ? की मांजरीने सुपूर्त केले म्हणून त्यांना पटले असावे ?
“गुड गर्ल !“ हर्षूने ब्राऊनीच्या पाठीला गाल घासत म्हटलं.
मांजरीचं भक्ष्य आहेत अशी पिल्लं खरं म्हणजे.
ती नजर ठेवून असेलच ना, ह्या घरट्यावर. तिला माहीत होतं हे पिलू कोणत्या कुटुंबाचं सभासद आहे ते ! ब्राऊनीवर माया करणारा,तिला खीर खाऊ घालणारा तिचा हर्षू. त्याने ह्या पिल्लाला जवळ केलं आहे. त्याचं म्हणजे ते आपलं आहे, हे तिला कसं समजलं असेल ? आता ते हर्षूच्या आणि तिच्या ग्रुप मधलं झालं असं तिने मानलं असेल ? त्याला दूध पिता येत नाहीये, हर्षवर्धनला त्याची काळजी घेणं जमणार नाही हे तिला नक्कीच कळलं असेल.
सिमेंटच्या जंगलात होता होईल तेव्हढं धरून राहूया हे ठरवलं असेल का तिने ? नात्याचे बंध जाणले असतील का तिने ?
तिचं ते भक्ष्य असूनदेखील आपलं – परकं ओळखून असं वागणं, पाहून आम्ही सगळे अजूनही आश्चर्य करत आहोत.
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments